खारफुटींच्या रोपाचे रोपण नदीच्या/खाडीच्या किनारी भागात करण्याचा आमचा उपक्रम खारफुटीसंबंधी निर्माण झालेल्या चिंतेतून आकाराला आला आहे. कुठ्ठाळी येथील सेंट जोसेफ वाझ कॉलेज आणि गोव्यातील काही स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून गेली दोन वर्षे हे काम आम्ही करत आहोत.
आज अनेक ठिकाणी खारफुटींवर विविध कारणांमुळे काळ आलेला दिसतो. त्यांचे महत्त्व सर्वांना कळण्याच्या दृष्टीने फारशी जागृतीही झालेली नाही किंवा त्यांचे महत्त्व ठाऊक असूनही लोकांकडून त्यांचा विध्वंस होत आहे. कोरोनाकाळात आलेल्या चक्रीवादळात गोव्याची जरी फार हानी झाली नसली तरी किनारी भागाला त्याचा तडाखा बऱ्याच प्रमाणात बसला होता. सांकवाळ येथील खाडीला त्याचा मोठा फटका बसला. आमच्यासाठी ती गंभीर बाब होती.
अलीकडच्या काळात चक्रीवादळे, तुफान यांची संख्या वाढत आहे. समुद्राशी संबंधित विध्वंसाची संख्याही त्यामुळे वाढलेली आहे. अशावेळी आमच्याकडे संरक्षणाचे साधन जर कुठले असेल तर ते आहे खारफुटीची झाडे. मागील सुनामीच्या वेळी तामिळनाडूमधील अनेक किनारी क्षेत्र नष्ट झाली. अपवाद होता तो पिचावरम या ठिकाणाचा. याचे एकमेव कारण होते ते तिथे असलेले खारफुटीचे जंगल. त्या जंगलामुळे ते क्षेत्र सुनामीच्या तडाख्यातून वाचले.
वातावरणात होणाऱ्या बदलामुळे विध्वंस अटळ आहे. आम्ही किनारी निवासी असल्यामुळे आमच्यापाशी दुसरा पर्याय नाही. आम्हाला किनाऱ्यांचे रक्षण करायचे असेल तर सर्व ठिकाणी खारफुटींच्या झाडांची योजना करणे हाच एक उपाय आहे. सरकार याबाबतीत पावले उचलेल हे कठीण दिसते पण सरकारची वाट पाहत राहण्यापेक्षा आम्ही स्वतःच त्या संदर्भात काम करणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षी गोवा राज्य दिनाच्या मुहूर्तावर, 30 मे रोजी आम्ही आमच्या या कामाला आरंभ केला. प्रथम सांकवाळ, त्यानंतर दिवाडी येथील नवीन निर्माण झालेले बेट, त्यानंतर चिखली येथील वेरीग बेट आणि नंतर कांदोळी येथील खाडीत आम्ही खारफुटींची रोपे रोवली आहेत. या सर्व जागांवर मिळून किमान १०००० खारफुटींची रोपे आम्ही लावली असतील.
अर्थात त्यातील कित्येक रोपे पावसाळ्यातील लाटांच्या ओघामुळे वाहूनही गेली आहेत. पण अशा जागांवर आम्ही पुन्हा रोपांचे रोपण करतो. आम्ही आमच्या अनुभवातून अर्थातच शिकत आहोत. या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करेल अशा तज्ज्ञांची उणीव आम्हाला भासते आहे.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे अरविंद उंटवाले यांच्या देखरेखीखाली १९८०च्या सुमारास झालेले खारफुटींचे रोपण हा गंभीरपणे केला गेलेला कदाचित शेवटचा उपक्रम असेल.
अलीकडच्या काळात खारफुटींचे रोपण तर केले जात नाहीच पण त्याची कत्तल मात्र होताना दिसते. पण अशा साऱ्या नकारात्मक गोष्टीविरुद्ध आरडाओरडा करण्यापेक्षा स्वतःच खारफुटी लावणे हेच योग्य ठरेल. आम्ही सातत्याने करत असलेल्या या कामामुळे आता अनेक संस्था आम्हाला मदत करण्यासाठी पुढे येत आहे ही त्यातली सकारात्मक बाब आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.