.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डॉ. संगीता साेनक
कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता वाचली की गरीबीत देखील ताठ मानेने जगणाऱ्यांचे एक दारुण चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. पावसाच्या सरीवर सरींचा आनंद घेताना वास्तविकता आपल्याला झोंबायला लागते.
मनात साठवलेल्या बालपणीच्या ओल्याचिंब आठवणींचे सुखद क्षणही आपल्याला बोचायला लागतात. सध्या चालू असलेली ही पर्जन्यवृष्टी, अतिवृष्टी आपल्याला मूक बनवते. श्रावणमासाचे हर्षभरीत वर्णन करणारी कवींची लेखणी सध्या स्तब्ध आहे. वर्तमानपत्रात दर दिवशी येणाऱ्या बातम्या आपल्याला सुन्न करतात. कुठे एखाद्या महामार्गावर दरड कोसळून वाहने चिरडली गेली तर कुठे एखाद्या घराची भिंत कोसळून माणसे मरण पावली. सध्या वाहतूक व्यवस्था उध्वस्त झाली आहे व अर्थव्यवस्था कोलंडली आहे.
नुसत्या गोव्यातच नाही तर भारतभर सगळीकडे हीच परिस्थिती आहे. एव्हढेच नव्हे तर संपूर्ण जगभराची घडी विस्कटलेली आहे. पण इतरत्र याचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. आपल्याकडे मात्र ‘रस्त्याने ओहोळ जाती खळखळ’ आणि ‘जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ’ हाच प्रकार चालू आहे. बांगलादेशाच्या खालोखाल भारत हा जगातला सर्वाधिक पूरग्रस्त देश मानला जातो. आपली स्मार्ट पणजी सध्या जलमय झाली आहे.
कुसुमाग्रजांनी ‘कणा’ कविता लिहिली तेव्हा गंगामाई घरात पाहुणी येण्याचे प्रसंग खूप कमी वेळा घडत होते. आजकाल अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन (landslide), वीज कोसळणे यांसारख्या घटना सतत ऐकू येतात.
हे असे का घडते? या आपत्त्यांची वारंवारता आणि तीव्रता एव्हढी का वाढली आहे यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. ही वारंवारता आणि तीव्रता वाढायचे मुख्य कारण आहे हवामानबदल आणि तापमानवाढ. पर्यावरणाचे नुकसान करणारे मानवी क्रियाकलाप, उदाहरणार्थ नदीपात्रातील वाळू उत्खनन, जंगलतोड, वृक्षतोड, कचर्याची अपुरी विल्हेवाट इत्यादी, पुराचा आणि त्यापासून होणार्या हानीचा धोका वाढवतात. हिरवळीची कमतरता असल्यामुळे पाणी जमिनीत कमी शोषले जाते व बाष्पीभवनही जास्त होते.
काँक्रीट, डांबर यांसारख्या पाणी न शोषणार्या संसाधनांचा पृष्ठभागावर उपयोग केल्यामुळे जमिनीत जिरणारे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जगभरातील समुदाय अतिवृष्टी आणि महापूरांपासून त्यांच्या आरोग्यावर, जीवनावर आणि उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांची किंमत मोजत आहेत.
हवामान बदलाचा परिणाम जगभरातील सर्व प्रदेशांवर होतो. हवामानातील बदलांचा परिणाम आपल्या आजूबाजूला दिसत आहे.
वाढलेल्या तापमानामुळे अनेक ठिकाणी हिमनगाच्या ढाली वितळत आहेत आणि समुद्राची पातळी वाढत आहे. गेल्या पन्नास वर्षांत सरासरी पाच इंच वाढ जागतिक स्तरावर समुद्र पातळीत झाली आहे असे तज्ज्ञ मानतात. समुद्र-पातळीतील वाढ हा जागतिक तापमानवाढीचा एक स्पष्ट परिणाम आहे. पण हा परिणाम सगळीकडे सारखा नाही; असमान, असममित आहे.
काही प्रदेशांत याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहेत. तर काही ठिकाणी याचे परिणाम कमी प्रमाणात जाणवतात. तापमानवाढ झाल्यामुळे जमीन व महासागरांतून पाण्याचे बाष्पीभवन अधिक होते. त्यामुळे हवेतील आर्द्रता आणि पाण्याचे प्रमाण वाढते. जास्त आर्द्रतेने भरलेली हवा वादळ प्रणालीमध्ये रूपांतरित झाली की अधिक तीव्र पर्जन्य निर्माण करू शकते. शिवाय तापमानवाढीमुळे उष्णतेच्या लहरी वाढलेल्या आहेत. या उष्णतेमुळे माती कोरडी होते. कोरड्या मातीत पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते.
मुसळधार पाऊस आला की पूर येण्याची शक्यता वाढते. नदीच्या गाळ व पाणी वाहून नेण्याच्या क्षमता एकमेकींवर अवलंबून असतात. नदीच्या पात्रात कृत्रिमरीत्या बदल केल्यास नदीचा मूळचा समतोल बिघडतो व नदी तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. तसेच पाण्याच्या जलद प्रवाहामुळे जमिनीची झीज होते आणि हा गाळ नदीच्या पात्रात जमा होतो.
त्यामुळे नदीचे पात्र अजून उथळ होते. मुसळधार पावसाचे पाणी ही उथळ पात्रे सामावून घेऊ शकत नाहीत. पुराचे पाणी सामावून घेणाऱ्या पाणथळी आता कमी झाल्या आहेत. भवताली सर्वत्र हे पाणी पसरले की पूर येतो.
मानवी जीवनावर या अतिवृष्टीचे आणि पुरांचे बहुआयामी परिणाम होतात. या पुरांची तीव्रता व वारंवारता कालांतराने वाढतच आहे. त्यामुळे हे पूर अधिकाधिक हानिकारक बनत चालले आहेत. या अतिवृष्टीचे सर्वांत घातक परिणाम म्हणजे प्रचंड जीवित आणि मालमत्तेची हानी. पुरांमुळे अनेक घरे, गावे आणि समुदाय नष्ट होतात. शिवाय पिकांचे नुकसान, गुरांचे नुकसान, व्यवसायात नुकसान, दळणवळण तुटणे, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे, अत्यावश्यक सेवा कोलमंडून जाणे इत्यादी परिणाम दिसून येतात. सार्वजनिक पायाभूत सुविधांवरही याचा खूप परिणाम होतो. पुराचे पाणी सांडपाणी, विषारी रसायने आणि धोकादायक कचरा वाहून नेऊ शकते. हे दूषित पाणी पिण्याचे पाणी प्रदूषित करू शकते. तसेच मासे आणि इतर वन्यजीवांसाठी असलेले अधिवास दूषित होण्याची शक्यता असते. यामुळे रोगराई पसरू शकते.
अतिवृष्टी आणि त्याचे होणारे परिणाम पूर्णपणे रोखणे आपल्याला शक्य नसले तरी त्यापासून होणारा विध्वंस कमी करण्यासाठी पावले उचलणे आपल्याला शक्य आहे. आपले रस्ते, किनारे, गटारे कचरामुक्त ठेवणे आवश्यक आहे.
झाडे लावणे, उतारावरचा पाण्याचा प्रवाह कमी करण्यासाठी टेकड्ंयावर गच्च्या करणे, पुराचे पाणी वळवण्यासाठी जलवाहिन्या बांधणे, पाणी साठवण्यासाठी बंधारे बांधणे, पाणथळ प्रदेशांचे संरक्षण करणे हे उपाय आपण करू शकतो. पावसाचे पाणी शोषून आणि धरून ठेवणाऱ्या नैसर्गिक हरित पायाभूत सुविधांचा समावेश स्मार्ट सिटीच्या नियोजनात केला पाहिजे.
भविष्यात होणारे संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी पूर संवेदनशील क्षेत्रांचा आढावा घेतला पाहिजे. योग्य त्या उपाययोजना वेळीच केल्या तर हानीपासून आपण स्वतःचे रक्षण करू शकू. प्लॅस्टिकचा कचरा उचलणे, छोटीछोटी झाडे लावणे व जोपासणे, भवताल साफ ठेवणे अशी लहानलहान कामे करून आपण आपला खारीचा वाटा उचलू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.