सिनेमा

आता एवढेच कळतेय की, आम्ही बघितला तो काळ आता एक सिनेमा झालाय.
Cinema
Cinema Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रा. विनय ल. बापट

धाव्यातील जंगलात राहणाऱ्या मुलाचा खरे म्हणजे सिनेमांशी संबंधही येण्याचे काही कारण नव्हते. थेटर म्हणून एक गोष्ट असते आणि त्यात सिनेमा दाखवतात. एक पडदा असतो व त्यावर चित्रे दिसतात हे आई-बाबांकडून ऐकले होते.

आई लहान असताना शिकण्यासाठी सदाशिवगडला होती आणि तिने तिथे काही सिनेमा पाहिले होते. बाबा आपण कधीकाळी बघितलेल्या एका सिनेमाची कथा आम्हाला सांगत असत पण तो सिनेमा प्रत्यक्ष बघण्याचा योग काही माझ्या आयुष्यात आला नव्हता.

हा प्रसंग आला रजूताईचे लग्न झाले आणि ती आपल्या सासरी ताळगावला गेली त्यानंतर. तिचे लग्न १९८०मध्ये झाले. मी साधारण १९८१ मध्ये आयुष्यातील थेटरमध्ये जाऊन पहिला सिनेमा पाहिला, नाव होते ‘चोरावर मोर’.

सिनेमापेक्षा मला ते पणजीच्या थेटर बाहेरील वातावरण अजूनही आठवते. थेटरची उंच इमारत तिकिटाच्या खिडकीसमोरील गर्दी आणि थेटरवर लावलेला मोठ्ठा पोस्टर मी विलक्षण आश्चर्याने या सर्वांकडे पाहत होतो.

सिनेमांची काही दृश्ये आठवतात, पण कथानक मात्र आठवत नाही. थेटरात जाऊन सिनेमा बघितला नाही तरी अगदीच सिनेमा बघितला नव्हता असेही नाही. आम्हाला शाळेत सिनेमा दाखवले जायचे. बहुधा महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे हे सिनेमा दाखवले जायचे.

सिनेमांसोबत काही माहितीपटदेखील दाखवले जायचे. एक गाडी घेऊन ते लोक यायचे मग आम्हाला प्रयोगशाळेत सर्व मुलांना एकत्र केले जायचे आणि सिनेमा दाखवला जायचा. असाच दाखवलेला आणि मला खूप आवडलेला सिनेमा म्हणजे ‘जागृती’.

त्यातील त्या एका घोरणाऱ्या माणसाचे वरखाली होणारे पोट अजूनही माझ्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे आहे. या ठिकाणी आम्हाला दाखवला गेलेला आणखी एक सिनेमा म्हणजे ‘अनपढ’. त्यातील आपल्या मुलीवर अतिप्रसंग करण्यास आलेल्या गुंडाचा माला सिन्हा हातात दांडा घेऊन प्रतिकार करते असे काहीतरी एक दृश्य आहे ते आठवते. ‘आपकी नजरोंने समझा’, हे गाणेही मनात ताजे आहे.

क्रिकेटमध्ये कोणकोणत्या प्रकारे फलंदाजाला आउट केले जाते, याबद्दलचा एक माहितीपटही पूर्णपणे आठवतो. पण हे सिनेमा बघताना विघ्ने हजार असायची. अनेकवेळा ती फिल्म मध्येच तुटायची मग कितीतरी वेळ फक्त ती पांढरी स्क्रीन बघत राहायचो.

काही वेळा उमेदीने सिनेमा बघत असायचो आणि लाइट जायची. प्रचंड निराशा व्हायची. दोन-तीन वेळा तरी अशी लाइट गेल्यामुळे सिनेमा दाखविण्यासाठी लोक येऊनही आम्हाला सिनेमा बघता आला नव्हता.

महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे गावोगावदेखील सिनेमा दाखवले जायचे. आंबेड्याच्या शांतादुर्गेच्या देवळात सतत एक आठवडा सिनेमा दाखवले गेले होते आणि एके दिवशी मी आईसोबत सिनेमा बघण्यासाठी गेलो होतो व आम्ही ‘तेच माझे घर’ हा सिनेमा पाहिला होता. त्यात मोठी आग लागते असे दृश्य होते, जे माझ्या अजूनही लक्षात आहे.

आम्ही नववीत असताना आमची सहल दांडेली, बेळगाव अशी गेली होती आणि आम्ही दोन्ही दिवशी दोन सिनेमा पाहिले होते. पहिल्या दिवशी ‘हिफाजत’ हा अनिल कपूर, माधुरी दीक्षित यांचा सिनेमा पाहिला.

त्यातील ‘बटाटेवडा’ हे गाणे अजूनही आठवते. तर दुसऱ्या दिवशी धर्मेंद्रचा ‘हुकूमत’ हा सिनेमा पाहिला होता धर्मेंद्रची दे दणादण फायटींग खूप आवडली होती. म्हणजे पहिला सिनेमा १९८१मध्ये तर त्यानंतर थेट १९८८मध्ये हे दोन सिनेमा त्यानंतर मात्र पुढच्याच वर्षी सरस्वती पूजनाच्या दिवशी वाळपईला नव्यानेच सुरू झालेल्या थेटरमध्ये अमिताभचा ‘शहेनशहा’ बघितला.

Cinema
वाणी कोण आहेत?

मी अमिताभचा बघितलेला हा पहिला सिनेमा. यावरून मला एक मजेशीर गोष्ट आठवली. साधारणतः बाकीचे सांगतात त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळे सांगायचे ही माझी तेव्हाची पद्धत म्हणजे अमिताभ आपला आवडता हिरो असे कोणी म्हटले की मी धर्मेंद्रचे नाव घ्यायचो. आवडता गायक आणि गायिका कोण हा तर माझ्यासाठी मोठा गहन प्रश्न होता.

माझा चुलतभाऊ विवेकदादा तो कोणत्याही गाण्याची नुसती धून ऐकली तरी गाण्याचे शब्द गायचा. तो खूप चांगला गातो, त्याहीपेक्षा नुसता आवाज ऐकून तो गायक गायिकेचे नाव अचूक सांगायचा, ही बाब विशेष होती. मला रफी, किशोर, मुकेश सगळे सारखेच. लता, आशा, उषा, अनुराधा माझा सगळाच गोंधळ.

त्यामुळे मी माझी आवडती गायिका म्हणून सलमा आगाचे नाव सांगायचो. कारण तिच्या ‘निकाह’ या सिनेमातील ‘दिल के अरमॉं आंसुओं में बह गए’ हे गाणे बरोबर ओळखता यायचे. एकदा आमच्या गावातील देवळात एक सिनेमा दाखवला जात होता व तो बघण्यासाठी आम्ही आलो होतो. सिनेमा सुरू होण्याआधी माहितीपट दाखवले जायचे.

Cinema
महाकवी होमर

त्यात ‘कॅन्सर कसा होतो’ यावर माहितीपट दाखवला गेला. त्यात सिगारेट ओढल्याने कॅन्सर होतो हे पुन्हा पुन्हा दाखवले जात होते. बाबा सिगारेट खूप ओढायचे. ‘म्हणजे बाबा ही आता कॅन्सरने मरणार’, या विचाराने मला रडू येऊ लागले आणि पुढे सिनेमा कोणता बघितला हे मला आता अजिबात आठवत नाही.

तसेच मी एकदा धारखंडावर रजूताईच्या घरी गेलो होतो तेथे जवळच्याच घरातील श्रीधर आला. त्याने काही दिवसांपूर्वीच नवीन रंगीत टीव्ही घेतला होता. म्हणून मला मुद्दाम आपल्याकडे घेऊन गेला. बाबा नुकतेच गेले होते त्यामुळे ते दुःख, भय सगळे मनात होते आणि टीव्हीवर ‘कटी पतंग’ सिनेमा दाखवला जात होता.

त्यातील ते हॉस्पिटल, ते सगळे वातावरण बघून आता आईला काहीतरी होणार, असे मला वाटू लागले. मी सिनेमा अर्धवट सोडून रजूताईच्या घरी आलो. मला रात्रभर झोप लागली नाही. मी अगदी सकाळी उठलो आणि घरची वाट धरली. आईला पाहिले तेव्हा जीव भांड्यात पडला.

Cinema
Restaurant: नव्या चवीचे नवे ठिकाण ‘ओ कामोतीम’

९२-९३ च्या दरम्यान परिषदेच्या कामानिमित्त अनेकवेळा पणजीत जात होतो. या काळात मात्र अनेक सिनेमा पाहिले. मी काही सिनेमांचा मोठा फॅन नाही. कारण अनेक सिनेमात जो आचरटपणा दाखवतात त्यामुळे तर माझे डोके उठते. पण अमीर खानचे अनेक सिनेमे मला खूप आवडले हे मात्र खरे.

काळ किती झरझर बदलतो! मी बघितलेला काळ आणि मी सांगत असलेल्या गोष्टी माझ्या मुलांनाच पाषाणयुगातील वाटाव्यात एवढा काळ बदलला. सिनेमांचे तिकीट पाच-दहा रुपयाला मिळायचे हे माझ्या मुलांना खरेच वाटत नाही.

ढेकूण नावाचा थेटरात हटकून भेटणारा प्राणी, मुले थेटरात जातात तेव्हा आजकाल जवळपासदेखील नसतो. किती बदलले सगळे. ते नायिकेभोवती घुटमळणारे हिरो, उघडे अंग दाखवत कधी फिरू लागले समजलेच नाही.

गाणे म्हणजे नाचणे हे समीकरण केव्हा झाले काही कळलेच नाही. नायिकेची बाहुली केव्हा झाली काहीच कळले नाही. फक्त आता एवढेच कळतेय की, आम्ही बघितला तो काळ आता एक सिनेमा झालाय. फक्त मलाच दिसणारा..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com