अनिल पाटील
रंगीबेरंगी पंखांची अद्भुत दुनिया म्हणून फुलपाखरांकडे पाहिले जाते. राज्यातील पश्चिम घाटातील सर्वच जंगलांमध्ये या दुर्मिळ दुनियेचे सहज दर्शन होते.
शहरांपासून थोडीशी वाकडी वाट केली आणि जंगलांचा रस्ता पकडला की ही दुनिया आपल्याला दर्शन देते, निसर्गाकडे नेते. समृद्ध आणि निकोप पर्यावरणाचे प्रतीक म्हणून फुलपाखरांकडे पाहिले जाते.
ज्या प्रदेशात अधिक प्रजातींची फुलपाखरे आढळून येतात, तो भूभाग पर्यावरणीयदृष्ट्या अधिक संपन्न आणि कमी अधिवास नुकसानीचा मानला जातो.
गोव्यात गेल्या २० वर्षांहून अधिक काळ फुलपाखरांचा अभ्यास करणारे रवींद्र भांबुरे म्हणाले, आम्ही प्रामुख्याने पश्चिम घाटात फुलपाखरांवर अभ्यास करतो.
सध्या इथे सांगे-कोठार्लीच्या शातिक्षा डेअरी आणि कृषी फार्मवर काम करताना अनेक फुलपाखरांचे दर्शन होते. म्हणूनच आम्ही फुलपाखरे पार्क विकसित केला आहे.
भारतात सुमारे पंधराशे जातींची फुलपाखरे आढळतात. आपल्या गोव्यात विविध अभ्यासकांनी आणि वन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शंभरपेक्षा अधिक प्रजातींची नोंद करण्यात आलेली आहे. त्यांच्यामध्ये रंग, सवयी, आकार यामध्ये भरपूर विविधता आहे.
‘सदर्न बर्डविंग’ हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू असून त्याचा पंखविस्तार १९० मिलिमीटर इतका असतो. तर सर्वात लहान फुलपाखरू ‘ग्रास ज्युवेल’ असून त्याचा पंखविस्तार केवळ १५ मिलिमीटर असतो.
ही दोन्ही फुलपाखरे आपल्या छोट्याशा राज्यात आढळून येतात. केवळ पश्चिम घाटात आढळून येणारी अनेक फुलपाखरे ही प्रदेशनिष्ठ (इंडेमिक) आणि दुर्मिळ फुलपाखरे आहेत. यात ब्ल्यू ऑक लिफ, सदर्न बर्डविंग, तमिळ लेसविंग, तमिळ योमन, ब्ल्यू मोरमॉन यासारख्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली आहे.
फुलपाखरे परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून अन्नसाखळीतील हा महत्त्वाचा घटक आहे. पक्षी, सरीसर्प व कोळी यांचे ती खाद्य बनतात.
निसर्गातील वातावरण बदलाचे संवेदनशील निर्देशक म्हणून फुलपाखरांकडे पाहिले जाते. ‘फुलपाखरे निरीक्षण’ हा एक अत्यंत आनंदादायी सोहळा आणि शारीरिकदृष्ट्या समाधान देणारा छंद मानला जातो.
वैविध्यपूर्ण रंग, आकार यामुळे फुलपाखरांची सर्वांनाच भुरळ पडते. हा पंखधारी षष्टपाद कीटक असून त्यांचा समावेश प्राणीसृष्टीतील ‘संदीपाद’ या गटात होतो. फुलपाखरांचा गण लेपिडोप्टेरा (खवलेयुक्त पंख) आहे.
ग्रीक भाषेत ‘लेपीस’ म्हणजे ‘खवले’ आणि ‘टेरॉन’ म्हणजे ‘पंख’ होय. सर्वसामान्य किटकांप्रमाणे फुलपाखरांनाही सहा पाय व पंखांच्या दोन जोड्या असतात. यांचे शरीर, डोके, वक्ष आणि उदर असे प्रमुख तीन भाग पडतात.
फुलपाखरांचे जीवनचक्र अंडी, अळी, कोष आणि फुलपाखरू अशा चार अवस्थेतून पूर्ण होते. फुलपाखरांचे प्रामुख्याने स्कीपर्स, ब्ल्यू, निम्फालीड, स्वलोटेल व व्हाईट आणि यलो अशा पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.