सुलक्षा कोळमुळे
(राज्य सहाय्यक ग्रंथपाल, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय)
ग्रंथालय शास्त्राचे जनक आणि गुरु डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथन यांच्या जयंतीप्रित्यर्थ, आज 12 ऑगस्ट हा ग्रंथपाल दिवस म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो.
माणसांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजात विद्यालये, महाविद्यालये, संशोधन केंद्रे, रुग्णालये आणि इतर संस्था स्थापन करण्यात आल्या. बरोबरच समाजाची ज्ञानाची, मनोरंजनाची, वाचनाची गरज भागवण्यासाठी ग्रंथालय चळवळ सुरू झाली.
ग्रंथालयाचे समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकस्वरूपी माहितीचे वाचन करून समाज शिक्षित होतो. वाचन केल्याने माणसाचा सर्वांगीण विकास होतो.
ग्रंथालय शास्त्राचे जनक रंगनाथन यांनी ग्रंथालयाची मांडणी आणि रचना कशी असावी याविषयी मार्गदर्शक तत्वे प्रकाशित केली. प्रत्येक पुस्तक वाचकापर्यंत कसे पोहोचेल आणि वाचक पुस्तकापर्यंत कसा पोहोचेल यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रंथालय स्थापन झाल्यावर त्याची मांडणी आणि रचना करण्यासाठी ग्रंथपाल तयार झाले.
व्यवसायिक शिक्षण घेऊन ग्रंथपाल ग्रंथालय सेवा प्रदान करतात. वाचकाला हवे ते पुस्तक किंवा हवी ती माहिती कमी वेळात उपलब्ध करून देणे हे ग्रंथपालाचे मुख्य काम आहे. पुस्तक आणि वाचक यांच्यामधील ग्रंथपाल हा दुवा आहे. रंगनाथन यांच्या मार्गदर्शक तत्त्वावर ग्रंथपाल सेवा बजावत असतो.
आजच्या डिजिटल युगात माहितीचे वेगवेगळे स्त्रोत उपलब्ध आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल, समाज माध्यमे यावर माहिती उपलब्ध होत असते.
आजची ग्रंथालये दोन माध्यमातून लोकांना सेवा देतात- ई जर्नल, ई-बुक्स याचबरोबर छापील पुस्तके लोकांच्या ज्ञानाची, मनोरंजनाची गरज भागवत असतात.
बदलत्या काळाप्रमाणे ग्रंथालयाचे बदलते स्वरूप ग्रंथपालांनी स्वीकारून व नवीन नवनवीन तंत्रे आत्मसात करून लोकांना ग्रंथालय सेवा प्रदान करायला हवी.
गोवा राज्याची ग्रंथालय चळवळ गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, जे 1932 साली स्थापन झाले तेथून सुरू झाली. आताचे कृष्णदास शामा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय संस्कृती भवन, पाटो-पणजी येथील पाच मजली इमारतीत वसलेले आहे.
हे वाचनालय गोव्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असते. या वाचनालयामध्ये 16 व्या शतकापासून तयार झालेले दुर्मिळ साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्याचे जतन करून पुढच्या पिढीपर्यंत तो सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा पोहोचवण्याचे काम हे ग्रंथालय करत आहे.
सर्व प्रकारच्या अद्ययावत ग्रंथालय सेवा या ग्रंथालयामध्ये वाचकांसाठी उपलब्ध आहेत. भारतात तसेच भारताबाहेर देखील या राज्य ग्रंथालयाची ख्याती आहे.
राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या अधिपत्याखाली सात सरकारी तालुका वाचनालये (डिचोली, सांगे वाळपई, मांद्रे, फोंडा, कुडचडे आणि काणकोण), तीन नगर वाचनालये (केपे, कुंकळी आणि साखळी) कार्यरत आहेत तसेच जेथे सर्व आधुनिक सोयी उपलब्ध आहेत असे जिल्हा वाचनालय सासष्टीमधील नावेली येथे कार्यरत आहे.
गोवा सरकार, कला आणि संस्कृती संचालनालय आणि राज्य मध्यवर्ती ग्रंथालय गोव्याच्या कानाकोपऱ्यात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी तसेच नवीन वाचनालय स्थापन करणे आणि असलेल्या वाचनालयांना नवी झळाळी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सामाजिक माध्यमातील आणि पुस्तक रूपात असलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वाचन संस्कृती टिकवण्यासाठी गोव्याची ग्रंथालय चळवळ कटीबद्ध आहे. या संदर्भात एक नवीन राज्य ग्रंथालय धोरण तयार केले जात आहे त्यात गोव्याच्या ग्रंथालय चळवळीला योग्य दिशा दाखवणारी तत्वे समाविष्ट असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.