डॉ. आरती दिनकर
goa monsoon 2023 : शायराला वेड लावणारा मोराला धुंद फुंद करणारा आणि ज्याच्या आगमनाची चाहूल लागताच सहस्रावधी सुगंधी कुप्या उधळून टाकणाऱ्या लाजऱ्या बुजऱ्या लतावेली माहेरवाशिणीसारख्या कुजबुज होऊ लागतात, हसू खिदळू लागतात असा हा वर्षा ऋतू मला अगदी वेड लावतो.
गहिवरलेले आकाश पाहिले की मला उगीचच उदास व्हायला होते. का कोण जाणे पण त्यावेळी मला वाटते देवाच्या देव्हाऱ्याला उजळून टाकण्याचे सामर्थ्य त्याच्या रेशमी झरझरणाऱ्या धारांमध्ये आहे. मग नकळत मनाचाही गाभारा उजळून जातो पावसानंतरच्या स्वच्छ शुभ्र निरभ्र आकाशासारखा!
मग निघतो पावित्र्य मांगल्याचा धूर. निघतात पवित्र प्रेमाचे सूर. दुमदुमून टाकतात सारा आसमंत आणि मधूनच एखादा राग गायला जातो. सतारीची तार छेडावीशी वाटते. बाहेर डोकावून बघावे तो निसर्ग बहुरूप्याचे सोंग घेऊन बसलाय की काय असे वाटते. रुसव्या गंध भारलेल्या पृथ्वीने तृप्तीचे सुस्कारे टाकून आपल्या अंगाखांद्यावर लडिवाळपणे लता वेलींना वृक्ष राजाने खेळवताना पाहिले की नातवंडे अवतीभवती घेऊन बसलेल्या आजीची मला आठवण येते.
यावेळी खोडकरपणे आकाशाच्या कोपऱ्यातून हा खेळ बघणारे इंद्रधनुष्य अधिकच विलोभनीय कमनीय दिसते. या आनंदाच्या डोही आनंद तरंगतो तो हात जोडून वर्षा ऋतूचे ऋण व्यक्त करण्याकरता हिरव्या पिकातून डोंगर-दऱ्या आणि भरगच्च वाहणाऱ्या नद्यांमधून हा वर्षा ऋतू जीवनाचा नवा अर्थ हसरे प्रसन्न व्यक्तिमत्त्व देऊन जातो.
वर्षभर उरात, पोटाशी साठवलेली दुःख वर्षाऋतूच्या आगमनाने सरीत्पावन होतात. उगीचच हलके वाटते. वर्षाऋतूच्या हिरवेपणात जाईजुई पारिजातकांचा राशींमध्ये स्वतःला हरवून बसण्यातच मी मला सापडते.
काळ्याकुट्ट मेघांनी भरलेले आकाश मला पाहवत नाही. पण या काळ्याकुट्ट तबल्यांवर आणि डग्ग्यावर सृष्टी सुंदरीचे विजेचे हात नाचू लागले की माझे मन मुग्ध होऊन जाते. पावसाचे दृश्य मनोवेधक तर खरेच! पण पावसाळ्यात सूर्याचे स्वागत करण्याकरता आकाश इंद्रधनुष्याचे तोरण उभारते असे मला वाटते.
पावसाचे स्वागत तरी कसे करावे? माझ्या मनात विचार आला आणि मला एक कविता सुचली : पाऊस स्वागतम्! पावसाचा आगमन झाले, म्हटले करावी एक कविता पावसावर. कसे करावे बरे पावसाचे स्वागत शब्द आले निथळत... पाऊस रुंजी घालत होता मनात, मृद्गंध आश्वासकतेचे बीज रुजतोय तनामनात. पावसात भिजणाऱ्या पक्ष्यांसारखे आडोसा शोधत होते. कवितेच्या झाडावर मनात पावसाचे थेंब गुंफून शब्द पडायला लागले टप टप टप टप ....
पाऊस झिरपला तना -मनातून
निथळले शब्द नि:शब्द होऊन
मन मुक्त श्वास घेतला भरभरून
पाऊस गंधाने गेले न्हाऊन
पाऊस भिजत रुजत गेला मनात
शब्द बिजांचे अंकुर फुलून
पावसाची कविता रुजली फुलली माझ्या कवितेच्या अंगणात.
किती वाट पहात होते पावसाची. मृगाचा पाऊस येणार याची खात्री होतीच आणि तो गडगडत आलाच! मस्त वाटले; तन मन भिजतेय कोसळणाऱ्या धारांनी. मृदगंध तनामनात आश्वासकतेचे बी रुजवतोय तनामनात.
असा हा बेभान झालेला पाऊस आला की माणसे आडोसा शोधतात. गाय वासरू पक्षी आपले पंख फडफडत कसे आपापल्या घरट्यात जाऊन बसतात. मोर थुईथुई नाचत आहेत पिसारा फुलवत आहेत आणि पोपटांचा थवा आकाशातून जाताना मला तर वाटते हिरवे पाचू तर कोणी आकाशात उधळले नाहीत ना? पांढरे पांढरे बगळे तर वाटले जाईजुईचे गजरे.
हे सगळे अनुभवताना खरेच असे वाटते की मी पावसाचा एक थेंब जरी झाले तर? किती छान कल्पना आहे नाही! रिमझिम पाऊस मनाच्या पलीकडे जाऊन अंतरंग टाकतो उजळून. मला दरवर्षी ओढ लागते या धुंद बरसणाऱ्या पावसाची गूढ, रम्य अनाकलनीय अशा निसर्गाची. पाऊस माझ्या तनामनात विरघळणारा नवजीवनाचे गीत गाणारा.
हा पाऊस आहे ना खूपच मजेशीर. रस्त्यावरच्या लोकांची गंमत पाहत बसतो. त्यांची फजिती झाली की याला मजा येते. कुणाजवळ छत्री नाही, कुणी पावसामुळे ओलेचिंब झालेले. तर कुणाची छत्रीच उडालेली असे दृश्य पाहिले की मला हा पाऊस जादूगार वाटतो. मला तर पाऊस माझा सखाही वाटतो कृष्णासारखा खट्याळ! यावरून मला माझी एक कविता आठवली; पाऊस माझा सखा.
पाऊस माझा सखा म्हणतो कसा
हा हिरवागार निसर्ग हसून बघ जरा
तल्लीन हो माझ्या संगीत आणि नृत्याच्या मैफलीत
नाच हवे तर छुमछुम करत
पाऊस मोठा खट्याळ
भिजवतो पावसात मला
आणि हसतो धो धो बरसून
मी लटक्या रागानं बघते पावसाकडे
तो आपला त्याच्याच मस्तीत
मी ओलेती बघून खट्याळ पाऊस
माझ्याकडे हसतो बघून म्हणतो
कसे भिजवले तुला माझ्या अंतरंगात
अन् पाऊस थेंब गोंदवून गेला मनात.
मग मीही त्याला म्हणते
मी तुझ्या अंतरंगात तू माझ्या मनात
विरघळून गेले फुलांच्या दवात
प्रेमाचे हळुवार गूज सांग माझ्या कानात
जपून ठेवते हृदयात.
कधीकधी ना हा मला पाऊस राजकारणी नेत्यासारखा वाटतो. केव्हाही पडतो. मन मानेल तसा वागतो थयथयाट करतो आणि निघून जातो परत येईन असे आश्वासन देऊन. असा हा पाऊस येतो तोच मुळी रुद्रावतार धारण करून.
कधी कधी हा पाऊस वागतो सत्ताधारी नेत्यासारखा, तर कधीकधी विरोधी नेत्यासारखा ठाम भूमिका घेऊन! असा हा अल्लड, खोडकर, खट्याळ पाऊस तनामनाला प्रफुल्लित करतो नक्कीच!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.