Goa Hotel
Goa Hotel Dainik Gomantak

Goa Hotel : चोवीस तास सेवा देणारं आंटी मारिया

Goa Hotel : इथं रात्री बारापर्यंत बिर्याणी मिळते. बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये रात्री अकरानंतर ऑर्डर घेतल्या जात नाहीत, मात्र आंटी मारियामध्ये रात्री बारापर्यंत ऑर्डर घेतली जाते. कॉफी शॉप रात्रभर सुरू असतं. सकाळी कॉन्टीनेंटल नाश्ता मिळतो. चीजकेक, पेस्ट्री, पफ्स क्रोइसेंटस, डोनटसाठी आंटी मारिया प्रसिद्ध आहेत.
Published on

मनस्विनी प्रभुणे-नायक

पूर्वी मी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या कॅफे, रेस्टॉरंटच्या शोधात असायचे. फिल्डवर्क जर एखाद्या आडवळणाच्या, दूरच्या गावात असेल तर तिथून पणजीत पोहोचायला उशीर व्हायचा.

साधारणपणे रात्री सात- आठपर्यंत फिल्डवर्क चालायचं. दुपारच्या वेळी घरी फक्त महिलाच असतात त्यामुळे सर्व्हेच्या सँपलमध्ये महिलांचं प्रमाण जास्त यायचं. मग यात पुरुषांचंदेखील प्रमाण जास्त यावं यासाठी नोकरीवरून परतणाऱ्या पुरुषांच्या मुलाखती संध्याकाळी सातनंतर घ्याव्या लागायच्या.

सांगे, काणकोण भागात जर काम असेल आणि रात्री आठ-साडे आठ वाजले असतील तर पणजीत पोहोचायला दहा - अकरा व्हायचे. फिल्डवर्क करणाऱ्या मुला-मुलींची टीम असायची. त्यांना आधी घरी सोडून यावं लागायचं. या सगळ्या गडबडीत रात्रीचं जेवण हा मोठा प्रश्न असायचा.

त्यावेळी उशिरापर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट सुरू नसायची. आठनंतर सगळीकडे सामसूम व्हायचं. २००७ किंवा २००८ च्या सुमारास पणजीत फिदाल्गो हॉटेलमध्ये ''आंटी मारिया'' नावाचं कॅफे सुरु झालं. फिदाल्गोच्या तळघरात त्यांनी 'फुडहब' सारखी रचना केली होती, जी आजदेखील आहे.

एकाच छताखाली अनेक चवींचं खायला मिळावं हाच उद्देश. शिवाय शाकाहारी, मांसाहारी, साऊथ इंडियन, मोगलाई अशा पदार्थाना स्थान दिलं. फिदाल्गोत सर्व प्रकारचे पदार्थ मिळतील अशी रचना करण्यात आली.

गोव्यात वेगवेगळ्या कामांसाठी येणाऱ्या वर्गाला सकाळचा नाष्टा आणि रात्री अगदी मध्यरात्रीपर्यंत कॉफी मिळण्याचं 'आंटी मारिया' हे महत्त्वाचं ठिकाण बनलं. खूपदा असं होतं की कामानिमित्त वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करावी लागते. बरेचदा ती समोरची व्यक्ती अनोळखी असते. अशा व्यक्तींना आपण चर्चा करण्यासाठी घरी बोलावू शकत नाही.

मग कुठेतरी कॉफी पिताना चर्चा करणं सोप्पं ठरतं. जिथं बसून आपल्याला चर्चा करता येईल असं ठिकाण - रेस्टॉरंट, कॅफे फार कमी. एकतर गर्दी, गोंगाट असतो. आणि अशा वातावरणात आपण चर्चा करु शकत नाही. आंटी मारियाने ही गरज ओळखून तशी जागा उपलब्ध करून दिलीय. थोड्याच अवधीत'आंटी मारिया' हे वेगवेगळ्या लोकांचं मिटींगचं ठिकाण बनलं.

आंटी मारिया सुरु होत असताना ॲप्रन घातलेली, नुकताच बेक केलेला केक हातात घेऊन उभी असलेली ‘आंटी मारिया’चं अतिशय बोलकं चित्र या कॅफेच्या काचेच्या तावदानावर रंगवलेलं दिसलं. आपल्या आजुबाजूला अशा अनेक 'आंटी' आहेत, त्यांचीच प्रातिनिधिक रुपे तिथल्या खिडकींवर, आतल्या भिंतींवर दिसतात.

मला आठवतंय अगदी सुरुवातीला त्या चित्राप्रमाणेच दिसणाऱ्या आंटी कॅफेत असायच्या. पेस्ट्री आणि केकच्या अनेक रेसिपीदेखील त्यांच्याच होत्या. इथं येणारे सगळेजण त्यांना 'आंटी मारिया' म्हणायचे.

पण गेल्या आठ -दहा वर्षात मी त्यांना बघितलं नाही. विशेषकरून कोविड काळात परत हा कॅफे सुरु झाला आणि अनेक बदल इथं दिसून आले. आधी इथं खूप मोठा मेनू नव्हता. पण आता मेनूमध्येदेखील बराच चांगला बदल झाला आहे.

काय मिळतं आंटी मारियामध्ये?

‘आंटी मारिया’ वेगवेगळ्या प्रकारांसाठी प्रसिध्द आहे. पण सर्वात आधी इथं मिळणाऱ्या काॅफीबद्दल सांगावं लागेल. व्यावसायिक मिटींग आणि चहा- कॉफीचं एक वेगळंच नातं असतं. लोकांनी यावं, वाफळत्या कॉफीसोबत इथं बसून चर्चा करावी हाच मुख्य उद्देश असल्यामुळे इथं कॉफीचे वेगवेगळे प्रकार सुरु केले.

यासाठी चांगली कॉफी देणारं मशिन इथं बसवण्यात आलं. अठरा जून रोडवर असा पहिल्यांदाच प्रयोग झाला. ''लवाझ्झा'' नावाच्या कॉफीच्या बिया या काॅफीसाठी वापरण्यात आल्या. आंटी मारियामध्ये शिरताच इथल्या कॉफी बियांचा सुगंध आपल्या नाकाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. या कॉफीच्या फेसावर हृद‌याचं, मोरपीस, झाडाचं पान अशी वेगवेगळी कारागिरी करून मिळणारी 'कॅपेचिनो' कॉफी बघता बघता लोकप्रिय झाली.

कॉफी पिण्यापेक्षा त्यावरील अनोखी कारागिरी बघण्यासाठी अनेकजण आंटी मारियाला जाऊ लागले. कॅपेचिनो, लॅटे, एक्स्प्रेसो अशा एकामागे एक वेगवेगळ्या कॉफीची आणि त्याच्या चवींची ओळख आंटी मारियाने करून दिली. फिल्टर कॉफी आणि नेसकुली पलीकडे अजून दुसरी कॉफी असते हे माहीतच नव्हतं.

'कॉफी' कशी प्यायला हवी. किती प्रमाणात प्यावी? कोणती कॉफी चांगली हे सगळं सुरुवातीच्या काळात चित्रातल्या आंटी मारिया सारखी वेशभूषा करणाऱ्या आंटीने दिली होती. फिल्टर कॉफीची सवय असणाऱ्या मंडळींना या कॉफीच्या नव्या प्रकारांना स्वीकारायला वेळ लागला.

इथं रात्री बारापर्यंत बिर्याणी मिळते. बाकीच्या रेस्टॉरंट मध्ये रात्री अकरानंतर ऑर्डर घेतल्या जात नाहीत, मात्र आंटी मारियामध्ये रात्री बारापर्यंत ऑर्डर घेतली जाते. कॉफी शॉप रात्रभर सुरु असतं. सकाळी कॉन्टीनेंटल नाश्ता मिळतो. चीजकेक, पेस्ट्री, पफ्स क्रोइसेंटस, डोनटसाठी आंटी मारिया प्रसिद्ध आहेत.

ख्रिसमस आणि ईस्टरच्या वेळी इथे अतिशय वेगवेगळ्या पध्दतीच्या केक, पेस्ट्री मिळतात. मला स्वतःला. इथला चीजकेक आवडतो. पूर्वी मी इथे 'हॉट चॉकलेट’ प्यायचे, पण आता इथली कॉफी आवडू लागली आहे. याशिवाय इथं सॅण्डविचचे वेगवेगळे प्रकार मिळतात. व्हेज आणि मटण चॉपदेखील चांगले असतात.

काठी रोलमध्ये चिकन भाणि मटण असलेले काठी रोल मिळतात. सकाळच्या नाश्तामध्ये ऑम्लेट, पॅनकेकदेखील मिळतात. फ्रेंच टोस्ट, स्मूदी नऊ-दहा प्रकारचे ऑम्लेट इथं मिळतं. ससू आणि सलाडचे प्रकारदेखील मिळतात. आटी मारियाचं सर्वात वेगळेपण असं की हे चोवीस तास सुरु असतं आणि असं चोवीस तास सुरु असणारं हे एकमेव कॅफे आहे.

Goa Hotel
Rakul-Jackky Wedding: वधू रकुल - वर जॅकी; स्थळ गोवा, हॉट कपलची लग्नपत्रिका व्हायरल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com