Horticultural Products: ‘नॉस्टाल्जिआ बनलेली ‘मल्लां’

सबिना शिकवते चुडते विणण्याची कला
Horticultural Products
Horticultural ProductsDainik Gomantak
Published on
Updated on

Horticultural Products गेल्या एक महिन्यापासून सबिना माडांच्या झावळांपासून (चुडतांपासून) ‘मल्लां’ बनवण्याच्या कार्यशाळा घेते आहे. अशा कार्यशाळा आपण घेऊ यावर तिचा विश्वासही बसला नसता पण चुडते विणण्याची ही कला लहानपणात आपल्याला शिकता आली याबद्दल ती आता आनंदच मानत असेल.

लहानपणी तिच्या घरी पावसाळ्यासाठी जळावू लाकडांची बेगमी एका खोलीत केली जायची. ही ‘कुड’ घराच्या बाहेरच्या अंगाला असल्यामुळे तिला विणलेल्या चुडतांनी (मल्लांनी) आच्छादित केले जायचे. त्यासाठी लागणारी ‘मल्ले’ विणण्याचे काम घरातली सारी मंडळी मिळून करायची. त्याची तयारी साधारण फेब्रुवारी महिन्यापासून व्हायची.

कारण संपूर्ण खोली आच्छादण्यासाठी सुमारे पाचशे ‘मल्लां’ची गरज असायची. फेब्रुवारी महिन्यात जेव्हा नारळ पाडायला भाटकार भाटात यायचा तेव्हा त्याला विनंती करून अथवा एक रुपयाला एक या दरात (त्या काळचा दर) सुकलेली चुडते मिळवली जायची.

चुडते सुकलेली असल्यामुळे आदल्या रात्री त्यावर पाणी शिंपडून, ती थोडी सरळ होण्यासाठी त्यावर जड दगडांचे ओझे ठेवले जायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती ओलसर असतानाच विणायला सुरुवात व्हायची.

घरातली ज्येष्ठ मंडळी चुडते विणताना लहान मुलेही त्यांना आपल्या परीने मदत करायची. चुडते विणण्यात कुशल असणाऱ्या घरातील वयस्कर मंडळीकडून दिवसाला ६ ते ७ ‘मल्ले’ विणून व्हायची तर सबीना सारखी सहा-सात वर्षांची मुले साधारण एखादेच ‘मल्ल’ विणू शकायची. चुडतांमधल्या पात्यांच्या टोकाला गाठ मारणे हे कौशल्याचे काम असते.

ते काम मात्र सबीना आपल्या ज्येष्ठांकडे सोपवायची. सबिना सांगते, ‘हे त्या काळात ‘मल्ले’ विणणे हे एक प्रकारचे आवश्यक काम होते. प्लास्टिकचे आच्छादन बाजारात यायला त्यावेळी नुकतीच सुरुवात झाली होती आणि तुलनेने आम्हाला ते महागच वाटायचे.’

तिच्या गावातील ९०% घरांच्या भिंतींना पावसाळ्यात विणलेली ‘मल्ले’च संरक्षण द्यायची. त्यामुळे चुडते विणण्याचे काम आणि नंतर ती भिंतीभोवती बांधण्याचे काम गावातील सारेजण एकमेकांना मदत करत करायचे. मात्र पुढील काळात प्लास्टिक सर्वांनी स्वीकारले आणि चुडते विणून ‘मल्ले’ बनवणे जवळपास बंदच झाले.

Horticultural Products
Asian Games: गोमंतकीय फुटबॉलपटूंविना भारतीय संघ

मग आताच्या काळात ‘मल्लां’ची गरज नसताना त्यांच्या कार्यशाळा कशा काय आयोजित होतात? या प्रश्नाला सबीना हसून उत्तर देते, ‘एकेकाळचे हे श्रमदायक काम आता लोकांचा ‘नॉस्टाल्जिआ’ बनून पुन्हा अवतरले आहे. आपल्या वाड-वडलांच्या किंवा आपल्या बालपणात होणाऱ्या ‘मल्लां’चा वापर आताच्या पिढीला पुन्हा समजून घ्यायचा असतो.

त्यांना त्यांच्या स्मृती पुन्हा ताज्या करायच्या असतात. हे एक कारण झालेच पण पर्यटकांनादेखील त्यात कुतूहल असते. माझ्या पहिल्या कार्यशाळेला सहा रशियन पर्यटकांनी हजेरी लावली होती.

त्याशिवाय काही हॉटेल-रिझॉर्टसना, त्यांच्या संकुलात ‘मल्लां’चा कलात्मक वापर करायचा असतो. काही जणांना हे विणकाम शिकून स्वतःच्या स्वतंत्र कलाकृती बनवायच्या असतात. काही उच्चभ्रू घरे पावसाळ्यात बाल्कनीसाठी प्लास्टिकऐवजी अजून ‘मल्ले’च पसंत करतात.’

Horticultural Products
Goa Cricket: मोहित रेडकरचे संस्मरणीय पदार्पण, पहिल्याच सामन्यात टिपले मध्य विभागाचे तीन गडी

गेल्या एका महिन्याच्या काळात सबिनाने सुमारे ७ कार्यशाळा घेतल्या आहेत. काही महाविद्यालये व शाळांनीदेखील अशा कार्यशाळा आयोजित करण्यात रस दाखवला आहे. सबीनाने रसायन शास्त्रामध्ये ‘मास्टर्स’ मिळवली आहे.

पण तिच्या मुलाच्या आरोग्यविषयक समस्येमुळे ती सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे तिला नोकरी करणे सध्या शक्य नाही. शनिवार-रविवार या अशा दिवसात होणाऱ्या या कार्यशाळांमुळे तिला थोडा आर्थिक हातभारही लाभतो.

सबिना डा कुन्हा या तिच्या फेसबुकवर अथवा sabinadacunha@gmail.com या ईमेलवर तिला कार्यशाळेसाठी संपर्क करता येतो. खाजगी संस्थाच नव्हे तर तारांकित रिझॉर्ट्समधूनही तिच्या या कार्यशाळा आयोजित होत असतात. बालपणी मौज म्हणून केलेले अंगमोडीचे हे काम तिच्यासाठी आता कलाविशेष बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com