प्रसन्न शिवराम बर्वे
आश्रम चतुष्टयातील मूल्यांची विभागणी पाहिल्यास ढोबळमानाने ऊर्जेचे व्यवस्थापन, विकारांचे संयमन, योग्य प्रकारे व योग्य ठिकाणी त्यांचा उपयोग, हे करताना जे अनुभव प्राप्त झाले त्यावर एकांतात चिंतन आणि सर्वांत शेवटी त्याचे लोकार्पण, अशी रचना आहे.
पहिले जे ब्रह्मचर्य मूल्य आहे, त्याचे पालन गृहस्थाश्रमातही सांगितले आहे. शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचे जे संयमातून संरक्षण व व्यवस्थापन ब्रह्मचर्याश्रमात केले, त्याचा योग्य ठिकाणी उपयोग गृहस्थाश्रमात कसा करावा, याचे नियम अनेक स्मृती, पुराणे, चरित्रे (गुरुचरित्र) यांत सांगितले आहेत.
काळानुसार त्यात बदलही घडत गेल्याचे दिसते. पण, ब्रह्मचर्याश्रमात ऊर्जा आणि वीर्य यांचे रक्षण करण्याविषयी स्पष्ट उल्लेख अनेक संहितांमधून, स्मृतींमधून आढळतात. इंद्रियांचे दमन न करता त्यांना ताब्यात कशी ठेवावीत याविषयी विशेष भर ब्रह्मचर्याश्रमात देण्यात आला आहे.
आजकाल आपण त्याविरुद्ध वागत वीर्यस्खलन, हस्तमैथुन अशा अनेक गोष्टींचे सामान्यीकरण (नॉर्मलाइझेशन) करत आहोत. सिनेमासारख्या माध्यमातून संयमाचे सर्वांत मोठे उदाहरण असलेल्या महादेवाला (नंतर त्याचे गण किंवा शिवदूत केले गेले) हस्तमैथुनाचे, वीर्यनाशाचे सामान्यीकरण व समर्थन करण्यासाठी पाचारण केले आहे;
तेही त्याविषयीचा एकही संदर्भ न देता. बहुपत्नीत्व व विवाहबाह्य संबंध हे कसे ‘नॉर्मल’ आहेत, हे सिद्ध करण्यासाठी श्रीरामचंद्राला पडद्यावर नाही झळकवले, म्हणजे मिळवली.
गृहस्थाश्रम हा समाजाचा आधार आहे. घेतलेले शिक्षण, केलेले संयमन यांना प्रयोगात आणण्याची संधी गृहस्थाश्रमात मिळते. ब्रह्मचर्याश्रम ही जशी गृहस्थाश्रमाची पूर्वतयारी आहे, तशीच गृहस्थाश्रम ही पुढील दोन आश्रमांची पूर्वतयारी आहे. यात आपण समाजाशी, व्यवहाराशी थेट जोडले जातो.
कसे वागावे, कसे वागू नये याचे स्वत:पुरते का होईना नियम ठरवत जातो. केवळ आपल्यासाठी न जगता, इतरांसाठी जगण्याचे शिक्षण आपण गृहस्थाश्रमात घेतो. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत गृहस्थाश्रमीने काय काय करावे व काय काय करू नये याचे असंख्य नियम आहेत.
पण, आताच्या काळात त्यातील सर्वच नियम पाळणे शक्य नाही. अग्निहोत्र, त्रिकाल स्नान व पूजा, वैश्वदेव, दाने, श्राद्ध, तर्पण आदी अनेक गोष्टी जशाच्या तशा कृतीत आणणे शक्य नाही. पण, जरी कृती शक्य नसली तरी त्यामागची संकल्पना व भावना जपणे शक्य आहे. एवढेच नव्हे तर आग्रहाने ती शिकावी व जपावी.
यातील प्रत्येक गोष्ट व त्यामागील संकल्पना स्पष्ट करत गेल्यास याचा प्रचंड विस्तार होईल. पण, काही त्रोटक माहिती देणे खूपच आवश्यक आहे. ज्यांचे स्वत:चे घर आहे, अशा लोकांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. लहानपणी आई सांगायची, ‘घरात फुटले, संपले, कमी आहे किंवा नाही असे शब्द उच्चारू नकोस’.
का, या प्रश्नाचे उत्तर ती ‘वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो’, असे देई. त्याऐवजी ‘वाढवले, जास्त झाले, आहे’, असे शब्द उच्चारण्याची जी सवय झाली, ती आजतागायत आहे. ही फार म्हणजे फार साधी गोष्ट आहे.
पण, सकारात्मक ऊर्जा, विचार करण्याची प्रचंड क्षमता नकळत विकसित होत गेली, हे आता कळते. घरात भांडू नये, अपशब्द वापरू नयेत, हेसुद्धा संस्कार त्यासोबत झाले. पण, प्रसंगोपात्त त्यांचे पालन होतेच असे नाही. पण, नियंत्रण ठेवता येते हे निश्चित.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देवकार्य आणि पितृकार्य हे दररोज न चुकता करावे. देवकार्य म्हणजे देवाची पूजा. नास्तिक असणे म्हणजे अश्रद्ध असणे नव्हे. आपले सत्कार्य हीच देवपूजा समजून श्रद्धेने व प्रामाणिकपणे ते करावे. वास्तुपुरुष उच्चारलेल्या प्रत्येक गोष्टीला ‘तसेच होवो’ असे म्हणतो हे स्मरून बोलण्यावर, विचार करण्यावर ठेवलेले नियंत्रण हेसुद्धा देवकार्यच आहे.
पितृकार्य म्हणजे केवळ श्राद्ध नव्हे; तर आपल्या पूर्वजांचे स्मरण व त्यांच्याविषयी कृतज्ञता. अगदी आपल्या आईवडिलांशी कितीही मतभेद असले, स्वभाव पटत नसले, वडील मद्यप्राशन करत असले किंवा दुर्गुणांची खाण असले तरीही, त्यांच्यामुळे आपण जन्मलो, एवढे तरी निदान स्मरण ठेवावे.
वृद्ध असलेल्या आईवडिलांशी दररोज किमान पंधरा मिनिटे तरी प्रत्यक्ष संवाद साधावा. त्यांच्याशी बोलावे व त्यांचे ऐकावे. त्यांच्याविषयी आपले प्रेम, आदर नसतो अशातला भाग नाही, पण आपण त्यांच्या शारीरिक, मानसिक व वैद्यकीय गरजांचा विचार करतोच असे नाही. कधी कधी ते आपल्या लक्षातही येत नाही.
कटाक्षाने या गोष्टींकडे लक्ष द्यावे. जिवंत असेपर्यंत आईवडिलांना ढुंकूनही पाहायचे नाही आणि ते मेल्यानंतर त्यांच्या नावाने देवळात फंडपेटी दान करायची; त्यातही ‘आईवडिलांचे नाव व त्यांच्या स्मरणार्थ’ हे बारीक अक्षरात लिहायचे व आपले नाव मोठ्या अक्षरांत लिहायचे, असली विटंबना म्हणजे अधर्मच आहे.
पूर्वजांची (आपल्या आधीच्या तीन पिढ्यांची) श्रद्धेने, कृतज्ञतेने काढलेली आठवण व त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे श्राद्ध. विधी म्हणून जे आपण श्राद्धकर्म करतो ते तिथीला त्यांचे श्रद्धेने केलेले स्मरण.
वाईट वाटते सांगायला, पण अनुभव असा आहे की अनेकांना फार फार तर आजोबांचे नाव माहीत असते. कुठेतरी कोपऱ्यात बसलेली म्हातारी पणज्याचे किंवा पणजीचे नाव सांगते. ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठी किंवा ‘ब्राह्मणांना दिले म्हणजे पितरांना पोहोचते’ यासाठी श्राद्ध नाही.
देवकार्य व पितृकार्य ज्या घरात होते, त्या घरातील अर्ध्या समस्या नाहीशा होतात. उर्वरित समस्या या आपल्या कर्माने ओढवलेल्या असतात. गृहस्थाश्रम धन्य करायचा असेल, तर या दोन गोष्टी निष्ठेने व श्रद्धेने सांभाळाव्यात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.