Goa Floods Impact: पुरामुळे उजळणार बोणकेवाडाचे भाग्य?

रस्‍त्‍याअभावी मदतकार्यात अडथळा; वांते-सत्तरीतील दुर्लक्षित राहिलेला भाग
वांते-सत्तरीतील दुर्लक्षित राहिलेला भाग
वांते-सत्तरीतील दुर्लक्षित राहिलेला भागDainik Gomantak

पर्ये : गोव्‍याला (Goa) स्‍वातंत्र्य मिळवून ७० वर्षे उलटली तरी सत्तरीतील (Satari) भिरोंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील बोणकेवाडा-वांते हा भाग रस्त्यासारख्या आवश्यक सोयीसुविधांपासून अजून दूरच राहिला आहे. या वाड्याचे कोणाला सोयरसुतकही नव्हते. पण नुकत्याच म्हादई नदीला (Mandovi River) आलेल्‍या पुरामुळे (Floods) या वाड्यावरील एक घर जमीनदोस्त झाले. घर पडल्याची माहिती कळल्यानंतर येथे मदत करण्यासाठी कार्यकर्ते, राजकारणी येऊ लागले. त्यांना रस्त्याअभावी तेथे पोहोचायला बरीच अडचण आली. मदतकार्यातही अडथळे आले. या प्रकारामुळे हा दुर्लक्षित भाग आता प्रकाशात आला आहे. यानिमित्ताने तरी या रस्त्याचे भाग्‍य उजळणार का, याचीच लोकांना उत्‍सुकता लागून राहिली आहे.

बोणकेवाड्याचे भौगोलिक स्थान अडचणीच्या ठिकाणी आहे. वांते गावातील डोंगरापलीकडे म्हादईच्या उजव्या तीरावर हा छोटासा तीन घरांचा वाडा आहे. दुसऱ्या बाजूने या वाड्याला डिचोली तालुक्यातील आंबेशी-पाळी तर नदीपलीकडील गांजे आणि गुळेळी अशी गावे जोडतात. या वाड्यावर जाण्यासाठी वांतेहून सुमारे पाच किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे. पावसाळ्यात तो रस्ता पूर्णपणे खराब होतो. तर, दुसऱ्या बाजूने आंबेशी किंवा गांजेला जाण्यासाठी तीन-चार किलोमीटर अंतर पायपीट करून कापावे लागते.

बोणकेवाडा येथील ग्रामस्थ.
बोणकेवाडा येथील ग्रामस्थ.Dainik Gomantak
वांते-सत्तरीतील दुर्लक्षित राहिलेला भाग
Goa: मडगावात ‘कासा मिनेझिस’ इमारतीचा भाग कोसळला

बोणकेतून वांतेला जाण्यासाठी सुमारे एक ते दीड तास पायी प्रवास करावा लागतो तर गांजेला जाण्यासाठी एक तास पायपीट करावी लागते. म्हणजेच या वाड्यावरील लोकांना दुसऱ्या लोकांना भेटण्‍यासाठी एक तास प्रवास करावा लागतो. अशा या अडगळीतील भागात पक्का रस्ता झालाच नाही. किंबहुना या रस्त्यासाठी जमीनदार आडकाळी आणत असल्याने त्‍यांचे स्वप्न अधुरे राहिले. सुमारे २५ लोकवस्तीच्या या वाड्याला रस्त्याअभावी जीवन जगावे लागत आहे.

अर्धवट घर धोकादायक

म्हादई नदीला पूर येऊन आता एक आठवडा उलटला आणि पाणी ओसरले तरी या घराची साफसफाई करून पुन्हा नव्याने घर उभारण्यासाठी काहीच तयारी अजून झाली नसल्‍याचे प्रस्‍तुत प्रतिनिधीने तेथे भेट दिली असता आढळून आले. याबाबत उत्तम गावडे यांनी सांगितले की, अर्धे घर कोसळले आहे तर अर्धे भिंतीना भेगा पडून मोडकळीस आले आहे. त्यामुळे आत जाऊन काम करणे धोकादायक आहे.

वांते-सत्तरीतील दुर्लक्षित राहिलेला भाग
Goa: मातीला सुंदर आकार देणारे, अरुण पालयेकर

गरीब आदिवासी कुटुंबाचे घर जमीनदोस्त

येथील तीन घरांपैकी उत्तम शाणू गावडे व पांडुरंग शाणू गावडे या दोन भावांचे एकत्रित घर म्हादईच्या तीरावर होते. हा वाडा गांजे बंधाऱ्याच्या वरच्या बाजूने काही अंतरावर आहे. म्हादईच्‍या पुरात गुळेली, कणकिरे, वांते, पाडेली, अडवई, सावर्शे, भिरोंडा, खोतोडे, खडकी या गावांना जो पुराचा तडाखा बसला त्याला गांजे बंधारा हासुद्धा एक कारण ठरले आहे. आणि त्यात बोणकेवाडा येथील गावडे यांचे घर भुईसपाट झाले. बंधाऱ्यामुळे म्हादईचे पाणी अचानकपणे वाढत गेले. त्यांना अंदाज आलाच नाही. घरातील सामान बाहेर काढल्यास वेळ मिळाला नाही. जीव वाचवण्यासाठी त्यांनी घर सोडले आणि काही वेळातच त्यांचे अर्धेअधिक घर कोसळले. राहिलेले अर्धे घर धोकादायक स्थितीत आहे व ते कोणत्याही वेळी कोसळण्याची शक्यता आहे. मुळात गरीब असलेल्या या आदिवासी कुटुंबाचे मातीचे घर या पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळल्याने घरातील सर्व सामान त्यामध्ये गाडले गेले. त्यामुळे त्यांना मोठे नुकसान झाले असून त्‍यांच्‍यावर संकट ओढवले आहे. घरात तीन मुलांसाह एकूण आठ सदस्य आहेत. सद्य:स्‍थितीत ती सर्व मंडळी शेजारच्या घरात आसऱ्याला आहेत.

रस्त्याअभावी विकास खुंटला

गावात रस्ता नसल्याने बोणकेवाडा आणि तेथील लोकांचा विकास खुंटला आहे. रस्ता नसल्याने गावातून बाहेर जायला बराच वेळ लागतो. अशाने बाहेर गावी जाऊन रोजगार करणे त्यांना शक्य होत नाही. येथील दोन आदिवासी कुटुंबांना स्वतःच्या मालकीची शेतजमीन नसल्याने त्यांना येथील एका जमीनदाराच्या बागायतीत काम करावे लागते. हे काम हे अनियमित असते. त्यातून त्यांचा मिळणारा रोजगार अल्प आहे. अशाने रस्त्याअभावी त्यांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे.

लोकप्रतिनिधींच्या भेटीसाठी सोय

बोणकेवाडा येथे घर पडल्याची माहिती राजकारण्यांना मिळाल्यानंतर सुरुवातीला रस्‍त्‍याअभावी या ठिकाणी कोणी पोचले नाही. त्यानंतर काही दिवसांनी येथील एका नेत्याच्या बायकोने या ठिकाणी भेट दिली. विशेष म्हणजे या भेटीपूर्वी पावसामुळे खराब झालेहा हा रस्‍ता जेसीबीच्‍या साहाय्‍याने सुरळीत करण्‍यात आला. मग त्यानंतर आणखी काही लोकप्रतिनिधींनी या वाड्याला भेट दिली. काही का असेना, त्‍यामुळे रस्‍ता थोडा फार तरी सुरळीत झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com