Goa Election: कुडतरी मतदारसंघात कौल कुणाच्या बाजूने?

गोव्यातील मतदारसंघ पुनर्रचनेतील बदल कुणाच्‍या पथ्‍यावर पडणार; तृणमूलच्‍या एन्‍ट्रीमुळे वाढली चुरस
Goa Election: कुडतरीचा कौल कुणाच्या बाजूने?
Goa Election: कुडतरीचा कौल कुणाच्या बाजूने?Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोवा मुक्तीनंतर सुरुवातीला युनायटेड गोवन्स व नंतर दोनवेळेचा अपवाद सोडला, तर सतत काँग्रेसबरोबर असलेला कुडतरी मतदारसंघ यावेळी कोणाच्या बाजूने कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॅथलिक बहुल मतदार असलेल्या या मतदारसंघात गेल्या काही वर्षांत परप्रांतीय मतदारांचे प्रमाण जसे वाढलेले आहे, त्याचप्रमाणे मतदारसंघ पुनर्रचनेवेळी घोगळ व अमृतनगर हा भाग समाविष्ट केल्याने या मतदारसंघात बरेच बदल झालेले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय संतुलनात पूर्वीची गणिते बसत नाहीत हेही खरे आहे.

2007 पासून आलेक्स लॉरेन्स रेजिनाल्ड हे विधानसभेत कुडतरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सुरवातीला सेव्ह गोवा फ्रंटचे उमेदवार म्हणून ते निवडून गेले असले तरी त्या नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व सलग दोन निवडणुकीत ते काँग्रेसचे आमदार बनले. गेले काही महिने ते पक्षात अस्वस्थ आहेत. त्याबाबतची नाराजी त्यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे यावेळीही ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहाणार काय, असा प्रश्‍नही सध्या आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत ज्या राजकीय घडामोडी झालेल्या आहेत त्यामुळे एकंदर चित्र अस्पष्ट आहे. ते कोणत्याही पक्षाचे उमेदवार राहिले तरी कुडतरीतील मतदारांवर त्यांचा बराच प्रभाव आहे.

‘आप’चा कार्यविस्तार

या मतदारसंघात भाजपचे असे बऱ्यापैकी मतदारही आहेत. घोगळ भाग या मतदारसंघात आल्यानंतर त्यात मोठी भरही पडली. पण ती काँग्रेसच्या एकगठ्ठा मतांवर मात करू शकलेली नाही. त्यामुळे ‘आप’ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस वा आता गोव्याच्या राजकारणात प्रवेश केलेला तृणमूल काँग्रेस पक्ष या पक्षांकडे मतदार कितपत वळतील व ते कुणाचे असतील यावरच मतदारसंघातील निवडणुकीतील चित्र बरेचसे अवलंबून राहाणार आहे. यापूर्वी भाजपतर्फे डॉमनिक गावकर (2012) व नंतर 2017 सालच्या निवडणुकीत आर्थुर डिसिल्वा यांनी निवडणूक लढवून आपली ताकद दाखवून दिली होती. यावेळी भाजप तसेच ‘आप’नेही मतदारसंघात कार्यविस्तार केला आहे व त्यांचे उमेदवार कोण असतील त्यावरही निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Dainik Gomantak

जि.पं. सदस्‍यांची भूमिका महत्त्‍वाची

जिल्हा पंचायत सदस्य असलेले डॉमनिक गावकर, मोरेन रिबेलो हे एकंदर राजकीय स्थितीत कोणती भूमिका घेतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे. मोरेन यांनी तर अनेक पक्षांनी आपणाकडे उमेदवारीसाठी संपर्क साधल्याचे सांगून निवडणूक रिंगणात उतरण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे. भाजपचे उमेदवार म्हणून सध्या एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोझा यांचे नाव घेतले जात आहे.

प्रबळ कोण, उमेदवार की पक्ष?

यावेळची निवडणूक ही उमेदवार की पक्ष प्रबळ ते ठरविणारी असेल, असे संकेत मिळत आहेत. आमदार रेजिनाल्ड यांनी या दिवसांत जे संकेत दिले आहेत, त्यावरून तेच काँग्रेसचे उमेदवार असतील की अन्य कोणत्या पक्षाचे ते स्पष्ट होत नाही. त्यावरून निवडणुकीपर्यंत राजकीय चित्र काय असेल, त्यावरही बरेच काही अवलंबून रहाणार आहे. काँग्रेससह भाजप, आप तसेच तृणमूल काँग्रेसनेही सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे कुडतरीतही या पक्षांचे उमेदवार असतील. ते कोण ते मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ते जाहीर होताच चुरस कोणामध्ये आहे, हे स्पष्ट होणार आहे. प्रत्यक्षात रेजिनाल्ड यांनी तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य असलेले मोरेन रिबेलो यांनीच निवडणुकीची तयारी चालविलेली असली, तरी भाजपने उमेदवार निश्र्चित न करता आपला प्रभाव असलेल्या भागांत कार्य सुरू केले आहे.

Goa Election: कुडतरीचा कौल कुणाच्या बाजूने?
Goa Election: कुंकळ्ळी मतदारसंघात इच्छुकांची भावूगर्दी

‘आप’, ‘तृणमूल’मुळे वाढणार रंगत

या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्‍व होते. आलेक्‍स रेजिनाल्‍ड यांनी सलग तिनवेळा विजय मिळविलेला आहे. आता विजयी चौकार लगावण्‍याच्‍या ते पवित्र्यात आहेत. मात्र, यावेळी ते काँग्रेसपर्यंत उमेदवारी मिळवून निवडणूक लढविणार की अन्‍य पक्षाद्वारे ते लवकरच समजेल. सध्‍या तृणमूल काँग्रेसमध्‍ये जाणार असल्‍याची अफवा आहे. काही महिन्‍यांपासून ते नाराजही आहेत. पण ते काय निर्णय घेतात ते लवकरच समजेल.

समस्‍यांचे मुद्दे गाजणार

मडगाव पालिका क्षेत्रांतील सोनसोडो कचरा यार्ड, माकाझन येथील कुष्ठरोग इस्पितळ भागांत सरकारने आयआरबी कॅम्पसाठी सुरू केलेल्या हालचाली, मोठ्या प्रमाणात होत असलेला भू-विकास या कुडतरी मतदारसंघातील समस्या असल्या तरी त्यावरून कोणी आक्रमक भूमिका घेतलेली नाही की निवडणुकीत ते मुद्दे गाजतील, असे सध्या तरी वाटत नाही. मात्र, एकंदर स्थिती कोणत्याही क्षणी पालटू शकते हे यापूर्वीच्या घटनांवरून लक्षात येते. ग्रामस्‍थांना विचारात न घेता आणू पाहत असलेल्‍या प्रकल्‍पांमुळे ऐनवेळी ग्रामस्‍थ विरोध करीत असल्‍याने प्रकल्‍पांवर परिणाम होत आहे. मात्र, सरकार व लोकप्रतिनिधींनी लोकांना पूर्ण विश्‍वासात घेऊनच प्रकल्‍प साकारले पाहिजेत.

Dainik Gomantak

मतदारांचा काँग्रेसला पाठिंबा

कुडतरी मतदारसंघाने सतत काँग्रेसची पाठराखण केली, तरी संधी मिळाली तर आपले वेगळेपण एकदा नव्हे तर दोनदा दाखवून दिले ते फ्रान्सिस सार्दिन हे काँग्रेस उमेदवार असताना. एकदा युगोडेपाच्या आंतोन गावकर यांना व दुसऱ्या वेळी सेव्ह गोवा पार्टीच्या आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना भरघोस मतांनी निवडून देऊन मतदारांनी बदल घडवला होता. कदाचित तात्कालिक स्थिती व प्रश्र्न हे त्या मागील कारण असावे. मात्र, त्यातून संबंधित पक्ष वा उमेदवार यांना त्यांनी आपणाला गृहित धरू नका, असाच संदेश दिला हेही तेवढेच खरे.

- प्रमोद प्रभुगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com