Goa Election: ‘तृणमूल’च्या ‘एन्‍ट्री’ ने गणित बदलणार

काँग्रेसचा बालेकिल्ला संभ्रमात फालेरोंना आठव्‍यांदा वर्चस्‍व राखण्‍याचे आव्‍हान; उत्‍सुकताही वाढली
Goa Election: ‘तृणमूल’च्या ‘एन्‍ट्री’ ने गणित बदलणार
Goa Election: ‘तृणमूल’च्या ‘एन्‍ट्री’ ने गणित बदलणारDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सुरवातीला युनायटेड गोवन्स व नंतर काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नावेली मतदारसंघ फक्त तीन वेळाच दुसऱ्या पक्षाच्या हाती गेला. पहिल्यांदा लुईझिन फालेरो हे काँग्रेसमधून फुटून 1984 मध्ये गोवा काँग्रेसमध्ये (Goa Congress) गेले तेव्हा, त्यानंतर 2012 मध्ये चर्चिल आलेमाव यांनी फालेरो यांचा पराभव केला आणि तिसऱ्यांदा जेव्हा आवेर्तान फुर्तादो यांनी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव यांचा पराभव केला तेव्हा, याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार असलेले लुईझिन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आता नावेलीत काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

फालेरोंची जबरदस्‍त पकड

फालेरो हे तब्बल सात वेळा नावेलीतून जिंकून आल्याने त्यांची या मतदारसंघावर जबरदस्त पकड आहे. मात्र, असे सांगितले जाते की यावेळी ते स्वतः निवडणूक न लढविता दुसऱ्याला तृणमूलच्या उमेदवारीवर उभे करणार आहेत. त्यामुळे आजपर्यंत जे मतदार फालेरो यांना मतदान करायचे ते आता फालेरो यांनी उभा केलेल्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? हा खरा प्रश्न आहे. आजपर्यंत चर्च संस्‍था फालेरो यांच्यामागे खंबीरपणे उभी राहायची, ती यावेळी काँग्रेस पक्ष त्यागानंतरही तशीच उभी राहणार का? या दोन प्रश्नावर या मतदारसंघात काँग्रेस की तृणमूल हे ठरणार आहे. फालेरो यांचे निकटवर्तीय किसन फडते हे तृणमूलचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. अतुल वेर्लेकर, स्टीव्हन गोम्स व झाकारीस गोईस यांचीही नावे घेतली जात आहेत.

वालांका आणि प्रतिमा?

2012 च्या निवडणुकीत बाणावली मतदारसंघातून जबरदस्त पराभव स्‍वीकारवा लागलेली चर्चिल आलेमाव यांची कन्या वालांका आलेमाव यांनी यंदा नावेलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. त्यांनी या मतदारसंघात आपला प्रचारही सुरू केला आहे. पूर्वीच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष व आताच्या ‘आप’च्या उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनीही रिंगणात उतरण्याचे ठरविले आहे. रेशन वाटण्याच्या माध्यमातून त्या नावेलीच्या घराघरांत पोहोचल्या आहेत. नावेलीत ‘आप’ने स्वतःचे असे स्थान तयार केले आहे. वालांका आणि प्रतिमा या दोघांनीही काँग्रेसला पर्याय म्हणून आपले नाव पुढे आणले होते. आता लोकांसमोर तृणमूल हा तिसरा पर्याय उभा झाल्याने चुरस वाढली आहे.

Dainik Gomantak

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

2007 च्या निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात स्वतःची मतपेढी उभी केलीही होती. मात्र 2012 व 2017 च्या निवडणुकीत भाजपने स्वतःचा उमेदवार निवडणुकीत न उतरवता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर 2022 च्या निवडणुकीत भाजप काय भूमिका घेणार, हा प्रश्न सध्या येथे चर्चेत आहे. सध्या या मतदारसंघात भाजप उमेदवारीवर सत्यविजय नाईक, उल्हास तुयेकर व परेश देसाई या तिघांनी एकाचवेळी दावा केला आहे. त्यातून एकाला उमेदवार म्हणून जाहीर करण्यासाठी भाजपला बरेच त्रास सोसावे लागणार आहेत. भाजपच्या अल्पसंख्याक गटाचे नेते उर्फान मुल्ला हेही भाजपच्या उमेदवारीवर दावा करू शकतात. त्‍यामुळे उमेदवार निवडीबाबत भाजपसमोर पेचप्रसंग निर्माण होण्‍याची शक्यता आहे. काँग्रेसचीही तशीच परिस्‍थिती आहे.

काँग्रेसतर्फे आवेर्तान

फालेरो यांनी तृणमूल पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसने माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांना काँग्रेस पक्षात घेतले असून तेच काँग्रेसचे उमेदवार राहणार आहेत. 2012 च्या निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवून चर्चिल आलेमाव यांचा पराभव करून ‘जायंट किलर’ ही प्रतिमा प्राप्त केलेल्या फुर्तादो यांना 2017 च्या निवडणुकीत फारसा प्रभाव टाकता आला नव्हता. फुर्तादो यांच्यावर भाजपचे ‘अल्टर बॉयस’ असा शिक्का असून आतापर्यंत एकदाही भाजपावर टीका न केलेल्या फुर्तादो याना काँग्रेस उमेदवार म्हणून मतदार स्वीकारतील का? हा खरा प्रश्न आहे.

Goa Election: ‘तृणमूल’च्या ‘एन्‍ट्री’ ने गणित बदलणार
Goa Elections: भाजपमध्‍ये सुंदोपसुंदीचा धोका

सिप्रू कार्दोज यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

2017 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून 3027 मते मिळविलेले सिप्रू (एडविन) कार्दोज हे काँग्रेससाठी चांगले उमेदवार ठरू शकले असते. मात्र, त्यांनी काँग्रेस उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिल्याने काँग्रेसपुढे पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्‍यामुळे कदाचित आवेर्तान यांना काँग्रेस प्रवेश देण्‍याची घाई करण्‍यात आली असावी. सिप्रू यांची मनधरणी झाल्‍यास ते निर्णय बदलू शकतील का? असाही प्रश्‍‍न आहे.

अपक्ष उमेदवारांची गर्दी

नावेली मतदारसंघावर यावेळी काही अपक्ष उमेदवारही डोळा ठेवून असून त्यात आके बायशचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच सिद्धेश भगत, दिग्विजित चव्हाण आणि इम्रान खान यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा नावेली मतदारसंघातील उमेदवारांची यादी बरीच लांबण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com