Goa Election: हळदोणे मतदार संघात टिकलोंसमोर कांदोळकरांचे आव्हान

गोव्यात विरोधकांची युती झाल्यास भाजपला विजयासाठी करावा लागेल आटापिटा; युती न झाल्यास भाजप, गोवा फॉरवर्ड, काँग्रेस, मगो, आप अशी पंचरंगी लढत
Goa Election 2022: टिकलोंसमोर कांदोळकरांचे आव्हान
Goa Election 2022: टिकलोंसमोर कांदोळकरांचे आव्हानDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: विधानसभेच्या गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांत हळदोणे मतदारसंघ भाजपचा भरभक्कम गड बनून राहिला आहे. तरीही आगामी निवडणुकीत भाजपविरोधकांची युती झाल्यास भाजपला विजयश्रीसाठी बराच आटापिटा करावा लागेल, अशी शक्यता दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूने गोवा फॉरवर्डचे किरण कांदोळकर यांचे जबरदस्त आव्हान भाजपचे संभाव्य उमेदवार ग्लेन टिकलो यांच्यासमोर आहे. विरोधकांच्या युतीवरच भाजपचे यशापयश अवलंबून आहे.

काँग्रेस व गोवा फॉरवर्ड युती झाल्यास काँग्रेसच या मतदारसंघावर दावा करील आणि गोवा फॉरवर्डला हळदोणेमधून माघार घ्यावी लागेल, अशी शक्यता आहे. त्यांची युती फिसकटली तर या ठिकाणी भाजप, गोवा फॉरवर्ड, काँग्रेस व मगो व ‘आप’ अशी पंचरंगी लढत होईल. तसे झाल्यास विद्यमान आमदार ग्लेन टिकलो व किरण कांदोळकर यांच्यातच खरी लढत होणार आहे.

कार्यकर्ते उत्‍साहात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, मगोपचे नेते सुदिन ढवळीकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच आपचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी या मतदारसंघाला भेट देत स्वतःच्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चा केली आहे. त्यांनी तेथील कार्यकर्त्यांत उत्साह आणण्याचे काम त्या माध्यमातून साध्य केलेले आहे.

Dainik Gomantak

किरण कांदोळकरांचा दुसऱ्यांदा प्रयत्‍न

हळदोणेचे विद्यमान आमदार ग्लेन टिकलो यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार तथा गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष आणि हळदोणेतून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणारे किरण कांदोळकर यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. 2002 सालच्या निवडणुकीत कांदोळकर हे हळदोणेत अपक्ष उमेदवार होते. सध्या गोवा फॉरवर्डने किरण कांदोळकर यांची उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर करून इतर पक्षांच्या तुलनेत एक पाऊल पुढे आहे. गोवा फॉरवर्ड पहिल्यांदाच हळदोणेतून आपला उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. असे असले तरी येत्या निवडणुकीत टिकलो यांच्या विरोधात किती उमेदवार रिंगणात असतील, याचे चित्र संभाव्य युतीनंतर स्पष्ट होईल. विरोधकांची युती झाल्यास या मतदारसंघातील राजकीय स्थिती पूर्णत: बदलण्याची शक्यता आहे. मात्र, मतदार कुणाच्‍या बाजूने कौल देतात हे आगामी काळात समजेल.

Dainik Gomantak

पंचायती भाजपकडे

या मतदारसंघात हळदोणे-खोर्जुवे, नास्नोडा, मयडे, बस्तोडा, उसकई-पालये-पुनोळा व पोंबुर्पा-वळावली अशा सहा पंचायत क्षेत्रांचा अंतर्भाव आहे. सर्वच पंचायतींवर आता भाजप गटाची सत्ता आहे. असे असले तरी भाजपचे आमदार ग्लेन टिकलो यांना गोवा फॉरवर्डचे उमेदवार किरण कांदोळकर तोडीस तोड आव्हान देऊ शकतात, हेही तेवढेच खरे आहे. कारण, प्रत्येक पंचायत क्षेत्रातील विरोधी गटांतील पंचायतसदस्य कांदोळकर यांच्या बाजूने आहेत. तसेच भाजपसमर्थक पंचसदस्यांपैकी कित्येकांची कांदोळकर यांच्याशी जवळीक आहे. या मतदारसंघात हळदोणे ही सर्वाधिक लोकसंख्या असलेली मोठी पंचायत असून, या गावातील लोक प्रत्येक निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत असतात.

संभाव्य उमेदवार

या मतदारसंघात भाजपची उमेदवारी ग्लेन टिकलो यांनाच निर्विवादपणे मिळेल असे वाटते. भाजपविरोधकांची युती न झाल्यास गोवा फॉरवर्डची किरण कांदोळकर यांना, काँग्रेसची अमरनाथ पणजीकर यांना, तर म.गो.ची उमेदवारी महेश साटेलकर यांना मिळण्याची शक्यता आहे. आप, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना या पक्षांचे उमेदवार कोण असतील याचा अंदाज सध्याच्या घडीस तरी व्यक्त करता येत नाही. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अमरनाथ पणजीकर यांच्याबरोबरच ॲड. कार्लुस फरेरा यांचे, तर आम आदमी पक्षातर्फे ब्रुनो फर्नांडिस यांचे नाव चर्चेत आहे.

Goa Election 2022: टिकलोंसमोर कांदोळकरांचे आव्हान
Goa Election: शिरोडकर गड पुन्हा सर करणार का?

मतदारसंघात विविध समस्या

अन्य मतदारसंघांप्रमाणे खंडित वीजपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, बेरोजगारी, खडबडीत रस्ते, काही ठिकाणी रस्त्यांचा अभाव, अरुंद रस्ते, रस्त्यांच्या बाजूंना फूटपाथचा अभाव, सांडपाण्याची समस्या, रस्त्याच्या बाजूंना वाढलेली झुडपे यासंदर्भातील समस्या याही मतदारसंघात आहेत. म्हापसा शहरातील आकय व कामरखाजन हे भाग हळदोणे मतदारसंघात अंतर्भूत असून तेथीलही रस्ते निकामी झाले आहेत. तिराळी कालव्याच्याचे पाणी कृषी व्यवसायास देण्यासंदर्भात दीर्घ काळ झालेली दिरंगाई, शीतपेटीत असलेला हळदोणेतील बगलमार्ग उभारण्याचा प्रस्ताव, मोडकळीस आलेल्या हळदोणे येथील मार्केट प्रकल्पाची दुरुस्ती, हळदोणे बाजापेठेत छोटेखानी बसस्थानक उभारण्यास होणारी टाळाटाळ, असे कित्येक प्रश्न येत्या विधानसभा निवडणुकीत ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com