Goa Election 2022: वाळपईला नवीन आमदार मिळणार?

आंदोलनांची झळ कुणाला? दिव्या विश्‍वजित राणेंना भाजपची उमेदवारी शक्य : विरोधकांचीही जोरदार तयारी
वाळपईला नवीन आमदार मिळणार?
वाळपईला नवीन आमदार मिळणार? Dainik Gomantak

वाळपई: वाळपई मतदारसंघात सध्यातरी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे यावेळीही भाजपला ही जागा मिळू शकते. विरोधकांनी जोर लावला, तरी दिव्या राणे यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याने या ठिकाणच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाळपईवर आरोग्‍यमंत्र्यांचे वर्चस्‍व

वाळपई मतदारसंघावर 2007 पासून आरोग्यमंत्र्यांनी वर्चस्व ठेवले आहे. त्यात दोनवेळा पोटनिवडणुका, तीन विधानसभा निवडणुकांत त्यांनी निर्विवाद यश मिळवले आहे. सध्याच्या घडीला भाजपला या मतदारसंघात वातावरण अनुकुल आहे. पण विरोधकांनी मिळून एकच उमेदवार भाजपच्या विरोधात उभा केला तर निवडणूक रंगतदार होईल. विरोधकांची युती झाली नाही तर भाजपला सहजतेने यश गाठता येईल.

येत्या निवडणुकीत मूळ भूमिपुत्रांचा पूर्ण जमिनीचा मालकी प्रश्न ऐरणीवर राहणार आहे. त्‍यासंदर्भात आंदोलनाची धग सत्ताधाऱ्यांना शांत करावीच लागणार आहे. विशेष म्हणजे भाजपला गुळेली पंचायत क्षेत्रात बरीच ताकद लावावी लागणार आहे. कारण मेळावलीच्या आयआयटी आंदोलनावेळी जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसला या भागात मोठी आघाडी मिळाली होती. त्‍या आंदोलनाची धग अजूनही आहे. त्यामुळे गुळेली पंचायतीत भाजपला संघर्ष करावा लागू शकतो. उसगाव भागात सुद्धा अटीतटीची लढत राहण्याची चिन्हे आहेत. त्‍यासंदर्भात होणाऱ्या घडामोडी व त्‍याचा लाभ कोण घेतो, यावर सर्व अवलंबून आहे.

विश्‍वजित राणे पर्येतून लढणार

मंत्री विश्‍वजित राणे हे पर्येतून लढतील अशी चर्चा आहे. त्यामुळे वाळपईतून नव्या पर्वाचा उदय होणार आहे. काँग्रेस पक्षातर्फे रणजीत राणे, दशरथ मांद्रेकर हे इच्छुक आहेत. 2017 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने फोंड्याच्या रॉय रवी नाईक यांना उमेदवारी दिली होती. आता मात्र रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महिला उमेदवार म्हणून रोशन देसाईंचे नाव पुढे येत आहे. भाजपने सौ. दिव्या राणे यांना प्राधान्य दिले तर काँग्रेसही महिला उमेदवार रिंगणात उतरवू शकतो.

वाळपईतून दिव्‍या राणे?

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे हल्ली मतदारसंघात अधिक सक्रिय आहेत. त्यांनी वाळपई कार्यालयात देखील बैठकांचे सत्र आरंभले आहे. मात्र यावेळी वाळपईतून दिव्या विश्वजीत राणे यांना भाजपची उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी सौ. दिव्या यांनीही लोकसंपर्क अभियान हाती घेतले आहे.

‘आरजी’देखील अग्रेसर

वाळपई मतदारसंघात ‘आरजी’ ही संघटनाही गेल्या काही महिन्यांपासून अग्रेसरच राहिली आहे. या संस्थेचे कार्यकर्ते ग्रामीण भागात जाऊन लोकांना मदत करीत आहेत. हल्लीच आलेल्या पुरावेळी आरजी संस्थेच्या सदस्यांनी लोकांना विविध माध्यमांतून मदत केली होती. वाळपई मतदारसंघातील विविध समस्या, प्रश्नांच्या विरोधात आवाज उठवित आहे.

वाळपईला नवीन आमदार मिळणार?
Goa Election 2022: फोंडा मतदारसंघात रवींना रोखण्यासाठी रणनीती

जमीनप्रश्‍‍न गाजणार?

सध्‍या सत्तरीत जमीन मालकी विषयावरून आंदोलन सुरू आहे. आल्वारा, गावठण, कुमेरी, वनक्षेत्र अशा विविध प्रकारच्या जमिनींना पूर्ण मालकी मिळालेली नसल्याने नागरिक बरेच नाराज झाले आहेत. आंदोलनांना गावागावांतून लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे निवडणुकीत जमीन मालकी विषय महत्त्‍वाचा मुद्दा ठरणार आहे. गोवा मुक्तीपासून लोक मालकी हक्कांसाठी लढत आहेत. अजूनही प्रश्न प्रलंबितच आहे.

जनसंपर्कावर भर

वाळपई मतदारसंघाची स्थापना1989 साली करण्यात आली होती. त्याआधी सत्तरीत एकच मतदार संघ होता. सध्याच्या घडीला वाळपईत भाजपचा आमदार मंत्रीरुपात कार्यरत आहे. यावेळी होणारी वाळपईची निवडणूक बरीच रंगतदार ठरणार आहे. भाजपने लोकसंपर्क सुरू केला आहे. आम आदमी पक्षातर्फे ग्रामीण भागात विविध प्रकारच्या उपक्रमांतून संपर्क अभियान सुरू आहे. काँग्रेस पक्षानेही लोकांपर्यंत पोचण्यावर भर दिला आहे.

वाळपईला नवीन आमदार मिळणार?
Goa Election 2022: मडगाव मतदारसंघात दिगंबर कामतांचा विजयीरथ भाजप रोखणार?

काँग्रेसही आक्रमक

2017 सालच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून विजय मिळवल्यानंतर विश्‍वजित राणे यांनी अवघ्या पंधरा दिवसांतच आमदाराकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळेपासून वाळपईत भाजपला अच्छे दिन येण्यास प्रारंभ झाला आहे. मगो पक्ष देखील वाळपईत उमेदवार उभा करणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस 5 वेळा, भाजप 3 वेळा, अपक्ष 1 वेळा विजयी झाले आहेत. 2007 पासून विश्‍वजित यांचे वर्चस्व राहिले आहे.

‘आप’सुद्धा निवडणूक रिंगणात

‘आप’तर्फे मेळावलीच्या आयआयटी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या शुभम शिवोलकर यांना उमेदवारीची संधी आहे. शिवोलकर यांनी कार्य सुरू ठेवले असून तरुणांसोबत विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम ते करीत आहेत. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असो, वीज, पाणी समस्या असो जिकडे तिकडे शिवोलकर धाव घेत आहेत. मागील महिन्यात पुरानंतर भाजप, काँग्रेस, आप, मगोने आपापल्या परीने पूरग्रस्त भागात मदतकार्य केले आहे. त्या अनुषंगाने प्रचाराचीही सुरू केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com