Goa Election 2022: दाबोळी मतदारसंघावर माविन यांची मजबूत पकड

विजयाची हॅट्‍ट्रिक होणार का? विरोधकांकडून शर्थीचे प्रयत्न; जुझे डिसोझांना युतीचे बळ शक्‍य
दाबोळीवर माविन यांची मजबूत पक
दाबोळीवर माविन यांची मजबूत पकDainik Gomantk

कुठ्ठाळी: कुठ्ठाळी मतदारसंघात सलग दोनवेळा निवडून आलेले मंत्री माविन गुदिन्हो यांनी बऱ्यापैकी जनमत तयार केले आहे. यामुळे विरोधकांसमोर हा मतदारसंघ मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे जुझे फिलिप डिसोझा यांनी येथून लढवण्याची तयारी केली आहे. इतर पक्षही सक्रिय झाले आहेत. त्‍यामुळे चुरस वाढणार आहे. कुठ्ठाळी मतदारसंघापासून विभक्त करून निर्माण करण्यात आलेला मतदारसंघ म्हणजे दाबोळी मतदारसंघ होय. सुरवातीस 2012 मधील निवडणुकीत पहिल्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक लढवून आमदार माविन गुदिन्हो यांनी केले. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी माविन गुदिन्हो यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली व विजय मिळवला. दोनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व माविन गुदिन्हो करीत आहेत.

कॅ. विरीयातोही स्‍पर्धेत

गोंयच्या प्रजेचो आवाज या पक्षाच्यावतीने कॅप्टन विरीयातो फर्नांडिस दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचे बॅनर्स सर्वत्र झळकत आहेत. गोवा फॉरवर्ड किंवा नव्यानेच गोव्यामध्ये प्रवेश केलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्यावतीने अजूनपर्यंत तरी उमेदवार म्हणून कोणीही पुढे आलेले नाहीत.

लोकप्रतिनिधींची कसोटी?

दाबोळी मतदारसंघाच्या वाडे, रेजिनामुंडी परिसरात सध्या पाण्याची समस्या उद्‍भवत आहे. चिखली उतरणीखाली पेट्रोल पंपसमोर राष्ट्रीय महामार्गाची एकदम वाताहत झाली आहे. तसेच विमानतळ मार्ग, चिखली इस्पितळाची सोय आहे. पण, आवश्‍‍यक कर्मचारी वर्ग नसल्याने शस्‍त्रक्रिया विभाग असून नसल्‍यासारखा आहे. टॅक्‍सी पार्किंगची समस्‍या जटिल बनत चालली आहे. चिखली येथील औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे.

Dainik Gomantak

विकासकामांत अग्रेसर

पंचायत तथा वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी या मतदारसंघावर बऱ्यापैकी पकड बसवली आहे. विकासकामांच्या बाबतीत ते अग्रेसर आहेत. त्यांनी लोकांची केलेली लहान-मोठी कामे, महिलांसाठी केलेले कार्य यामुळे त्यांच्या बाजूने जनमत आहे. सांकवाळ जिल्हा पंचायत सदस्य अॅड. अनिता थोरात यांना बिनविरोध निवडून आणण्यात मंत्री गुदिन्हो यांचा मोठा सहभाग आहे. चिखली पंचायत व बोगमाळो पंचायतीचा सत्तारूढ गट त्यांच्याबरोबर असल्याने त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये निर्विवाद विजय मिळेल अशी खात्री आहे. मतदारसंघात 23459 एवढे मतदार असून त्यापैकी पुरुष मतदार 11713 तर महिला मतदार 11746 आहेत.

नानोस्‍करांची कडवी झुंज

गत निवडणुकीत मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक प्रेमानंद (बाबू) नानोस्कर यांनी मगो पक्षाच्यावतीने निवडणूक लढवून बऱ्यापैकी टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. तर काँग्रेस पक्षाच्यावतीने चिखली पंचायतीचे सदस्य फ्रान्सिस्को जुझे नुनीस यांनीही लढत दिली होती. आम आदमी पक्षाचे उमेदवार वसंत नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार क्रितेश गांवकर यांनीही हजाराच्यावर मते येथे घेतली होती. गेल्या दोन निवडणुकांमध्ये माविन गुदिन्हो यांना मगो पक्षाचे प्रेमानंद नानोस्कर हेच प्रमुख प्रतिस्पर्धी राहिले होते. 2012 सालच्या निवडणुकीत या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचा उमेदवार रिंगणात होता. त्याला 849 मते मिळाली होती. यावेळी मतदारसंघात कौल कुणाला, हे आगामी काही महिन्‍यांत स्‍पष्‍ट होईल.

दाबोळीवर माविन यांची मजबूत पक
Goa Election 2022: बाणावली मतदारसंघात चर्चिल बॅकफूटवर!

जुझे डिसोझा सक्रिय

आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा वास्को मतदारसंघाचे माजी आमदार व माजी महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा हे निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची युती झाल्यास जुझे फिलिप हे युतीचे उमेदवार असणार आहेत. त्यांचा नवेवाडे, चिखली, दाबोळी, बोगमाळो सारख्या परिसरात बऱ्यापैकी लोकसंपर्क आहे. त्यामुळे जुझे फिलिप हे माविन गुदिन्होंसमोर एक प्रकारे आव्हान उभे करू शकतात. त्यांनी आपल्यापासून दूर गेलेल्यांशी पुन्हा जुळवून घेत तसेच मूळ भाजप कार्यकर्त्यांशी जवळीक साधून माविन यांच्‍या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. गतवेळी मगोचे उमेदवार असलेले प्रेमानंद नानोस्कर यंदाच्या निवडणुकीत मगो पक्षातर्फे रिंगणात असणार की आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर ते निवडणूक लढवणार याबाबत अजून त्यांनी काही जाहीर केलेले नाही.

ज्‍वलंत समस्‍या

पाणी समस्या, वीज समस्या, रस्ते, गटार, चिखली येथील औद्योगिक वसाहतीचे सुशोभीकरण, बेरोजगारांना नोकरी, स्वतंत्र पोलिस चौकी, बहुउद्देशीय सभागृह, रस्त्यांचे रुंदीकरण, कचरा समस्यांसारखे अनेक विषय सोडविण्याचे आवाहन नव्याने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीसमोर असेल. पण, यंदाच्या निवडणुकीत चुरस मात्र होणार आहे हे निश्चित.

आजवरचे आमदार

1977 शंकर लाड, मगो

1980 लुईस दोरादो हर्क्युलानो, काँग्रेस- अर्स

1984 सायमन डिसोझा, काँग्रेस

2012 माविन गुदिन्हो, काँग्रेस

2017 माविन गुदिन्हो, भाजप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com