Teacher's Day: शिक्षकदिनीचा शिक्षणविचार

शिक्षकाची भूमिका तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे बदलत गेली तितकीच, किंबहुना जास्तच, ती पालकांच्या मनोवृत्तीनुसार बदलत गेली.
Teacher's day
Teacher's dayDainik Gomantak
Published on
Updated on

नारायण भास्कर देसाई

Teacher's day हा लेख प्रकाशित होई तो शिक्षकदिन मागे पडून चोवीस तास उलटलेले असतील. शिक्षकदिनी शिक्षकाची महत्ता, भूमिका आणि कौशल्ये यांचा गौरव करण्यात समाज मागे राहत नाही हे नक्कीच सुखावह आहे.

शिक्षकाचे प्रत्येक व्यक्तीच्या आणि समाजाच्याही जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे याची ग्वाही समाज, संस्था, संघटना, राज्य संस्था यांच्यातर्फे शिक्षक वर्गाला या निमित्ताने मिळते. शिक्षकदिन मागे पडल्यानंतर सारे काही रोजच्यासारखेच असते.

त्यात काही बदल, शिक्षक म्हणून आपण आणू शकू का, असा विचार आला. सहज वाटले तेच शिक्षकांसाठी मांडतो. शिक्षकानेच शिक्षण आणि समाज घडवण्यात पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

आजच्या घडीला शिक्षणक्षेत्रात शिक्षक म्हणून आपल्यासमोर संधी अनेक आहेत, तशी आव्हानेही प्रचंड आहेत. समाजातून आपल्याकडे शिकायला येणारी मुले किती बदलली आहेत! त्यांच्यावर त्यांच्या जन्माच्या क्षणापासून प्रभाव टाकणारे अनेक घटक ३०-४० वर्षांमागे अस्तित्वातच नव्हते, हे तर आपण मान्य करायलाच हवे.

भारत स्वतंत्र झाला त्या काळचा शिक्षणशास्त्राचा विचार, त्यानंतर विविध विज्ञान शाखांची आणि विद्या शाखांची झालेली निर्मिती, प्रगती यातले काहीच डोळ्यांआड करणे शक्य नाही.

तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांची दैनंदिन जीवनातील आवश्यकता, त्यांच्या उत्पादनांची अपरिहार्यता, परिणामांची अनिवार्यता हे सारेच आजच्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील अटळ आणि अढळ वास्तव आहे.

माहितीचा महापूर आणि त्यातून पोहण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची नाव, या दोन्ही बाबी शिक्षणाचे अविभाज्य अंग बनल्या आहेत. विसाव्या शतकात पाठ्यपुस्तक, पाठ्यक्रम, परीक्षा, प्रमाणपत्र यांच्या चौकटीत शिक्षकाचे वास्तव्य सुखाचे होत असे, पण एकविसाव्या शतकात आलेल्या बदलांमुळे शिक्षण क्षेत्रातील आधीचे वातावरण, परिस्थिती, व्यवस्था, साधने बदलणे भाग आहे.

यासाठी शिक्षक म्हणून आपली तयारी किती आहे? स्वतःला बदलणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण किती? बदल समजून घेऊन ते स्वीकारण्याची तयारी किती? याबाबतीत आपल्या राज्यात काहीच अधिकृत अभ्यास नाही.

म्हणजेच अन्य बदलांची नोंद घेत शिक्षक स्वतःला नव्या शिक्षण विचाराचे स्वागत करण्यास सक्षम बनवत आहेत का? याविषयीचे कुतूहल वाजवी आहे, असे मानून शिक्षणाचा विचार करावा लागणार आहे.

शिक्षकाची भूमिका तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे बदलत गेली तितकीच, किंबहुना जास्तच, ती पालकांच्या मनोवृत्तीनुसार बदलत गेली. मार्कांची चलती आणि टक्केवारीचा बाजार यात कुणी कुणाला ओढले, हे कळणे कठीण.

पण आता शिक्षक म्हणून आपल्याला मुलांना ‘शिकवायचे’ नसून त्यांचे सहजपणे होणारे ‘शिकणे’ सुलभ करणारी साधने, वातावरण आणि साहाय्य हे सारे पुरवायचे आहे. वर्ग शिकवण्याची परंपरा मोडून प्रत्येक विद्यार्थ्याचे शिकणे व्यक्तिगत पातळीवर (चाइल्ड-सेंटर्ड एज्युकेशन) होण्यासाठी प्रयत्नशील राहायचे आहे. म्हणजेच शिक्षक-केंद्रित, पाठ्य-पुस्तक केंद्रित, परीक्षा-केंद्रित अध्यापन बंद करून विद्यार्थी-केंद्रित अध्ययन प्रक्रियेला चालना द्यायची आहे.

१९८६च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षकांची सुलभक (फॅसिलिटेटर) ही भूमिका स्पष्ट केली गेली. त्याच धोरणात पदवी आणि नोकरी यांच्यात संबंध नसावा (डीलिंकिंग डिग्रीज फ्रॉम जॉब्स) हेही सांगितले, पुस्तकी अभ्यासाकडून समाजाच्या गरजा भागवणाऱ्या व्यावसायिक शिक्षण शाखेकडे मुलांनी वळावे, असा प्रयत्न केला गेला.

पण शासकीय धरसोडपणा, पालकांची पारंपरिक दृष्टी, शिक्षकांना नोकरीची हमी आणि आर्थिक सुरक्षा यांची चिंता, कष्टाचे काम हीन मानण्याची समाजाची वृत्ती या सगळ्यात एक वास्तववादी शिक्षण विचार आणि त्यावर आधारित अभ्यासक्रमाचा हेतूच पराभूत झाला. परिणाम? आज पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांचे तांडे कार्यालयात शिपायाच्या नोकरीसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज करतात.

एकविसाव्या शतकात आधीच्या नोकऱ्या, व्यवसाय लुप्त होत जाण्याचे प्रमाण वाढते आहे, तरी आपल्या शिक्षण प्रक्रियेत बदल होताना दिसत नाही.

उच्च शिक्षणात होणारे बदल तंत्रज्ञान वापराचेच जास्त आहेत. शिकण्या-वागण्यातले खरे बदल यायला हवेत ते मेंदू-वाढीच्या मुख्य काळातले, म्हणजे शिक्षणातील पहिल्या दहा वर्षांतले.

तिथे खूप काम व्हायला हवे. पण नवीन शिक्षण धोरणात तो स्तर (वय तीन ते आठ वर्षे) दुर्लक्षितच आहे. शिक्षक म्हणून कोणत्याही स्तरावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जर शिक्षणक्रांतीच्या या पायाभूत कामात योगदान द्यायचे ठरवले तर शिक्षणाच्या पुढील सर्वच स्तरांवरील शिक्षणात बदल येण्याची गती वाढेल आणि पालक, विद्यार्थी, समाज यांची परिवर्तनवादी वृत्ती घडेल.

Teacher's day
Portuguese Laws in Goa: राज्यात पोर्तुगीज राजवटीप्रमाणे कठोर कायद्यांची गरज; विजय सरदेसाईंची मागणी

हे घडवायला शिक्षकवर्गानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. तुम्ही विद्यापीठ, महाविद्यालयीन, व्यावसायिक, माध्यमिक वा उच्च माध्यमिक, प्राथमिक यांपैकी कोणत्याही स्तरावर शिकवत असलात, तरी तुमच्याकडे येणारी मुले खालच्या स्तरावरून येणार आहेत.

त्यांची शिकण्याची प्रक्रिया, व्यवस्था बदलण्यात तुमचा हातभार लागला तरच अपेक्षित बदल होऊ शकतील. अन्यथा कच्च्या मालाच्या (रॉ मटेरिअल) नावाने खडे फोडत शिक्षण क्षेत्रात वर्षे घालवण्यापलीकडे फार काही होणार नाही.

समाजाला शिक्षकाविषयी विश्वास वाटायला हवा असेल तर सध्याची उतरंड नाकारून पायाभूत शिक्षणात शिक्षकांची गुंतवणूक - सर्वच प्रकारची - व्हायला हवी.

Teacher's day
Goa Monsoon Update: पुन्‍हा धो-धो बरसणार,‘यलो अलर्ट’ जारी

एकविसाव्या शतकात जगायची कौशल्ये आणि क्षमता संपादन करायच्या ताकदीची शिक्षणव्यवस्था मुळापासून घडवण्याचा भार शिक्षक उचलणार नसतील तर त्यांना स्क्रीनची झिंग चढलेल्या, कृत्रिम बुद्धिमत्तेचे गुलाम बनलेल्या, आंतरिक संवेदना आणि भावनांशी देणेघेणे नसलेल्या विद्यार्थ्यांचे संवादहीन शिक्षण, निरर्थक मूल्यमापन, दिशाहीन समाजजीवन स्वीकारणे चुकणार नाही.

शतकापेक्षा जुन्या झालेल्या कृती-पद्धतींनी आजचे शिक्षण चालू शकत नाही, याची जाणीव आणि ते बदलण्याची तयारी शिक्षकातच नसेल तर समाज, शासन यांना दोष देता येणार नाही.

सन्मान-सत्कार, नमस्कार-चमत्कार यांपलीकडे आव्हानांचे आखाडे आपली वाट पाहताहेत. शिक्षकदिनाचे क्षण आठवताना हे आव्हानांचे आणि संधींचे अंगण अनुभवण्याची तयारी प्रत्येक शिक्षकाने करायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com