डाय हार्ड दशावतारी

वयाच्या 18 व्या वर्षी सुरू झालेला दामोदर जोशी यांचा नाट्यप्रवास अथकपणे अजूनही सुरू आहे.
Damodar Joshi
Damodar JoshiDainik Gomantak
Published on
Updated on

दामोदर जोशी

साठ-सत्तरच्या दशकात कोकणातील दशावतारी नाटकांचे प्रयोग गोव्यात खुप ठिकाणी होत असत. गोव्याच्या एका टोकाला असणाऱ्या सत्तरी तालुक्यात देखील ही नाटके खुप लोकप्रिय होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मामा मोचेमाडकर दशावतारी कंपनीची नाटके तर या भागात खुप संख्येने सादर व्हायची आणि त्यांच्या खेळांना लोक गर्दी करून हजर असायचे.

त्यावेळी बालवयात असलेला दामोदर ही नाटके पाहणाऱ्यांत असायचा. दशावतारी नाटकाचे गारुड त्याच्या मनावर इतके भिनले होते की या नाटकात आपणही काम करावे असे त्याच्या युवा मनाने घेतले. घरी आई आणि भाऊ होते. दशावतारी नटाचे आयुष्य हे तसे भरवशाचे कधीच नव्हते त्यामुळे त्याच्या या इच्छेला घरून परवानगी मिळेल हे शक्यच नव्हते- नव्हे विरोधच झाला. शेवटी राहवेनासे झाल्यावर 1972 साली, 18 वर्षे वयाच्या दामोदर जोशी यांनी दशावतारी नाटक कंपनीत प्रवेश घेण्यासाठी कोणालाही न सांगता घर सोडले.

वयाच्या 18 व्या वर्षी सुरू झालेला दामोदर जोशी यांचा नाट्यप्रवास अथकपणे अजूनही सुरू आहे. अर्थात वयोमानाप्रमाणे त्यांनी नाटकात काम करणे बरेच कमी केले आहे पण मनाला पटणाऱ्या एखाद्या चांगल्या भूमिकेची ऑफर आली व सहकलाकार चांगले असले तर अजूनही एखाद्या प्रयोगात काम करण्याची त्यांची तयारी असते. सुमारे एक महिन्यापूर्वी, 30 मे रोजी निवडक कलाकारांच्या संचात आरवली, शिरोडा इथे सादर झालेल्या दशावतारी नाट्यप्रयोगात त्यांनी दुर्योधनाची भूमिका रंगवली.

1972 साली दशावतारी नाटक कंपन्यांमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केल्यानंतर, सुमारे 10-12 वर्षानंतर त्यांचे नाव व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी ते आरोलकर दशावतारी नाटक कंपनीत होते. गोव्याचा एक ब्राह्मण मुलगा चांगली मालवणी बोलतो व भूमिका चांगली निभावतो असे लोक बोलू लागले होते. जोशी यांची दशावतारी वर्तुळात उत्कृष्ट खलनायक म्हणून प्रसिध्दी होत होती. त्यावेळी मामा मोचेमाडकर ही कंपनी दशावतारी कंपन्यांमध्ये अगदी विख्यात अशी होती.

Damodar Joshi
Blog: वर्ण संकल्पनेचा विचार

त्या कंपनीत नट म्हणून संधी मिळणे हे अभिनेत्यासाठी गौरवाची बाब असायची. दामोदर जोशी यांना आपणही त्या कंपनीत जावे अशी खुप इच्छा होती. त्यांची ती इच्छा पुढे सफल झाली आणि पुढची वीस वर्षे 2007 सालपर्यंत जोशी त्या कंपनीत नट म्हणून राहिले. (मध्यंतरी दोन-तीन वर्षे त्यांनी इतर कंपन्यातही काम केले. याचे कारणही हे होते की एकाच कंपनीत दीर्घकाळ राहिल्यामुळे आलेल्या ‘तोच-तोच पणा’वर त्यांना उतारा हवा होता.)

दशावतारी नाटकांचा मोसम साधारण कुश्‍मांड नवमीला (तुळशीविवाहाच्या जवळपास) सुरू होतो. जोशी यांच्या आठवणीप्रमाणे एका मोसमात त्यांनी 270 प्रयोगदेखील सादर केले आहेत. जवळ-जवळ नेहमीच एक प्रयोग असायचा. या काळात सत्तरी तालुक्यातले तीन कलाकर दशावतारी कंपन्यामध्ये होते. भिरोंडा येथील सुर्यकांत राणे जे नायकाची भूमिका करायचे, कुंभारखण येथील हरिश्‍चंद्र गांवकर जे स्त्री भूमिका रंगवायचे व दामोदर जोशी खलनायक रंगवायचे. सुरुवातीच्या काळात हे तिघेही कलाकार वेगवेगळ्या नाटक कंपनीतून काम करायचे पण नंतर हे तिघेही मामा मोचेमाडकर यांच्या कंपनीत एकत्र आले.

Damodar Joshi
Blog: पाऊस आणि छत्री

नाटकाची आवड जोशी यांच्यात कशी तयार झाली असावी? जोशी सांगतात, ‘माझे वडील मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या कंपनीत स्त्री भूमिका रंगवायचे. मी त्यांचा त्यावेळचा फोटो वगैरे मिळवायचा खुप प्रयत्न केला पण त्यात काही यश मिळाले नाही. मी चार वर्षांचा असताना ते वारले. लोक म्हणतात की वडलांची नाटकाची आवडच माझ्यात उतरली असावी. कदाचित तसेही असेल.’

‘मागे वळून पाहता’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन परवा 2 जुलै रोजी झाले. दामोदर जोशी यांचा तो 70 वा वाढदिवस देखील होता. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर ‘दशावतारी’ संकल्पनेवर सादर झालेल्या ‘भक्त प्रल्हाद’ या नाटकात त्यांनी आपली भूमिका सुरेखरित्या सादर केली. ही भूमिका जोशपूर्ण रितीने सादर करून, नाट्यवेडाला वयाची बंधने नसतात हे त्यांनी सिद्‍धच केले. प्रेक्षकांनीही त्यांच्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com