वेळ्ळीचो माथ्यावयलो खुरीस

वेळ्ळी ते मोरपिर्लापर्यंतच्या टेकड्या, डोंगरांवर भ्रमंतीच्‍या काही रम्य आठवणी आजही मनात घर करून आहेत.
salcete
salceteDainik Gomantak
Published on
Updated on

Salcete कळंगुट, बागा आणि पणजी ही ठिकाणे गोव्याची प्रतिमा उद्धृत करत असली तरी गोमंतकाचे खरे वैभव येथील गावे आहेत. प्रत्येक गावाची खास वैशिष्ट्ये आहेत. परंतु ती त्‍या भागापुरतीच मर्यादित राहतात.

ती जपली नाहीत तर नामशेष होण्‍याची शक्‍यता अधिक. गोव्‍यातील संपन्‍न गावांचे वेगळेपण अबाधित राहायला हवे. माझ्‍या लहानपणी आम्ही कुटुंबीय उन्हाळ्याच्या सुटीत नेहमी सासष्टीतील आमच्‍या वेळ्ळी गावात जायचो.

काजू, करवंदे, बोरांसारख्‍या हंगामी चवदार फळांसाठी उंच टेकड्यांवर जाणे हा आमच्‍यासाठी प्रचंड आनंददायी अनुभव असे. टेकड्यांवरील घनदाट जंगलातही आम्‍ही निर्धास्‍त भटकंती करायचो. आम्‍हाला जराही भीती वाटत नसे.

कारण आम्हाला आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितले होते - ‘तिथला राखणदार खुरीस आमचे संरक्षण करेल’. वेळ्ळी ते मोरपिर्लापर्यंतच्या टेकड्या, डोंगरांवर भ्रमंतीच्‍या काही रम्य आठवणी आजही मनात घर करून आहेत.

आमच्‍या गावातील एक कुणबी वृद्ध महिला, जिला आम्‍ही प्रेमाने आंतोन माय (आंतोनेत नावावरून) म्‍हणत असू. तिच्‍यासोबत मी टेकड्यांवर जात असे. वाटते राखणीच्या खुरिसासमोर ती उभी राहायची व प्रार्थना करायची. नंतर दोरीने बांधलेल्या एका छोट्या मडक्यातील पेज मला द्यायची. या टेकडीच्या माथ्यावरून कुंकळ्ळी व बाराडी ही गावे पाहता येत.

हे दृश्य फारच लोभस, नयनरम्य असे. वेळ्ळीतील चर्च हे सेंट फ्रान्सिस झेवियर यांना समर्पित आहे. १७७१मध्ये ते चॅपेल किंवा कपेल म्हणून बांधले होते व ते असोळणा चर्चशी संबंधित होते. १८०५ मध्ये त्याला पॅरीश चर्चचा दर्जा देण्यात आला.

वर्षानुवर्षे एक विनोद सांगितला जातो- कधीकाळी वेळ्ळीतील लोक चर्चचे मोजमाप घेण्यासाठी असोळण्‍याला आले होते आणि त्‍यांनी चर्चची बाहेरील मापे घेण्याएवजी असोळणा चर्चच्‍या आतील भागाचे मापन केले. करायला आले एक आणि झाले भलतेच!

तेव्‍हापासून वेळ्ळीहून असोळण्‍याला विवाहबद्ध होऊन आलेल्या नववधूला नेहमीच हा किस्सा रंगवून विनोदी पद्धतीने ऐकवला जातो. गंमत म्‍हणून वेळ्ळीच्‍या लोकांची झालेली फजिती अधोरेखित केली जाते. माझ्‍यासह माझ्‍या सासूबाईंना देखील हा किस्‍सा ऐकावा लागला आहे.

वेळ्ळीमधील चर्च नजीक ‘गोंयचे भाट’ आहे. तेथील टेकडीच्या माथ्यावर ‘राखणेचो खुरीस’ आहे. दरवर्षी २७ ऑक्टोबरला या खुरिसाचे फेस्त साजरे केले जाते. विविध धर्माचे लोक दूरवरून या ठिकाणी श्रद्धेने दर्शनाला येतात. बागा-वेळ्ळी येथील रहिवासी दत्ताराम लोटलीकर यांनी तेथे एक फलक लावला आहे. त्‍

यावरील उल्‍लेखा‍नुसार, तेथे पहिली सामुदायिक प्रार्थना (मास) १९६० मध्ये झाली. तेथेच ‘अवर लेडीचा’ पुतळा एका स्तंभावर आहे व जवळच एका स्तंभावर क्रॉस आहे, जिथे भक्त मेणबत्त्या प्रज्वलित करून प्रार्थना करतात. याच टेकडीच्या पायथ्याशी कुणबी कॅथलिक लोकांचा एक छोटासा वाडा आहे.

या गावातील धनगर इथल्या पठारावर त्यांची गुरे चरायला नेत असत. त्‍याकाळी वाघ व सिंह अशा जंगली श्वापदांची त्यांना भीती वाटू नये म्हणून सुरक्षिततेसाठी त्यांनी डोंगरमाथ्‍यावर एक खुरिस बांधला, जो आजही ‘राखणेचो खुरीस’ म्‍हणून ओळखला जातो.

वेळ्ळीतील माझ्या ओलीझायनो वाड्यावरून मी नेहमीच टेकडीच्‍या माथ्यावर असलेल्या ‘त्‍या’ खुरिसाकडे एकचित्ताने पाहात असे. कारण, ते दृश्य मला मोहीत करीत असे. टेकडीच्या माथ्यावरील छोटे मंदिर किंवा चॅपेल लांबून पाहाणे नेहमीच रमणीय असते. ही अद्भुत अनुभूती माझ्या मनाच्या गाभाऱ्यात कायम आहे.

salcete
Goans Pictures: मॉस्को येथील प्रदर्शनात गोमतकीयांची चित्रे

आजही या गावातील महिला खीर तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी घरोघरी जाऊन पैसे गोळा करतात. आंतोन मायने मला दिलेल्‍या माहितीनुसार तेथे एक प्रथा आहे. त्‍यानुसार, गोड पदार्थाचा एक भाग व काजू फेणीची एक बाटली ‘गोंयचे भाट’ परिसरातील सिंहाच्या गुहेपाशी (त्‍याची मनधरणी करण्‍यासाठी) ठेवली जायची.

हा गोड पदार्थ किंवा गोडसे लिटनीला उपस्थित राहिलेल्या सर्वांना प्रसाद म्हणून वाटला जायचा व नंतर पूर्वाश्रमीच्या कुणबीभाट व आताच्या खुर्साभाट वाड्यावर प्रत्येक घरी दिला जायचा. एका परंपरेनुसार, गावातील लोक बांबूच्या काठ्यांवर बांधलेले लाल झेंडे घेऊन मिरवणूक काढायचे व गोंयचे भाट ते आताच्‍या पंचायत घराजवळील शेतापर्यंत ही मिरवणूक जात असे.

पावसाच्या सरींनी ओलसर झालेल्‍या शेतांत मध्यभागी हे झेंडे रोवले जात. मिरवणुकीत ‘ब्रास बॅंड’च्या संगीतावर पारंपरिक गीते गायली जायची. मिरवणुकीत गायले गेलेले ‘हो फेर रे राखण्‍यालो’ हे शब्द आजही माझ्या मनात अस्पष्ट प्रतिमांसह रुंजी घालत आहेत.

मला खात्री आहे की, वेळ्ळीतील प्रत्येक मुलाने कधी ना कधी ही मिरवणूक पाहिली, अनुभवली असेलच. या मिरवणुकीनंतर उत्सवाची सांगता होत असे.

salcete
GI Tag: बेबींका, मानकुराद, आगाशीचे वांगे, सात शिरांची भेंडी आता सातासमुद्रापार

१९८८ मध्ये वेळ्ळी चर्चचे पाद्री फादर सांतान कार्व्हालो यांनी डोंगर माथ्‍यावरील क्रॉसकडे जाण्‍यासाठी २६२ पायऱ्या बांधण्‍यास पुढाकार घेतला. या पायऱ्यांना ‘पवित्र क्रॉस स्टेप्स’ असे संबोधले जाते. एका सरकारी योजनेअंतर्गत हे काम पूर्णत्त्‍वास गेले, असे चॅपेलच्या वाटेवर उभारलेल्या एका काँक्रीटच्या स्तंभावर नमूद केले आहे.

मला आठवते की, मी व माझी मुले आणि त्यांचे मित्र मिळून तेथील पायऱ्यांवरून भटकंतीला गेलो तेव्हा आजूबाजूच्या निसर्गरम्‍य टेकड्या व परिसराच्‍या मोहक दृश्याने मोहिनी घातली. आमच्‍यासाठी ते सुंदर गिर्यारोहण ठरले. विशेष म्‍हणजे, वेळ्ळीबाहेरील लोकांना हे ठिकाण फारसे ठाऊक नाही आणि मला आशा आहे की, या लेखामुळे अनेकजण या नयनरम्य जागेला भेट देतील.

हा! पण त्यांनी इथे आल्यावर कचरा करू नये व सोबत आणलेल्या प्लास्टिक पिशव्या वगैरे आपल्‍यासोबत परत घेऊन जाव्‍यात, अशी अपेक्षा आहे. इथे येणाऱ्याने पाणी व खाण्याची शिदोरी सोबत आणावी. कारण चॅपेलजवळ किंवा वाटेत दुकाने वा गाडे नाहीत. ही टेकडी धडधाकट लोकं सहज चढू शकतील; मात्र वयस्कर लोकांची दमछाक होऊ शकते.

salcete
Goa Assembly Monsoon Session: वल्गना..!

या टेकडीच्या पायथ्याला ‘गोंयचे भाट’मध्ये चौगुले महाविद्यालयातील माजी लोकप्रिय प्राध्यापक व कोकणीचे गाढे अभ्यासक श्री. बोर्जिस यांच्या खाजगी मालमत्तेत एक सुंदर तळे आहे. परंतु तिथे सार्वजनिक प्रवेश वर्ज्य आहे. असे सांगितले जाते की, सेंट फ्रान्सिस झेवियर या गावातून जात होते. तेव्‍हा तेथे सुरू असलेल्‍या लोहारकामाच्‍या आवाजाने ते अस्‍वस्‍थ झाले व त्‍याचमुळे त्‍यांनी जुने गोवे या ठिकाणाला पसंती दिली.

वेळ्ळी नजीक कुंकळ्ळी व असोळणा ही दोन गावे जणू बहिणीच भासतात. कोणत्‍याही गोमंतकीयाला आपले गाव हे इतर कोणत्याही गावापेक्षा सर्वांत सुंदरच वाटते. म्‍हणूनच असोळणेकर त्‍यांच्‍या गावाला अद्वितीय ‘असले-ना’ म्‍हणत, जे पुढे जाऊन असोळणा म्‍हणून नावारूपाला आले.

या परिसरात टेकड्या नसल्‍या तरी अभिजात सौंदर्य आहे. तेथून नागमोडी शीतल साळ नदी वाहते; तर वेळ्ळीकर तेथील कुटबण जेटीवर मासेमारी करतात. गावाचे वेगळेपण हे अर्थातच त्या ठिकाणाशी निगडित बालपणीच्या सुंदर आठवणी व तुम्हाला मिळालेली प्रेमळ वागणूक याच्याशी निगडित असते.

प्रत्येक माणसाचे हृदय हे आपली मातृभूमी, तिथले आपले घर, आपला गाव, तिथल्या टेकड्या व तळी यांची आठवण ठेवते. त्यामुळेच आपली पावले पुन्‍हा तेथे वळतात. एखाद्या टेकडीच्या माथ्यावरचा एक छोटासा खुरीसदेखील स्‍मृतिगंध दरवळत ठेवतो.

उंचावरून साद घालणारे मनमोहक सौंदर्य, शांतता, मनःशांती, निसर्गाशी एकरूपता आणि आजूबाजूची हिरवाई अनुभवण्यासाठी हे ठिकाण अनुभवायला हवे! जे पर्यटक जाऊ इच्छितात, त्यांनी येथील शांतता आणि सौंदर्याचा आदर जरूर करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com