Goa: जुन्या बाटल्यांत जुनाच मद्यार्क

गिरीश चोडणकर यांची काँग्रेसनिष्ठा गांधीनिष्ठेला समांतर जाते, त्यांना उघड वा छुपें आव्हान देणाऱ्यांची या दोन्ही निकषांवर पीछेहाटच झाली.
Goa politics
Goa politicsDainik Gomantak
Published on
Updated on

निवडणूक तोंडावर आलेली असताना पक्षातला सध्याचा समतोल बिघडवणे योग्य ठरणार नाही, हे हेरून चिदंबरम परतले आणि त्यांच्या भेटीचे पर्यवसान ‘जुन्या बाटल्यांत जुनाच मद्यार्क’ भरण्यात झालेंय. त्याची झिंग गोमंतकीयांना पुढील सहा- सात महिन्यांत चढेल, अशी आशा आपण बाळगूया.

Goa politics
Congressच्या अशा मनोवृत्तीला सोनिया गांधीही काही करू शकणार नाहीत

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांना अभय मिळेल, याचे सूतोवाच चिदंबरम यांनीच केले होते. राहुल गांधींचा पक्षावरील वरचष्मा कायम ठेवण्यासाठीच्या प्रयत्नांचा तोही एक भाग आहे. पंजाबपाठोपाठ उत्तराखंडातील पक्षांतर्गत घडामोडींतून गांधी घराण्यातल्या नव्या पातीला आव्हान उभे राहाते आहे आणि त्याची पुनरावृत्ती गोव्यात व्हायला नको, असा साधा हिशेब यामागे आहे. गिरीश चोडणकर यांची काँग्रेसनिष्ठा गांधीनिष्ठेला समांतर जाते, त्यांना उघड वा छुपें आव्हान देणाऱ्यांची या दोन्ही निकषांवर पीछेहाटच झाली. दिगंबर कामत, लुईझिन फालेरो, रमाकांत खलप, फ्रान्सिस सार्दिन यांना या निमित्ताने आपल्या राजकीय मर्यादांचे दिल्लीने कसे पृथक्करण केलेय, याचा अंदाज आला असेलच. मात्र, चोडणकरांना पक्षाने फारशी मोकळीक दिलेली नाही, हेदेखील लक्षांत घेण्याजोगे आहे. त्यांच्या दिमतीला आलेक्स सिक्वेरा यांना दिलेले आहे. सिक्वेरा हे पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष असतील. त्यांची नियुक्ती ही ख्रिस्ती समुदायातील असंतोषाच्या शांतवनाच्या हेतूने केली असली तरी तिच्यातून हिंदू- ख्रिस्ती द्वैत साधताना प्रस्थापित नेत्यांना संदेश दिल्याचे दिसते.

विशेषतः भरवंशाच्या सासष्टीत अल्पसंख्याकांची मते विखुरली जाणार नाहीत आणि ‘आप’ किंवा ‘गोवा फॉरवर्ड’ची उपद्रवक्षमता वाढणार नाही, यासाठी आलेक्स सिक्वेरा यांचा वापर होईल. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रयत्न चालवले होते. पण, त्यांना विरोधी पक्षनेतेपद सोडायचे नव्हते. बाशिंगांची कमतरता असल्यामुळे त्यांचा हिरमोड होणे स्वाभाविक. चोडणकर- आलेक्स यांच्या नियुक्तीकडे पाहिल्यास काँग्रेसने निवडणुकीला सामोरा जाताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कामत यांचे किंवा अन्य कुणा ज्येष्ठ नेत्याचे नाव पुढे करण्याची शक्यताही संपुष्टात आणली आहे.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्याकडे प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले असल्याने त्यांची उपयुक्तता पक्षाने मान्य केल्याचा निष्कर्ष निघतो. त्‍यांचे परिवर्तन असंतुष्ट आत्म्यांत होण्याची प्रक्रिया जारी होती. तिला या नियुक्तीने काही लगाम बसावा, अशी अपेक्षा आहे. रेजिनाल्ड यांनी याआधी गिरीश यांच्या हाती पक्ष सुरक्षित नाही, असे थेट विधान करताना आपले राजकीय वैर विसरून फ्रान्सिस सार्दिन यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे देण्याची शिफारस केली होती. आता त्यांना गिरीश यांच्याकडे जुळवून घ्यावे लागेल आणि त्यासाठी कदाचित गुळाचा गणपतीही व्हावे लागेल. अन्य नियुक्त्यांत लुईझिन फालेरो यांची निवडणूक समन्वय समितीवरील वर्णी लक्षणीय वाटते. ईशान्येकडील राज्यांत ते देत असलेल्या संघटनात्मक योगदानाची दखल पक्षाने या नियुक्तीद्वारे घेतलेली आहे. यात खासदार सार्दिन व कामत यांच्यासाठीही सबुरीचा संदेश दडला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. फालेरोंच्या दिमतीला एम. के. शेख हे दुसरे निष्ठावान आहेत. निवडणुकीच्या कसावर अपयशी ठरत असले, तरी असे निष्ठावंत मोक्याच्या ठिकाणी पेरावेच लागतात, ही ‘इंदिरानीती’ काँग्रेस आजही इमाने इतबारे अवलंबत आला आहे.

Goa politics
Goa Assembly Election: आता मतदारही झाला हुषार

रमाकांत खलप यांच्याकडे जाहीरनाम्याचे काम सोपवताना मांद्रे मतदारसंघातल्या त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक संगीता परब यांना प्रचार समितीचे उपाध्यक्षपद दिले जाते, यातले राजकारण गोव्याला कळेपर्यंत निवडणूक होऊन गेलेली असेल. मनोमीलनासाठी अजूनही वेळ शिल्लक आहे, अशा भ्रमांत तर पक्ष नाही ना? खलप आणि परब परिवारातली धाकटी पातीही आता सक्रिय झाली असल्याने हा प्रश्न अधिकच गहन बनतो. या व्यवस्थेत प्रतापसिंग राणे आणि रवी नाईक या माजी मुख्यमंत्र्यांना कुठेच स्थान नाही. राणेंची निवृत्ती गृहित धरताना पुढेमागे वेळ आलीच, तर विश्‍वजित यांच्याशीच बोलावे लागेल, याची कबुलीच पक्षाने दिली आहे. रवी नाईक यांना त्यांच्याकडे झालेले दुर्लक्ष अपेक्षित असावे. मुलांना भाजपात पाठवून त्यांनी परतीचे दोरही कापले आहेत.

या नियुक्त्या करण्याआधी राज्यातील सर्व गटसमित्या गुंडाळण्यात आल्या आहेत, त्यामुळे नव्या गटसमित्यांच्या गठनातून उमेदवारीचे संकेत मिळतील. अनेक ठिकाणी उमेदवारीवर डोळा ठेवून बस्तान बसवलेल्या गटाध्यक्षांनी ऐनवेळी फंदफितुरी करून पक्षाला अपशकून करू नये, यासाठीचीच ही सावधगिरी आहे. चिदंबरम यांचा या बरखास्तीमागे हात असून त्यांच्या अनुभवी नजरेने अल्पावधीच्या भेटीतही बरेच काही टिपल्याचे दिसते. शक्यतो माणसे तोडायची नाहीत, पण त्यांना शिरजोरही होऊ द्यायचे नाही, अशीच एकंदर रणनीती काँग्रेसने अवलंबिली आहे. या रणनीतीचे फलित पुढील तीन ते चार महिन्यांत समोर येईल. भाजपाशी संलग्न असलेले काहीजण या सप्ताहात काँग्रेसवासी होणार आहेत. त्याला भाजपा त्याच तोडीचे प्रत्युत्तर देईल, अशी हुल उठते आहे. भाजपाचे राजकारण प्रशस्त करील वा एक नवा मतदारसंघ जोडून देईल, असे काँग्रेसमध्ये निदान आघाडीच्या फळींत तरी कुणीच राहिलेले दिसत नाही. किंबहुना भाजपाच्या आमिशांना बळी पडण्याची शक्यता असलेल्यांना चार हात दूरच ठेवणाऱ्या या नियुक्त्या आहेत. नाविन्याची अपेक्षा धरलेल्यांचा त्या भ्रमनिरास करतीलही, पण काँग्रेसनेही लोकानुरंजनासाठी आत्मघातकी नाविन्य काअनुसरावे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com