Goa Accident: नवीन वर्षाच्या तोंडावर अपघातात चौघांचा मृत्यू, आणखी किती बळी?

अपघातांचे सत्रही थांबण्याचे, किमान नियंत्रणात आणण्याचे नामोनिशाण कुठेही दूरवर दिसत नाही.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Goa Accident: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुभेच्छा द्यायच्या की शोक व्यक्त करायचा, हा प्रश्‍न गोमंतकीयांना पडला असावा. कारण रस्ता अपघातांत गेलेला चौघांचा बळी.

शिवाय स्मार्टसिटी प्रकल्पातील श्‍वास कोंडणारा भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार आता जीवच घेऊ लागला आहे. एखाद्या शहराला ‘स्मार्ट’ बनवण्यासाठी किती मूर्खपणा केला जाऊ शकतो, याचा उत्तम नमुना म्हणजे पणजी शहर आहे.

कोण, का, कशासाठी, काय खणतोय हे कुणालाच माहीत नसणे याला स्मार्ट काम म्हणायचे का? २०२२साली दिलेले चौकशीच्या आदेशाची चौकशी करण्याची पाळी २०२४साल उजाडल्यावर येते. अशातच मुख्यमंत्री म्हणतात, ‘चौकशी सुरू आहे’.

वर्ष बदलले, पण गोव्याची विशेषत: पणजी शहराची होणारी स्मार्ट अवनती काही थांबण्याचे नाव घेत नाही; अपघातांचे सत्रही थांबण्याचे, किमान नियंत्रणात आणण्याचे नामोनिशाण कुठेही दूरवर दिसत नाही.

नव्या वर्षाची, नवी स्वप्ने उराशी बाळगून घरी परतणाऱ्या आयुष हळर्णकरला वाटलेही नसेल की उजाडणारी पहाट आपली नसेल. पणजीतील पीपल्स हायस्कूलसमोरील रस्त्यावर मलनिस्सारणाच्या कामासाठी खोदलेल्या खड्डा आयुषसाठी काळ ठरला आणि ‘स्मार्ट सिटी’च्या नावाने उडणारा गैरकारभाराचा धुरळा पुन्हा रक्ताळला.

या पूर्वी सांतिनेज भागात तुळतुळीत रस्त्यावर एकाएकी चिर्‍यांचा ट्रक खचला व एका कामगाराचा अंत झाला, तर रायबंदर येथे मातीचा ढिगारा कोसळून कामगाराला गुदमरून मरण आलेय. स्मार्टसिटी कामात चाललेल्या अक्षम्य गलथानपणाचे हे बळी आहेत. परंतु सरकारने डोळ्यांवर पट्टी लपेटून कानावर हात ठेवले आहेत.

कालच्या प्रकरणात कंत्राटदाराचा दोष नाही, असा दावा करणाऱ्या प्रशासनाला जेथे दुर्दैवी घटना घडली, ते ठिकाण अपघात प्रवण बनले होते, हे माहीत नव्हते का? पाटो पुलाकडून सांताक्रूझकडे जाणाऱ्या मार्गावर नेहमीच प्रचंड रहदारी असते.

पीपल्स विद्यालयानजीक रस्ता अरुंद आहे. त्यातही तो निम्म्याहून अधिक व्यापणारा मलनिस्सारणासाठी खोदलेला खड्डा. रात्रीच्या वेळी त्याच भागातील पथदीप बंद. बॅरिकेड्स लावलेले असले तरी त्याला रिफ्लेक्टर्स नव्हते. माध्यमांनी अपघाताची शक्यता वर्तवूनही उपाय झाले नाहीत आणि अखेर अनर्थ घडलाच.

खड्ड्यानजीक उभ्या मिक्सरला दुचाकीस्वार धडकला. खड्ड्याच्या बाजूने केवळ लाकडी फळ्या पुरेशा नाहीत. जिथे जिथे अशी कामे सुरू आहेत तेथे पथदीप सुरू नकोत का? चालकाची स्थिती, पंचनामा अहवाल समोर येईलच. परंतु ‘पीपल्स’ समोरील हमरस्त्यावरील बेजबाबदारपणा कुणाचा, हेदेखील जाहीर करून कठोर शासन करा.

स्मार्टसिटी प्रकल्प पणजीवासीयांवर अक्षरश: थोपवला आहे. अनागोंदीमुळे चाललेला उपद्रव सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही, अशा विचित्र अवस्थेतून लोक जात आहेत. नागरिकांना गृहीत धरले जात आहे.

कुणी बोलत नाही म्हणून मनमानी सुरू आहे. पणजीत दिसेल तेथे उकरणे सुरू आहे. एकदा उकरून पूर्ववत केलेल्या जागी काही दिवसांनी आणखी कुणी येतो, तो पुन्हा खोदकाम सुरू करतो. ‘आराखडा’ नावाची काही चीज आहे की नाही? धुळवडीमुळे श्वसनाचे विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी किमान एकदा दुचाकीवरून राजधानीची सैर करून पाहावी. पणजीवासीयांच्या व्यथा तेव्हाच कळतील.

स्मार्टसिटी प्रकल्पामागील मूळ उद्देश स्तुत्य आहे; परंतु तो ज्या पद्धतीने चालीस लावला जात आहे, ते प्रचंड आक्षेपार्ह आहे. निधी परत जाईल या भीतीने रेंगाळलेली कामे एका दमात पुरी करण्याच्या अट्टहासातून राजधानी गत वर्षी बेहाल झाली.

मात्र, त्यातून काही बोध घेतलेला दिसत नाही. चुका होतात, मात्र त्याची पुनरावृत्ती होणे कोडगेपणाचे लक्षण. पणजीतील लोकांना गृहीत धरले जात आहे. अनियोजित खोदकामांमुळे अनेक दुचाकीस्वार पडून जायबंदी झाले आहेत. डोळ्यांसमोर वास्तव असूनही एका ठेकेदाराला नोटीस देण्यापलीकडे कारवाई झालेली नाही.

प्रकल्पावर ५०० कोटींहून अधिक रक्कम खर्च होऊन फलित ते काय? एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतर मिळणारी चौकशीची आश्वासने वेळ मारून नेण्याचे साधन ठरते. पुढील काळात दुर्घटना टाळण्यासाठी काय करणार, हे जाहीर करा.

Goa Accident
G -20 परीषदेत RRR चा डंका...ब्राझीलच्या अध्यक्षांनी केलं चित्रपटाचं कौतुक

‘दुर्घटना कशामुळे झाली?’ याच्या चौकश्या फार पूर्वीपासून सुरू आहेत व त्यावर उपाययोजना करू, अशी आश्‍वासने देण्याचा राजकीय रिवाजही पडून गेला आहे.

न केलेल्या उपाययोजनांचे काय, हा प्रश्‍न विचारल्यास त्याचेही उत्तर बहुधा ‘चौकशी सुरू आहे’, असे येईल. चौकशी करण्यामागचे खरे कारण, ‘कोणावर दोष ढकलायचा?’ हे ठरवणे असते. त्यातही राजकीय सोय पाहिली जाते. पण, ज्यांचा जीव जातो त्यांचे काय? पणजी शहराची ही मरणकळा कधी संपेल, याचे उत्तर सरकारने देणे अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी किमान एकदा दुचाकीवरून राजधानीची सैर करून पाहावी. पणजीवासीयांच्या व्यथा तेव्हाच कळतील.

उदका नेले तिकडे जावे। केले तैसे सहज व्हावे।

मोहरी, कांदा,ऊस। एक वाफा भिन्न रस।।

— संत तुकाराम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com