चंदन गावकर हे गोव्यातल्या अग्रमानांकित छायाचित्रकारांपैकी (Painting) एक आहेत. त्यांच्या अनेक छायाचित्रांना आजपर्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. भारतातल्या ‘युथ फोटोग्राफिक सोसायटी’ने आयोजित केलेल्या 2021 सालच्या छायाचित्र प्रदर्शनासाठी त्यांच्या दोन छायाचित्रांची निवड झाली आहे. ‘युथ फोटोग्राफिक सोसायटी’, भारतातला सर्वात जुना फोटो क्लब आहे. छायाचित्रकारीतेच्या क्षेत्रात ही संस्था गेली पन्नास वर्षे यशस्वीपणे काम करते आहे. यंदाचे हे प्रदर्शन त्यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा भाग होता.
देश-विदेशातल्या सात वेगवेगळ्या सन्माननीय फोटोग्राफी संस्थांचे पाठबळ या प्रदर्शनाला लाभले आहे. त्यात भारतातल्या काही संस्थांबरोबरच अमेरिका, कॅनडा, ग्रीस, लक्झेंबर्ग या देशातील संस्थांचा समावेश आहे. या प्रदर्शनासाठी 64 वेगवेगळ्या देशांमधल्या 1276 स्पर्धकांनाकडून 17451 प्रवेशिका आल्या होत्या. जगात उच्च दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे परीक्षक मंडळ नेमण्यात आले होते.
निवड झालेली चंदनची दोन्ही छायाचित्रे, ‘कमळ’ (कृष्णधवल) आणि ‘यलो विंडो’ (रंगीत) वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ‘कमळ’ या त्यांच्या छायाचित्रात, गोलाकार कमलदलाच्या पार्श्वभूमीवर अर्धोन्मीलित कमळे छान संतुलनात उभी दिसतात. कमळाच्या पानांचा गडद ग्रे आणि पृष्ठभागावर असलेल्या कमळांच्या कळ्यांच्या तुलनेने फिका ग्रे यातून छायाचित्राला आकर्षक विरोधाभास लाभतो. चित्रांच्या मध्यभागी असलेल्या कमळांच्या पानांचा खोलगट भागही नजरेच्या आकर्षणाचे एक वेगळे केंद्र तयार करतो.
कमळांच्या पानांचा, छायाचित्राच्या वरपर्यंत पसरलेला गडद कृष्णधवल पोत आणि कमळांच्या कळ्यांचा सौम्य पोत यातून या मोनोक्रोमॅटिक चित्राला देखणे स्वरूप लाभले आहे. कमळांच्या कळ्यांचे स्थान छायाचित्राच्या खालच्या एक तृतीयांश भागातच निश्चित केल्यामुळे, वरचा, पाने असलेला मोठा भाग, कळ्यांच्या ठळक सौम्यतेला अधिकच पाठबळ देऊन त्यांना नजरेच्या आकर्षण केंद्राचा मुख्य भाग बनवतो.
‘यलो विंडो’ हे छायाचित्रदेखील त्यातली निळीभोर भिंत आणि सॅंडी ब्राऊन रंगाची खिडकी यांच्या, एकमेकाना मिळत असलेल्या रंगांच्या पुरकतेमुळे, प्राथमिक दर्शनातच आपल्याला आकर्षित करते. त्यानंतर हळूहळू भिंतीचा व्यापक आकार आणि चित्राच्या उजव्या बाजूला असलेली उभ्या गजांची खिडकी यामधले रंग आणि आकाराचे नाते आपल्याला या चित्राशी अधिक जवळीक करून देते. बंद खिडकीतून वाट काढत निघालेल्या आणि उजव्या बाजूच्या फ्रेमबाहेर जाणाऱ्या तारा, भिंत आणि खिडकी यांच्या एकमेकांना छेदणाऱ्या रेषांत आकर्षक अशीच भर घालते. खिडकीमधल्या उभ्या गजांचे पोत छायाचित्रातल्या गडद निळ्या अवकाशात खिडकीला एक प्रकारचे स्थैर्य देतात जे नजरेला काही काळानंतर जाणवते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.