डॉ . मनोज सुमती बोरकर
तापमानवाढ ही जागतिक समस्या आहे. भारतात उष्णतेची लाट सामान्यत: उत्तरेकडील राज्यांना त्रस्त करते. गोव्यात ती काही भागांपुरती मर्यादित असते.
असे असले तरीही, २०४०पर्यंत गोव्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सिअस नोंदवले जाईल, असा इशारा ‘गोवा स्टेट ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज’ने दिला आहे. येऊ घातलेल्या हवामान आपत्तीची ही आणखी एक साक्ष आहे.
या तापमानवाढीच्या परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गोव्याने केवळ या हवामान बदलांविरुद्ध लढण्यासाठी तयार राहणे पुरेसे नसून, हवामानाशी जुळवून घेण्यासही शिकले पाहिजे! फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारने ‘मिश्र वित्तीय सुविधे’अंतर्गत तब्बल १,६५० कोटी रुपयांचा हवामान निधी स्थापन करण्यासाठी जागतिक बँकेसोबत भागीदारी केली. भारतातील इतर किनारी राज्यांसाठी हा उपक्रम एक उदाहरण ठरणार आहे. अचूक अंदाज वर्तवण्याइतके हवामानशास्त्र आज प्रगत झाले आहे.
१४ मार्च रोजी गोवा सरकारने जाहीर केलेल्या ’गोवा हीट व्हेव्ह ऍक्शन प्लॅन २०२४’ मध्ये राज्यातील उष्णतेच्या लाटेच्या प्रभावांना प्रतिबंध करण्यासाठी अनेक विभाग त्यांच्या जबाबदार्यांसह अधिसूचित केले आहेत. नदीचे खोरे, समुद्र आणि महासागर याआधीच हवामान बदलामुळे प्रभावित झाले आहेत अशी माहिती आणि हे परिणाम भविष्यात अधिक तीव्र होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
अत्याधिक जमीन-आधारित पोषक घटकांमुळे प्रदूषित झालेल्या पाणवठ्यांमध्ये नील-हरित जिवाणू (सायनोबॅक्टेरिया) वाढतात आणि शेवाळी वाढल्याने पृष्ठभागाचे पाणी आणखी गरम होते. शेवाळी विषारी द्रव्ये तयार करतात ज्यामुळे अपग्रह (ॲलर्जी), पोटाचे विकार, जठरविकार आणि श्वासोच्छ्वासास त्रास होऊ शकतो.
हळूहळू, अशा साचलेल्या पाण्याचे साठे विरघळलेला प्राणवायू गमावतात आणि शेवटी त्यांचे ‘जैविक वाळवंट’ होते. समुद्र आणि नद्यांमध्ये मत्स्यदुष्काळ झाल्यामुळे मत्स्यव्यवसायावर नकारात्मक परिणाम होतो. अशा हायपोक्सिक/अनॉक्सिक वॉटरबॉडीजमध्ये वाढलेली आम्लता जलीय रसायनशास्त्र अस्वस्थ करू शकते आणि अनेक जीवन प्रक्रियांमध्ये व्यत्यय आणू शकते, तसेच या परिसंस्थांच्या प्रजातींची रचना आणि समुदाय रचनादेखील बदलू शकते.
उष्णतेच्या लाटेमुळे जंगलांना वारंवार आग लागण्याची शक्यता असते. अलीकडच्या काळात ईशान्य आणि मध्य भारतातील जंगलांत लागलेली आग हा याचा पुरावा आहे. एकदा जंगलात आग लागली की, अधिवासाचा र्हास होतो, वन्यजिवांसाठी चारा कमी होतो आणि अनेक प्रजाती नष्ट उष्णतेची लाट ही हवामानशास्त्रीय घटना असली तरी, मानवावर होणारे त्याच्या परिणामांचा विचार केल्याशिवाय त्याचे मूल्यांकन करता येत नाही. उष्णतेशी संबंधित आजार आणि मृत्यू वाढतील. सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणाली जोखमीनुसार लवचीक असणे आवश्यक आहे.
उष्णतेच्या लाटा वाढत वाढत मानवी सहनशक्तीच्या पलीकडे जात आहेत. राहण्याची जागा थंड करण्यासाठी वातानुकूलित यंत्र (एअर कंडिशनर) वापरणे आवश्यक आहे. विजेची मागणी वाढल्याने विजेचा तुटवडा निर्माण होऊन ऊर्जा क्षेत्राला फटका बसतो.
आधीच गजबजलेल्या आणि कॉंक्रीटीकरण केलेल्या शहरातील मोकळ्या जागा गरम हवा रोखून धरत असल्याने उष्णतेची बेटे तयार होत आहेत. शहरी पर्यावरणाची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी नगर नियोजकांनी हरित छत, नैसर्गिक पद्धतीने उष्णता कमी करण्याचे तंत्र, स्प्रे-पार्क आणि शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये हरितभूमीची निर्मिती करणे आवश्यक आहे.
सूर्यस्नान केलेले किनारे, उत्कृष्ट पाककृती, आतिथ्यशील संस्कृती आणि चांगले हवामान असलेले गोवा हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हवामानबदलामुळे जग झोडपले जात असताना गोवाही त्यापासून फार दूर नाही. गोव्याच्या बदलत्या हवामानाकडे लक्ष देण्याची गरज आहे. दक्षिण-पश्चिम मॉन्सूनने आणलेल्या भरपूर पावसाने राज्याला आशीर्वाद दिल्याने आणि सरासरी वार्षिक तापमान सुमारे २६ डिग्री सेल्सियस राहिल्याने आल्हाददायक हवामान आहे.
तथापि, हवामान बदलावरील राज्य कृती आराखडा (एसएपीसीसी) - ज्यामध्ये मी शैक्षणिक भागधारक म्हणून महत्त्वपूर्ण माहितीदेखील दिली आहे - यानुसार गेल्या शतकात राज्यातील सरासरी वार्षिक तापमान १ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त वाढले आहे; जे अखिल भारतीय सरासरी ०.७३ डिग्री सेल्सियसपेक्षा खूप जास्त आहे. गोवा आणि पश्चिम किनाऱ्यावरील इतर सागरी राज्यांमध्ये अशा तापमानात वाढ झाल्यामुळे अरबी समुद्र वेगाने गरम होत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये गोव्यातील दैनंदिन कमाल तापमान काही प्रसंगी ३९ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त नोंदवले गेले आहे. येत्या काही वर्षांत, उन्हाळ्याच्या महिन्यांत ते ४० डिग्री सेल्सिअस आणि त्याहूनही पुढे जाऊ शकते, अशी भीती एसएपीसीसीने व्यक्त केली आहे. गोव्यातील तापमानाने ४० डिग्री सेल्सिअस हा आकडा पार करणे विशेष चिंताजनक ठरेल, कारण जागतिक हवामान संघटनेने मैदानी भागांत उष्णतेच्या लाटांसाठी ४० डिग्री सेल्सिअस तापमान निश्चित केले आहे.
उच्च पातळीच्या आर्द्रतेत उष्णतेच्या लाटा मिसळणे जीवघेणे ठरू शकते. उच्च आर्द्रता शरीराच्या घामाने थंड होण्याच्या क्षमतेस अडथळा आणते, म्हणून आर्द्र वातावरणात कमी तापमानात जास्त उष्ण वाटते. विशेषत: उच्च आर्द्रता असलेल्या गोव्यासारख्या किनारपट्टीच्या राज्यासाठी संभाव्य उष्णतेच्या लाटा चिंता वाढवणाऱ्या आहेत.
भीतीदायक गोष्ट अशी आहे की तापमानवाढीसोबतच आर्द्रतादेखील वाढण्याचा अंदाज आहे - प्रत्येक १० सेल्सिअस तापमान वाढीसह, हवेची पाणी धारण क्षमता सुमारे ७% वाढते. उष्णतेच्या लाटा आणि त्यांचे धोके भारतात सर्वज्ञात असले तरी, दमट-उष्णतेच्या लाटांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या घटनांकडे दुर्लक्ष होणे परवडणार नाही.
बरोबर वर्षभरापूर्वी नवी मुंबईतील खारघर येथे उघड्यावरील कार्यक्रमादरम्यान केवळ ३८ सेल्सिअस तापमानात उष्णतेच्या लाटेमुळे १३ जणांचा मृत्यू झाला आणि ५० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोव्यात उन्हाळ्यात सारखेच उष्ण-दमट हवामान आहे आणि निवडणुकीशी संबंधित क्रियाकलाप आता अंतिम टप्प्यात येतील आणि ७ मे रोजी मतदान होईल. उष्णतेमुळे येणारा अशक्तपणा आणि मृत्यू या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी गोव्यातील आरोग्य क्षेत्राने कंबर कसली पाहिजे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या बदलत्या हवामान परिस्थितीची स्वत:हून दखल घेतली पाहिजे. याविषयी सार्वजनिक सूचना जारी करण्यासोबतच आणि उष्मा निवारण केंद्र, ‘सन-शेड’, ‘वेट वाइप्स’, पिण्याचे पाणी, ‘ओआरएस’ची पाकिटे आणि हातपंखे पुरवण्याची सोय करावी.
तैनात कर्मचारी आणि मतदार यांच्या आरोग्यावर उष्णतेच्या लाटेमुळे होणारे परिणाम कमी करण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. हवामान डेटा मॉडेलवर आधारित प्रारंभिक सूचना, अनेकांचे जीव वाचवू शकतात
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.