खाद्यभ्रमंती : कृतज्ञता जोपासणारे ’एडवर्ड यार्ड’

’एडवर्ड यार्ड’ या नावामागची गोष्ट भावली. कृतज्ञता अशीही व्यक्त केली जाऊ शकते.
Edward's Yard bar and Restaurant
Edward's Yard bar and RestaurantDainik Gomantak

Goa food blog : खाद्या रेस्टोरंटचे नाव तुम्ही अनेक दिवसांपासून फक्त ऐकत असता, पण तिथे जायला वेळ मिळत नाही असे बरेचदा होते आणि हे रेस्टोरंट जर तुमच्या रोजच्या रस्त्यापासून जरा आडवळणावर असेल तर मग तुम्हाला छान निवांत वेळ काढूनच तिथे जावे लागते. आगशी गावातील ‘एडवर्ड यार्ड’ रेस्टोरंटबद्दल अनेक वर्षांपासून ऐकून होते.

मडगावला जाताना बांबोळीचा उतार असणारा रस्ता मागे टाकून पिलारच्या दिशेने जाताना ‘एडवर्ड यार्ड’ नावाची पाटीदेखील अनेकदा बघितली होती. परंतु नवा ‘हायवे’ झाल्यापासून आता हे चढ उताराचे रस्ते लागत नाहीत की गोवा वेल्हा, पिलार, आगशी गावातील जिवंत दृश्य दिसणारी बाजारपेठ नजरेस पडत नाही.

कदाचित यामुळेही ‘एडवर्ड यार्ड’चे नावदेखील विस्मरणात गेले असावे. गेल्या महिन्यात मडगावमधील एक कार्यक्रम उरकून पणजीला परत यायला भलताच उशीर झाला. मी, राजू आणि दिलीप बोरकर तिघांनाही भूक लागली होती.

पणजीत पोहोचून जेवायचे म्हटले तर बराच उशीर झाला असता. पोटात कावळे ओरडत होते. मडगाव ते कुठ्ठाळीपर्यंत सगळीच रेस्टोरंट बंद झाली होती. कुठ्ठाळीहून पुढे येताना दिलीपला एकदम ‘एडवर्ड यार्ड’ आठवले.

आगशी हे दिलीपचे गाव. त्याचे सगळे बालपण या गावात गेले. त्यालादेखील ‘एडवर्ड यार्ड’मध्ये जाऊन बरीच वर्ष झाली होती. मग काय आमची गाडी ‘एडवर्ड यार्ड’च्या दिशेने वळली. ठरवूनही इथे येणे झाले नसते इतके अचानक आमचे तिथे जाणे झाले.

Edward's Yard bar and Restaurant
खाद्यभ्रमंती : हा काळ पावसाळी रानभाज्यांचा

पिलारमधील छोट्या वळणदार रस्त्यावरून आम्ही एडवर्ड यार्डच्या दारात येऊन पोहोचलो. तिथे पोहोचण्यापूर्वी दिलीपने रेस्टोरंट उघडे आहे ना याची खात्री करून घेतली होती. रेस्टोरंटचा मालक मयूर धोंड शेजारीच राहतो. तो त्या दिवशी नव्हता पण त्यांचे वडील मोहन धोंड यांची भेट झाली. ‘हे माझ्या मुलाचे रेस्टोरंट आहे’ हे मोठ्या अभिमानाने ते सांगत होते.

‘एडवर्ड यार्ड’मधील पदार्थांबद्दल खूप ऐकून होते पण तिथल्या वातावरणाबद्दल, निसर्गरम्य परिसराबद्दल अनेकांचे कौतुकाचे बोल ऐकले होते. पण आम्ही अशा वेळी पोहोचलो होतो की आजूबाजूचा परिसर बघणं- दिसणे शक्य नव्हते. लवकर काहीतरी खायला मिळावे याकडेच आमचे लक्ष होते.

चणक रवा फ्राय ऑर्डर केला तोवर आमच्याशी गप्पा मारायला मोहन धोंड आले. बंदिस्त नसलेल्या खुल्या जागेत पावसाळी हवेतील गारवा जाणवत होता. निसर्गाच्या सान्निध्यात बसून स्वादिष्ट पदार्थ खाण्याची मजा लुटता यावी अशा पद्धतीने इथली रचना करण्यात आली आहे. मग मोहन धोंड यांच्याकडून समजले की या सगळ्याचे डिझाईन आमचे मित्र प्रसिद्ध कला दिग्दर्शक, कल्पक रचनाकार सुशांत तारी यांनी केले आहे.

आजचा दिवस मित्रांचाच होता. सुरू असलेल्या गप्पांमध्ये-आजूबाजूच्या रचनांमध्ये सर्व मित्रांचीच ‘मांदियाळी’ जाणवत होती. गरम गरम चणक सोबत मित्रांविषयी रंगलेले वेगवेगळे किस्से यामुळे भुकेला जरा आधार मिळाला.

’एडवर्ड’ नावामागची गोष्ट

रेस्टोरंटचे मालक धोंड पण रेस्टोरंटचे नाव ‘एडवर्ड यार्ड’ कसे? असा मला उगाच प्रश्न पडला. खरे तर गोव्यात अशा प्रश्नाला काही अर्थ नाही. छोट्याशा गावात ‘ख्रिश्चन - हिंदू’ यांच्या सौहार्दाची अनेक जिवंत उदाहरणे मी स्वतः अनुभवली आहेत.

ख्रिश्चन कुटुंबांनी आपल्या मुलांची ‘हिंदू’ नावे ठेवल्याची असंख्य उदाहरणे आजूबाजूला आहेत. त्यामुळे ‘एडवर्ड’ नावाचे तसे आश्चर्य नव्हते. पण या नावामागे काही वेगळी गोष्ट, कारण असू शकते एवढेच मला वाटत होते. तेच जाणून घेण्यासाठी मी या मित्रांच्या सुरू असलेल्या चविष्ट गप्पांमध्ये ‘खो’ घालून रेस्टोरंटच्या नावाचा विषय काढला.

धोंड यांनी हे रेस्टोरंट आपल्याच वडिलोपार्जित जागेत सुरू केले. या जमिनीची राखणदारी ‘एडवर्ड’ नावाच्या व्यक्तीने केली. एडवर्ड आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत धोंड कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि आजही आहेत. धोंड यांचा मुलगा मयूर हा तर एडवर्ड यांच्या अंगाखांद्यावर वाढला. जेव्हा मयूरने स्वतःचे रेस्टोरंट सुरू करायचे ठरवले तेव्हा त्याला ‘एडवर्ड’ हे नाव देण्याचे पक्के करून टाकले आणि ते अमलातदेखील आणले.

ज्या जमिनीची देखभाल एडवर्ड यांनी मोठ्या आपुलकीने केली त्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या रेस्टोरंटला त्याचेच नाव देणे किती सार्थक ठरले! आज हे रेस्टोरंट खूप प्रसिद्ध आहे. अनेक खवय्ये खूप दुरून इथे मुद्दाम जेवायला येतात. ‘एडवर्ड यार्ड’मध्ये तृप्त होऊन जातात. हे सगळे उभे करताना कष्ट आलेच पण यात देखील ‘आपुलकीचा’, ‘कृतज्ञतेचा’ भाव जपण्याचे मयूरने केलेले काम वाखाणण्यासारखे आहे. रेस्टोरन्टच्या नावामागे एखादी गोष्ट लपलेली असू शकते हे तुम्हांलाही आता पटले असेल.

कुरकुरीत मिरपूड मटण - चिकन ते चिकन पाणीपुरी

एडवर्ड यार्ड हे ताज्या मासळीची प्रसिद्ध असले तरी इथे चविष्ट शाकाहारी पदार्थदेखील मिळतात. चायनीज पदार्थ खायला अनेकजण इथे येतात. मोगलाई कबाब, नान, पराठापासून ते इथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पंजाबी पदार्थांनादेखील मागणी असते.

चिकन शाकुती, चिकन - फिश काफ्रियाल, आंबटतीख, डांगर, रेषाद बांगडा असे गोमंतकीय पारंपरिक पदार्थ प्रसिद्ध आहेत. पण इथले स्टार्टर्सदेखील तेवढेच आगळेवेगळे आहेत. मिरपूड घातलेले कुरकुरीत मटण, मालवणी चिकन, वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रिंग रोल, मशरूम मांचुरियन या पदार्थांनी उत्सुकता वाढवली पण यात आणखी एक पदार्थ असा होता की त्याचे नाव वाचूनच कसा असेल? असे वाटू लागले.

‘चिकन पाणीपुरी’ हे त्या पदार्थाचे नाव. पाणीपुरी शाकाहारीच असू शकते असे इतके दिवस मानून चालत असणाऱ्यांना इथे चिकन पाणीपुरी खायला मिळेल.

मयूरने मेनू खूप आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनवला आहे. परत एकदा मुद्दाम जेवायला गेले पाहिजे. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असे विशेष क्षण ‘एडवर्ड यार्ड’मध्ये साजरा करतात. मी दरवेळी रेस्टोरंटमध्ये कोणते चविष्ट पदार्थ मिळतात यावर लिहीत असते, पण यावेळी मला ‘एडवर्ड यार्ड’ या नावामागची गोष्ट भावली. कृतज्ञता अशीही व्यक्त केली जाऊ शकते हे मयूरने आपल्याला ‘एडवर्ड यार्ड’च्या माध्यमातून दाखवून दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com