गोव्यात सध्या शिगमोत्सव बहरात असून, लोकनृत्य, लोकगीत आणि लोकसंगीताच्या अविष्काराने समृध्द असलेल्या या उत्सवातून इथल्या लोकजीवनातल्या विविधांगी पैलूचे दर्शन घडत असते.
गोव्यात राज्यवृक्ष, राज्यपक्षी, राज्यप्राणी आदींची सरकारी स्तरावरती अधिकृतरित्या घोषणा केलेली असली तरी शेजारच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकासारखे आपल्याकडे राज्य फुलाची घोषणा केलेली नाही. परंतु असे असले तरी शेकडो वर्षांपासून गोमंतकीय संस्कृतीने अबोलीच्या फुलाला राज्य पुष्पाचा जणूकाही दर्जा प्रदान केलेला आहे.
त्यामुळे सरकारी पातळीवरचा जरी सन्मान या फुलाला देण्यात आलेला नसला तरी या फुलांच्या माळा, गजरे यांना महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. सुवासिनी किंवा कुमारिका स्त्रीचे सौंदर्य खुलवण्यासाठी भारतीय लोकजीवनात विशेषतः सुगंधीत फुलांचा प्रामुख्याने वापर होत असला तरी आकर्षक रुप आणि मनमोहक सुगंधाची देणगी लाभलेली नसतानाही अबोलीच्या फुलांसारखा गोमंतकीय अन्य फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होत नाही.
क्रॉसेंड्रा इन्फंडिबुलिफॉर्मिस या नावाने वनस्पतीशास्त्रात परिचित असलेली ही झुडुप वर्गातली वनस्पतीभारत, श्रीलंका, मलेशियात प्रामुख्याने लागवड केली जाते. हिरव्या व केसाळ सहपत्राच्या बगलेत फिकट पिवळसर किंवा नारिंगी रंगाचीही फुले शिमगोत्सवातल्या विविध नृत्य, गायन, वादनाबरोबर लोकविधीत हवीच.
शुष्क फळांमध्ये चार बिया य झुडुपावरती आढळतात. त्याच्यावरती जेव्हा पाण्याचा अलगदपणे शिडकावा पडल्यावर फटफट आवाज करत ही फळे फुटतात आणि त्याच्या बिया विखूरतात. फटाक्याप्रमाणे आवाज करत बीजप्रसारण होत असल्याने या फुलांना इंग्रजीत फायर क्रॅकर अशी संज्ञा प्राप्त झालेली आहे. अबोलीची फुले पूर्ण भगवी ना गुलाबी, ना लाल रंगाची नसताना त्यांचा वापर शिगम्यातल्या नानाविविध लोकविधीत, लोकनृत्यांत केला जातो.
आकर्षक रंग, रूप, गंध नसतानाही अबोलीच्या फुलांचे गजरे, माळा यांचा लोककलाकार वापर करतात. पूर्वी ग्रामीण भागातल्या सुवासिनी स्त्रिया जत्रा, धालोसारख्या उत्सवात या फुलांचा वापर करून जे गजरे तयार करायच्या, त्यांचा उपयोग करत.
वर्षाचे बारा महिने अबोलीच्या झुडपावरती फुलांचा बहर विलसत असला तरी शिशिरोत्सवातल्या कलाकारांच्या सौंदर्याला खुलवण्यासाठी ही फुले या मौसमात असह्यकारक उकाडा सोसत ही विमुक्तपणे फुलतात आणि त्यामुळे प्रतिकुल परिस्थितीत आपल्यातले फुलणे कायम ठेऊन, ही फुले मानवी जगणे अधिकाधिक सुंदर करण्यात जणूकाही योगदान करत असतात.
त्यामुळे अबोलीच्या फुलांचा वापर सण उत्सवात केला जात असावा. जी फुले फिकट नारिंगी असतात त्यांना गोव्यातल्या स्त्रियांनी पिशी अबोली तर गडद नारिंगी रंगाच्या फुलांना रतन अबोली असे नामकरण केलेले आहे. काळ्या केसात जेव्हा अबोलीच्या या फुलांचे गजरे विलसू लागतात, तेव्हा त्यांच्या देखणेपणात आणखीन भर पडते.
वर्षाचे बारा महिने, गोव्यात जे सण उत्सव विधी संपन्न होतात, त्यात अबोलीच्या फुलांच्या गजऱ्यांना आणि माळांना स्थान लाभलेले आहे. नवरात्रीनंतर जेव्हा विजयादशमीचे आगमन होते तेव्हा पुरुष आणि स्त्रीतत्वाचे प्रतीक असणारी तरंगे ढोल, ताशांच्या निनादात मिरवणुकीत निघतात, त्यावेळी तरंगाना अबोलीचे हार भक्तिभावाने अर्पण करण्यात भाविक धन्यता मानतात. गावातल्या वार्षिक जत्रा, कालोत्सवाला ग्रामदैवताला जे पुष्पहार अर्पण केले जातात, त्यात अबोलीच्या हारांचा हमखासपणे सहभाग असतो.
धालो, कालोत्सवात बऱ्याचदा होणाऱ्या लिलावाच्यावेळी देवीला अर्पण केलेला अबोली फुलांचा वळेसर विकत घेण्यासाठी भाविक उत्सुक असतात. गोव्यात बकुळ, मोगरी, चाफा आदी सुगंधीत फुलांचे वळेसर सुवासिनी केसात माळण्यासाठी जरी उत्सुक असतात, तरी अबोलीच्या फुलांचा वळेसर भाव खाऊन जातो. जत्रा, कालो, धालो आदी उत्सवांत अबोलीच्या फुलांना जशी विशेष मागणी असते, त्याचप्रमाणे या फुलांना शिमग्याच्या उत्सवात जी लोकनृत्य, लोकविधी केले जातात, त्यावेळी प्रामुख्याने मागणी असते.
महाराष्ट्रातल्या शिरोड्याजवळ जो आरवली गाव आहे तेथील वेसोबा गोवा -कोकणातल्या भाविकांचे श्रध्दास्थान अजून, ज्यावेळी शिशिरात आरवली परिसरातल्या सुरंगीना बहर येतो, त्यावेळी एखाद्या सोमवारी सुरंगीच्या फुलांची विक्री अन्यत्र न करता, ती फुले वेतोबाच्या पूजेला पाठविण्यात येतात. वेतोबाची मूर्ती यंदा फाल्गून पौर्णिमेच्या सोमवारी सुरंगीच्या फुलांनी अलंकृत केली होती.
सुरंगीच्या फुलांच्या गजऱ्यात अबोली पुष्पाच्या माळा सजावट करण्यासाठी या पूजेत वापरण्यात आल्या होत्या. पिवळसर सुरंगीत अबोलीचा नारिंगी रंग खुलून दिसत होता. दर दोन वर्षांनी सत्तरीतल्या ठाणे- डोंगुर्लीत असलेल्या मुंडळगिऱ्याच्या पारंपारिक मळा व चोदा घोडेस्वारांनी युक्त घोडमोडणीचे लोकनृत्य संपन्न होते, त्यावेळी लाकडी घोड्याच्या मुखवट्याला कंबरेला बांधून आणि हाती लखलखत्या पात्याच्या तलवारी धारण केलेले वीर आपल्या मस्तकी अबोली फुलांच्या माळांनी समृध्द असलेले पागोटे धारण करतात.
प्रत्येक घोडेस्वाराच्या गळ्यात अबोलीच्या फुलांच्या माळा घातल्या जातात. गोव्यात सत्तरी, डिचोली, पेडणे, धारबांदोडा येथे जेव्हा शिगम्यात घोडेमोडणी लोकनृत्याचे सादरीकरण केले जाते, तेव्हा मस्तकी आणि गळ्यातल्या आबोली पुष्पांच्या माळा आणि एकंदर सजावट, लक्षवेधक अशीच असते. पूर्वी घोडेस्वाराच्या मस्तकी अबोली पुष्पांची सजावट अत्यंत कल्पकतेनं केली जायची.
केपेतल्या बाळ्ळी गावात शिगमोत्सवात शांतादुर्गा देवीच्या समोर दरवर्षी जो बगाड सदृश्य शिड्योत्सव संपन्न होतो, त्यावेळी व्रतस्थ गड्यांच्या मस्तकी अबोली फुलांच्या माळा सुंदररितीने बांधल्या जातात आणि त्यातल्या एका गड्याला बगाडाला बांधून वरच्यावर फिरवले जाते.
नेत्रावळी अभयारण्याच्या कुशीत नुंदे गावातल्या जाकी येथे फाल्गून पौर्णिमेला हाणपेट नावाचा लोकविधी होतो, त्यावेळी हाती तलवार घेऊन अंगी वार करत असल्याचे प्रात्यक्षिक करणारे व्रतस्थ गडे गळ्यात अबोली पुष्पाच्या माळा धारण करतात गोव्यात दरवर्षी शिरगावच्या लईराई देवीच्या जत्रेच्या आसपास मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त म्हापसा येथील तारवाड्यावरती साजरे होते.
ही मिलाग्रीस सायबिण ख्रिस्ती धर्मीयांसाठी येशूमाता मेरी तर गोव्यातल्या हिंदूसाठी मिराबाई ठरलेली आहे. लईराईची एक बहीण मानल्या गेलेल्या मिलाग्रीस सायबिणी ख्रिस्ती धर्मीयांसाठी येशूमाता मेरी तर गोव्यातल्या हिंदूसाठी मिराबाई ठरलेली आहे. लईराईची एक बहीण मानल्या गेलेल्या मिलाग्रीस सायबिणीच्या उत्सवमूर्तीला भाविक अबोलीच्या माळा भक्तिभावाने अर्पण करतात.
सत्तरीतल्या बऱ्याच गावात शिमगोत्सवात कधीकाळी पत्नीच्या मृत्यूनंतर जी पत्नी सती गेली होती, तिच्या स्मरणार्थ दरवर्षी पुरुषांना करवल्या म्हणून स्त्रीवेषात सजवून, त्यांची ढोल ताशाच्या लोकसंगीतावरती मिरवणूक काढली जाते.
या उत्सवातल्या स्त्रीवेषातल्या पुरुषांना अबोलीच्या फुलांनी अलंकृत करण्यात सुवासिनी धन्यता मानतात. धालो, शिगमोउत्सवात अबोली पुष्पांच्या गजऱ्यांचा जसा प्रामुख्याने वापर केला जातो. त्याचप्रमाणे लोकगीतांतही त्यांचा संदर्भ येतो. राज्यसरकारने जरी अबोलीच्या फुलांना अजून राज्यपुष्पाचा सन्मान बहाल केलेला नसला तरी गोमंतकीय लोकमानसाने आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात अबोलीच्या फुलांना आदराचे स्थान दिलेले आहे.
वर्षाचे बारा महिने गोव्यात जे सण उत्सव विधी संपन्न होतात, त्यात अबोलीच्या फुलांच्या गजऱ्यांना आणि माळांना महत्वाचे स्थान लाभलेले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.