Agriculture: शेतकऱ्यांच्या आत्महत्या ’त्याने आपले सर्वस्व बाजारव्यवस्थेवर अवलंबून ठेवल्यामुळे!'

शेतकऱ्याचे गणित चुकते आणि आत्महत्येशिवाय त्याला पर्याय दिसत नाही.
 Agriculture
Agriculture Dainik Gomantak

शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त आत्महत्या महाराष्ट्र व पंजाब यांसारख्या ‘प्रगत राज्यांमध्ये का?’ याचे मला सापडलेले सोपे उत्तर म्हणजे ’शेतकऱ्याने आपले सर्वस्व बाजारव्यवस्थेवर अवलंबून ठेवल्यामुळे! ’ पैसा हे सर्वस्व मानून त्याच्याकडे आपले भवितव्य समर्पित केल्यामुळे. कॅशक्रॉप म्हणजे व्यापारी पिकांच्या मागे लागल्यामुळे. त्यातून भरपूर पैसा मिळेल.

हे आकड्यांचे गणित, त्याच्या भरोशावर. विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीन, कापूस ही नगदी पिके. पाऊसपाणी नीट नाही झाले तर कपाळावर हात मारायची पाळी. पीक भरघोस आले तर? व्यापारव्यवस्था क्रूर असते. शेतमालाचे दर पाडले जातात. शेतकऱ्याचे गणित चुकते आणि आत्महत्येशिवाय त्याला पर्याय दिसत नाही. कारण कापूस खाता येत नाही. केवळ सोयाबीनवर जगता येत नाही.

ऋषीसंस्कृतीहून जुनी कृषिसंस्कृती. शेकडो पिढ्या त्यात जगल्या. मानवी संस्कृती बहरत राहिली. सृष्टी हीच आपले पालन-पोषण करणारी माता या भावनेने. आपल्या जीवनाच्या सर्व गरजा ती भागवणार या तत्त्वानुसार कृषिवर्गाची जीवननीति आणि त्यानुसार कृषिव्यवस्था. जेव्हा पैसा हा आपले पालन-पोषण करणारा आणि शेती ही तो पैसा मिळविण्यासाठी, अशी रचना स्वीकारली, तेव्हा सारे गणित बदलले.

कृषीतून सृष्टी जे देते, त्यातील व्यापाऱ्याला काय पाहिजे तेवढेच महत्त्वाचे बाकीचा कचरा अशी नीती बनली. या शेतीतून निसर्गाने दिलेल्यांतील फक्त 15-20 टक्के भाग व्यापाऱ्याला पाहिजे असतो, बाकीचा त्याच्या दृष्टीने कचरा.80-85 टक्के कचरा निर्माण करणारी शेती किफायतशीर कशी होणार?

दाणा, किंबहुना दाण्यातील गर ही उपयुक्त वस्तू. तांदळाचा करड काढून टाकलेला दाणा हीच काय ती उपयुक्त वस्तू. त्यावरील टरफल, कणीस व गवत हा कचरा कृषिसंस्कृतीत या सर्वांचा उपयोग व्हायचा. दाण्यावरचा कोंडा चाळून टरफल व करडीचा कोंडा वेगळा केला की त्या सत्त्वयुक्त कोंड्याची भाकरी- थालीपीठ बनवायचे (बद्धकोष्ठवाल्याना उत्तम) किंवा पशुखाद्य म्हणूनही उपयुक्त.

टरफलांची रास केली आणि रात्री त्यावर जळता निखारा ठेवला की दुसऱ्या दिवशी त्याची पांढरी किंचित करडी अशी राखुंडी बनायची. दात घासायला, पितळीच्या मूर्ती घासण्यासाठी खसखशीत राखुंडी. गवताची गोल ’मुडी’ बनवून त्यात भात (तांदूळ कांडण्याआधीचे धान्य) साठवायचे.

गोवा बागायतदार सोसायटीचे एक माजी अध्यक्ष सांगत होते की, त्यांच्या घरांतील अडगळीत त्यांना 40 वर्षांपूर्वीची भाताची मुडी सापडली. मुडीतील धान्य अजून चांगले होते. या भाताचे तण (भातयण) गुरांना खाण्यासाठी, आंबे पिकविण्यासाठी वापरले जायचे. निसर्गाने दिलेल्या उत्पादनाचा 100 टक्के वापर.

नारळीच्या झाडाच्या उत्पन्नापैकी खोबरे हाच उपयुक्त भाग आज आपण वापरतो. बाकी कचरा. पण त्या झाडा-फळाचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे हे बहुतेक गोवेकरांना माहीत आहे. केळीचे झाड घेऊ. यात केळ्याचा गर फक्त खाण्याचा त्याच्या सालीसह सर्व कचरा, असा समज आहे. पण त्या झाडा-फळाचा प्रत्येक भाग उपयुक्त.

साली गुरांना, केळीची पाने जेवण्यासाठी वापरली जायची. मी हल्लीच वाचले आहे की, केळीच्य पानात एपिगॅलोकॅटकिन गॅलेट किंवा ईजीसीजी ही अँटिऑक्सिडन्ट्स आहेत. गरम अन्नातून आपल्या शरीरात जाऊन कॅन्सरविरोधाचे काम करतात. (आज प्लास्टिक कप व प्लेट कॅन्सरला मदत करतात त्याच्या नेमके विरुद्ध). केळी येणे थांबून नुसते केळफूल राहते, त्याची आम्ही भाजी करतो. केळफुलाची रोज एकेक पाकळी.

खाली गळते. त्या सुकलेल्या पाकळ्यांपासून केसांचा शांपू माझ्या आईने बनविलेला, वापरलेला मी पाहिला आहे. झाडाला प्रत्येक पानाबरोबर बाहेरून एक साल येते तिला गभा म्हणतात. ती फाडून वाळवली की दोर बनतात. देवळाजवळ गावठी फुलांच्या माळा विकतात त्यात केळीचे दोर वापरलेले असतात. केळ्यांचा घड काढला की मग झाड फुकट. ते कापून त्याचे गभे काढले जायचे. या आतील पांढऱ्या लुसलुशीत चमकदार गभ्याचे देवळांच्या गर्भगृहात मरखर बनवायचे.

आजही बनविले जाते. (पण, या गभ्यांच्या बदली प्लास्टिकच्या पन्हाळी वापरल्या जातात !) केळीची पाने सुकून लोंबायची. त्या सुकलेल्या पानांपासून द्रोण बनवून आई विकायची. माझ्या फार्ममध्ये घड काढल्यावर मी अख्खे झाड तुकडे करून गाईला खायला दिलेले आहे. त्या झाडाचे काहीही फुकट जात नाही.

जैवविविधता हा सृष्टीचा आत्मस्वर आहे. तो स्वर आणि त्याचा ताल पकडून बनविली गेलेली कृषिसंस्कृती अयशस्वी होऊ शकत नाही, रसहीनही होणार नाही. गोव्यातील, कोकणातील कुळागरसंस्कृती हे त्याचे एक रसरशीत उदाहरण आहे. सर्रास सपाटीकरण न करता टप्प्याटप्प्याने बसविलेली,अरण्याच्या प्रकृतीप्रमाणे निरनिराळ्या उंचीवर निरनिराळ्या वृक्षजातीचे माथे येतील अशी मल्टिकॅनॉपी रचना.

 Agriculture
Mahadayi Water Dispute: ...यासाठी केंद्र सरकारने ‘म्‍हादई’चा केला सौदा?

निरनिराळ्या वृक्षवनस्पतींच्या जातीची, उन्हाची निरनिराळी गरज विचारात घेऊन त्यानुसार लागवड. त्यात सूक्ष्म हवामानाचाही विचार केलेला असे. त्यात निरनिराळ्या पिकाऊ झाडांची लागवड त्यात सुपारी हे एकच व्यापारी पीक. बाकी बहुतेक सर्व स्वतःच्या घरच्या गरजा थेट भागविणारी पिके.

अशा या संमिश्र लागवडीतून नारळ, आंबा, फणस, निरफणस, केळी, पपई, तोरिंग, जाम, पेरू, अननस ही फळे, सुरण, करांदा, काटेकणगे यासारखे कंद, तोंडली, दोडकी, कारली भोपळा, कोहळा यासारख्या मंडपावरील, घर-गोठ्याच्या छपरावरील वेलभाज्या, हळद, कडिपत्ता, वट्टेलांव, मिरी, पानवेल, दालचिनी जायफळ, तिरफळ हे मसाले, कोकम, ओंढ, करमल, बिंबल, चिंच हे स्वयंपाकात लागणारे आंबट घटक, असे धान्याशिवाय लागणारे नेहमीचे सर्व अन्नघटक अशी एक होती.

या कुळागरांची योजना, वसवणूक व देखभाल कोकण, गोव्यातील भट संप्रदायाची. मागच्या लेखात उल्लेखलेली उत्सवातील सृजनकारी उदाहरणे म्हणजे त्या कुळागर कृषिसंस्कृतीतील जीवनपद्धतीची अदाकारी आहे. या कृषिव्यवस्थेची जपणूक आणि त्यातूनच जीवनातील आनंदी प्रसंगांचे रंगढंग सजविण्याची अंगभूत कला, या संस्कृतीत अंतर्भूत आहे. तशीच जीवनातील कठीण प्रसंगांतून तग धरण्याची शक्तीही.

गोवा स्वतंत्र होण्यापूर्वीची काही वर्षे भारत सरकारने गोव्याची नाकेबंदी केली होती. गोव्यात सुपारीच्या व्यापाराला जबरदस्त धक्का बसला. सुपारीचा दर 15-18 रुपयांवरून4-5 रुपयांवर आले. कुळागरकरांनी, त्या कठीण काळात इतर पिकांवर कसाबसा तग धरला. (गोवा स्वतंत्र होताच तोच दर पन्नासच्या पलीकडे गेला.!)

विदर्भ-मराठवाड्यात एकेरी जातीचे व्यापारी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांत आत्महत्या घडतात. त्यांच्याहून लहान भूधारक बहुविध प्रकारच्या भाज्या, फळे यांची शेती करणाऱ्या माळी समाजात घडत नाहीत. कारण एका प्रकारचे पीक गेले तर दुसऱ्या प्रकारचे पीक त्यांना तगवते. जैवविविधतेची शेती ही एक शाश्वत कृषिसंस्कृती आहे. हा शेतकरी एका भाविकतेने या शेतीशी जोडलेला असतो. ‘पैसा म्हणजे सर्वकाही’, अशी प्रवृत्ती नसते.

केवळ नारळ, केळेच नव्हे तर प्रत्येक वृक्ष हा कल्पवृक्ष असतो. त्यावर प्रेम, भक्ती व त्यातील उपयुक्ततेचा शोध घेण्याची शोधक वृत्ती, तिचा वापर कसा करावा याची कल्पकताआणि प्रयोगशीलतेची तपश्चर्या यांची गरज आहे. आजच्या बाजार संस्कृतीने आणलेल्या आयतेपणाने नेमक्या याच गोष्टी दाबून टाकल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com