Banaras: एकदा तरी बनारसी चव अनुभवाच!

Banaras: माझं राहण्याचं ठिकाण गंगेच्या काठावर असल्यामुळे साहजिकच मला खूप साऱ्या आडव्या तिडव्या गल्ल्यांमधून मजल दरमजल करत जायचंय याची कल्पना होती.
Banaras
BanarasDainik Gomantak

Banaras: बनारसमध्ये उतरले तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. माझं राहण्याचं ठिकाण गंगेच्या काठावर असल्यामुळे साहजिकच मला खूप साऱ्या आडव्या तिडव्या गल्ल्यांमधून मजल दरमजल करत जायचंय याची कल्पना होती. घरून दुपारी 12 वाजता निघताना खाल्लं होतं. पण आता संध्याकाळच्या सात वाजता पोटात भुकेची जाणीव होऊ लागली.

Banaras
Land Issue: भू-भुक्षित

मैदागिनला (बनारसमधील मुख्य रस्ता) उतरून सिंदिया घाटाकडे मी चालू लागले. प्रत्येक वळणावर लस्सीची, मलाईचे विविध प्रकार विकणारी, मिठाई विकणारी, चाट आणि कचोडी विकणारी, बनारसी पान विकणारी छोटी छोटी दुकानं नजरेस पडत होती. त्यांना दुकान म्हणण्यापेक्षा ‘ठेला’ म्हणणं अधिक योग्य ठरेल. कसं काय एवढ्याशा छोट्या जागेत काम करतात याचंच आश्चर्य वाटत होतं. हावरटपणा न करता पाहिलं मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचूया आणि मग काहीतरी खाण्याचं बघूया असं म्हणत मी रस्ता पकडून चालत राहिले. इथल्या कोणत्याही गल्लीत जा. एखादं मिठाईचं, एखादं चाटचं, एखादं लस्सीचं, गरम गरम जिलेबीचं आणि कुल्हडमध्ये मिळणाऱ्या चहाचा ‘ठेला’ असणारच.

आपल्यासारखी चकाचक रेस्टोरंट इथं दिसणार नाहीत. रस्त्यावर उभं राहून झटपट नाश्ता करायचा आणि आपल्या रस्त्याला लागायचं. मोठ मोठे लोक असंच खातात. जिथं सर्वांत जास्त गर्दी तिथं काहीतरी स्पेशल पदार्थ मिळत असणार हे समजून घ्यायचं. पाच दिवस बनारसमध्ये राहून, रोज वेगवगेळ्या गल्ल्यांमध्ये भटकंती करून वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांवर ताव मारला आहे. तिथं आपल्याला ओळखणारं कोणीही नाही ही एक जमेची बाजू असते. आजूबाजूला कोणाकडे न बघता समोरच्या पदार्थांवर मी यथेच्छ ताव मारला. आजूबाजूचे सगळे तेच करत होते.

कचौडी चना - बनारसी चाट

विश्वनाथ ‘कॉरिडोअर’ रस्त्यावर ‘कचौडी चना -बनारसी चाट’ नावाचं दुकान जे माझ्या रोजच्या जायच्या यायच्या रस्त्यावर होतं. नावावरून इथं काय मिळत असणार हे समजतं. कचौडी फोडून त्यावर काळ्या चण्याचा रस्सा, शेव, कांदा, चाट मसाला, आंबट -तिखट -गोड चटणी त्यावर घालून खायला दिलं जातं. कचौडीचा खुसखुशीतपणा आणि त्यासोबत असंख्य चटपटीत चवी हे सगळं एका डिशमध्ये अनुभवायला मिळतं. आपल्याकडे मिळणाऱ्या कचौडीमध्ये फक्त सॉस नाहीतर एखादी आंबट गोड चटणी घालून मिळते. पण बनारस हे अतिशय मनमौजी पद्धतीनं जगणाऱ्या लोकांचं गाव आहे. ते प्रत्येक पदार्थ असा काही वेगळ्या प्रकारे खातात की बघणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तर रोज या दुकानासमोरून जाताना कचौडी आणि चनानं भरलेल्या डिशकडे डोळेभरून बघितल्याशिवाय पुढे जात नव्हते.

प्रसिद्ध ठठेरी बाजारची गल्ली

मी राहत होते तिथूनच दोन गल्ल्या सोडून ठठेरी बाजारची गल्ली होती. बनारसमधली प्रसिद्ध गल्ली. या गल्लीत अतिशय जुनी अशी मिठाई - नाश्त्याची दुकानं आहेत. शिवाय बनारसी बटाटा पापड - लोणचे, मसाले देखील इथं मिळतात. याच रस्त्यावर बनारसमधील सर्वांत प्रसिद्ध असं ‘द राम भांडार’ हे नाश्त्याचं आणि ‘रसवंती’ हे मिठाईचं दुकान आहे. ‘द राम भांडार’ची कचौडी - सब्जी अतिशय प्रसिद्ध. सकाळी ११ वाजताच ती संपते. आपल्या समोर गरम गरम कचौडी तळून देतात. इथली कचौडी खास आहेच; पण त्यासोबत मिळणारी भाजी देखील तेवढीच चविष्ट असते. दोन्हीपैकी कोणताही एकच पदार्थ खायला घेतला तर तो तेवढा चांगला लागणार नाही. सकाळी ७.३० वाजता हे दुकान उघडतं आणि इतक्या सकाळी देखील लोक इथं नाश्त्यासाठी गर्दी करतात. १८१८साली रघुनाथ प्रसाद गुप्ता यांनी सुरू केलेलं हे इथलं सर्वांत जुनं दुकान. यांची खरी ओळख बदाम चुरा नावाच्या मिठाईने झाली. पण काळाप्रमाणे आपल्या मेनूमध्ये त्यांनी बदल केला आणि त्यात जिलेबी आणि कचौडी-सब्जी याची भर पडली. लोकांना हा बदल आवडला.

ठठेरी बाजार रस्त्यावर राम भंडारपासून थोडं आतल्या गल्लीत गेलं की ‘रसवंती’ नावाचं प्रसिद्ध मिठाईचं दुकान आहे. हे देखील सर्वांत जुनं मिठाईचं दुकान आहे. मी मुक्कामाला होते त्या गेस्ट हाऊसच्या मालकानं मला इथं मुद्दाम जायला सांगितलं. अगदी दुरूनच मिठाईचा आणि खवा भाजण्याचा गोड सुगंध आला. इथल्या अनेक मिठाईचे प्रकार प्रसिद्ध आहेत. खीरमोहन (रसगुल्ला सारखाच पण चवीला त्यापेक्षा वेगळा), मलाई गिलोरी (पानाच्या चवीची मिठाई जी मलाईच्या आवरणात त्रिकोणी आकारात मिळते), परवल नावाची मिठाईचं तर नवल करावं तेवढं कमीच. परवल जी एक प्रकारची भाजी आहे ती उकडून, साखरेच्या पाकात मुरवून त्यात खव्यापासून बनवलेली मिठाई भरली जाते. परवल आणि त्याच्या आत भरलेला खवा यामुळे अतिशय वेगळ्या प्रकारच्या मिठाईची निर्मिती इथं करतात. इथली तिरंगी बर्फी देखील प्रसिद्ध आहे. ‘द राम भांडार’ आणि ‘रसवंती’ ही दुकानं म्हणजे ठठेरी बाजारचे ‘हिरे -मोती’ म्हणावं लागेल.

Banaras
karma: कर्माच्या बंधनातून सुटावे तरी कसे?

कशी चाट भांडार

या दुकानाबद्दल अनेकांनी लिहिलं आहे. ‘फूड ब्लॉगर्स’-‘युटूबर्स’ हे इकडे पडीक असतात. आधी मला वाटलं की या लोकांमुळे ‘कशी चाट भांडार’बद्दल जरा जास्तच बोललं जात असावं. प्रत्यक्ष तिथे गेल्यावर त्यांची लोकप्रियता लक्षात आली. ‘टमाटर चाट’, ‘चुरा मटर’, ‘पालक पत्ता चाट’ अतिशय प्रसिद्ध आहे. टमाटर चाटची चव अफलातून होती. आंबट-गोड-तिखट चवीमुळे टमाटर चाट फारच चविष्ट लागली. यात ‘चुरा मटर’ चाटची आपण कल्पना देखील करू शकणार नाही. शुद्ध देशी तुपात केलेले पोहे आणि त्यात घातलेले मटर तव्यावर खरपूस भाजून त्यात शेव, चाट मसाला घालून देतात. देशी तुपाची चव आणि छान कुरकुरीत झालेले पोहे, त्यासोबत मटारची चव यासगळ्या चवीचं फार वेगळं मिश्रण तयार होतं. ‘चुरा मटर’ नावावरून हा चाटचा प्रकार काय असेल हे काही लक्षात येत नाही.

पण खाऊन बघितल्यावर आवर्जून आणखी एक डिश चुरा चाट खाल्लं जातं. याशिवाय लस्सी मिळणारी अतिशय खात्रीलायक ठिकाणं इथं आहेत. यात मणिकर्णिका घाटाकडे जाताना ‘ब्लू लस्सी’ नावाचं अतिशय वेगळं असं लस्सीचं दुकान तमाम विदेशी पर्यटकांचा अड्डा बनलं आहे. बनारसमधल्या या खाद्यसफारीबद्दल अजून भरपूर लिहिण्यासारखं आहे. बनारस हे आद्य आध्यात्मिक केंद्र जसं आहे तसं ते खवय्या मंडळींसाठी मोठं भांडारदेखील आहे. ज्याच्या नावातच रस आहे अशा बनारसमध्ये कधी कोणी उपाशी राहत नाही म्हणे. इथं एकूण २३,००० मंदिरं आहेत. या प्रत्येक मंदिरात देवाला सकाळ-संध्याकाळ-रात्री नैवेद्य दाखवला जातो आणि लोकांना प्रसाद वाटला जातो. त्यामुळे या गावात कोणीही उपाशी राहत नाही. शिवाय बनारस हे खवय्या मंडळींचं गाव आहे हे आपल्याला तिथल्या गल्ल्यांमध्ये फिरताना जाणवतं. देशाच्या कानाकोपऱ्यातून देवदर्शनासाठी अनेकजण येतात; पण आता ‘फूड ब्लॉगर्स’साठी बनारस हे सर्वांत मोठं आकर्षण ठरतंय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com