Blog: स्वराज्य सौदामिनी राणी ताराबाई

राणी ताराबाई हुशार राजकारणी होत्या. त्यांचे खरे कर्तृत्व १७००-०७ या निर्नायकी काळात दृष्टीस पडते.
Swarajya Saudamini Rani Tarabai
Swarajya Saudamini Rani Tarabai Dainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

मुघल सैन्याने २५ मार्च १६८९ रोजी रायगड किल्ल्याला वेढा घातला आणि छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी राणी येसूबाई आणि त्यांचा मुलगा शाहू यांना ओलीस ठेवत तो ताब्यात घेतला. मोगलांचा रायगडास वेढा पडला असता, जिंजीला जाण्यासाठी ५ एप्रिल १६८९ रोजी राणी ताराबाई यांनी छत्रपती राजारामाबरोबर रायगड किल्ला सोडला. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर राणी ताराबाई व त्यांच्या इतर सवती, रामचंद्र नीलकंठांच्या योजनेप्रमाणे मोगलांचा पाठलाग चुकवीत विशाळगड व इतर गडांवर काही वर्षे राहिल्या.

राणी ताराबाईही कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, छत्रपती शिवाजी महाराजांची सून, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी व हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. १६८३-८४ च्या सुमारास त्यांचे राजाराम महाराजांशी लग्न झाले.

रामचंद्रपंतांकडून राणी ताराबाईंना मुलकी व लष्करी व्यवहाराची माहिती झाली. ताराबाई, राजसबाई आणि अंबिकाबाई १६९४मध्ये जिंजीला पोहोचल्या. ९ जून १६९६रोजी ताराबाईंना मुलगा झाला. त्याचे नाव शिवाजी(दुसरा) ठेवण्यात आले.

Swarajya Saudamini Rani Tarabai
Blog: जुन्या गोव्याच्या निर्मितीत मुस्लीम व ज्यूंचे योगदान

१६९८मध्ये मुघलांनी जिंजीचा किल्ला ताब्यात घेण्यात जरी यश मिळवले तरी छत्रपती राजाराम महाराज पुन्हा एकदा निसटले आणि त्यांनी सातारा येथे दरबार उभारला. छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून निसटल्यानंतर राणी ताराबाई आणि त्यांचे नातेवाईक जुल्फिकारखानाच्या तावडीत सापडले.

त्यांना जुल्फिकारखानाने मोगली सैन्यातील शिर्के व मोहिते या सरदारांच्या स्वाधीन केले. त्यांनी राणी ताराबाई व त्यांच्या नातेवाइकांना महाराष्ट्रात सुखरूप पोहोचविले. २ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम महाराजांचा सिंहगडावर फुफ्फुसाच्या अल्प आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर राणी ताराबाईंच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली.

राजाराम महाराजांचा मुलगा शिवाजी(द्वितीय), गादीवर बसला तेव्हा तो अवघा ४ वर्षांचा होता. मराठ्यांचे राज्य डळमळीत झाले होते आणि ते पूर्णपणे चिरडून टाकण्याची योग्य संधी औरंगजेबाला दिसली. पण, तोपर्यंत राणी ताराबाईंसारखी एक सौदामिनी त्याच्यासमोर उभी राहिली आणि त्यांनी त्याचे मनसुबे उधळून लावले

राजा शाहू मोगलांच्या कैदेत असल्याचा फायदा घेऊन राणी ताराबाई आपल्या मुलाचा हक्क छत्रपतींच्या गादीवर सांगू लागल्या. रामचंद्रपंतांनी राजा शाहू यांची बाजू उचलून धरली, तेव्हा त्यांनी परशुराम त्रिंबक व शंकराजी नारायण यांना आपल्या बाजूस वळवून घेतले आणि शिवाजी(दुसरा) यांची मुंज करून विशाळगड येथे राज्याभिषेक करविला. राणी ताराबाई आपल्या मुलाच्या नावाने राज्यकारभार पाहू लागल्या.

सैन्याधिकारी नेमून त्यांनी औरंगजेबाशी उघड युद्ध सुरू केले. १७०५मध्ये मराठ्यांनी पन्हाळा मोगलांकडून जिंकून घेतल्यानंतर राणी ताराबाईंनी पन्हाळा ही राजधानी केली. गडागडांवर जाऊन त्या जातीने पाहणी करीत. सरदारांना सल्ला देत असत. १७००-०७पर्यंत मोगलांनी घेतलेले बहुतेक गड राणी ताराबाईंच्या सैन्याने परत मिळविले.

मुघल बादशाह औरंगजेबाच्या मृत्यूनंतर राजा शाहू मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले. राजा शाहू सुटल्यापासून राणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्यात वारसाहक्कासाठी कलह सुरू झाला. राणी ताराबाई व छत्रपती शाहू यांत १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड-कडूस येथे लढाई झाली.

राणी ताराबाईंच्या ताब्यात असलेले गड छत्रपती शाहूंनी घेतले. बाळाजी विश्वनाथाने राणी ताराबाईंच्या पक्षातील चंद्रसेनजी जाधव, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, खटावकरजी इत्यादी मातब्बर सरदार मंडळींना आपल्या बाजूला वळवून घेतले. १७१४मध्ये राणी राजसबाई यांनी आपला मुलगा संभाजी यास पन्हाळ्यास छत्रपतीच्या गादीवर बसवून राणी ताराबाई व त्यांचा मुलगा शिवाजी (दुसरा) यांना अटकेत टाकले.

शिवाजी (दुसरा) १७२७ मध्ये बंदिवासातच गेले. पेशव्यांच्या मध्यस्थीने राणी ताराबाई व छत्रपती शाहू यांची भेट झाली. तेव्हा छत्रपती शाहूंनी त्यांना मानाने वागविले. त्या पुढे साताऱ्यास राहावयास गेल्या. १७४९पर्यंत त्यांचे आणि छत्रपती शाहू यांचे संबंध चांगले राहिले.

आपला नातू रामराजा यास दत्तक घ्यावे, म्हणून त्यांनी छत्रपती शाहूंचे मन वळविले. छत्रपती शाहूंच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीरावाने रामराजाला सातारच्या गादीवर बसविले. छत्रपती रामराजा पेशव्यांच्या सल्ल्याने वागतो हे पाहताच त्यांनी तो खरा वारसदार नाही, असे जाहीर करून एक नवीनच प्रश्न उपस्थित केला.

१७५०मध्ये साताऱ्यात असता त्यांनी छत्रपती रामराजास कैदेत टाकले. दमाजी गायकवाड आणि नासिरजंग निजाम यांच्या साह्याने त्यांनी साताऱ्याचा कारभार आपल्या हाती घेऊन पेशव्यांशी सामना सुरू केला. पेशव्यांनी राणी ताराबाईशी गोडीगुलाबीने वागून छत्रपती रामराजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

अखेर राणी ताराबाईंवर सैन्य नेताच त्या पेशव्यांना शरण गेल्या. राणी ताराबाई हुशार राजकारणी होत्या. स्वतःचे हेर ठेवून त्या आपल्याविरुद्ध पक्षातील माहिती काढीत असत. त्यांचे खरे कर्तृत्व १७००-०७ या निर्नायकी काळात दृष्टीस पडते. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपायी त्यांनी निजामासारख्या मराठ्यांच्या शत्रूसही जवळ करण्यास कमी केले नाही.

छत्रपती राजाराम यांच्या वारसाहक्कासाठी भांडून त्यांनी कोल्हापूरची वेगळी गादी निर्माण केली. छत्रपती शाहू स्वराज्यात येण्यापूर्वी त्यांनी कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व केले आणि मोगलांशी टक्कर दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com