Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे संविधान

गेल्या ७५ वर्षात राज्यघटनेत अनेक दुरुस्त्या झाल्या. देशाने अनेक आव्हाने वादळे मोठ्या धाडसाने झेलली म्हणूनच तर जगातील सशक्त लोकशाहीचा देश म्हणून आपल्या देशाचा गौरवाने उल्लेख केला जातो.
Babasaheb Ambedkar contribution
Babasaheb Ambedkar contribution Dainik Gomantak
Published on
Updated on

शंभू भाऊ बांदेकर

भीमराव रामजी आंबेडकर अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू सामर्थ्यवान व्यक्तिमत्त्व होते. दीन- दलित शोषित - पीडितांचे उध्दारक, स्रीवर्गाचे आणि मजूरसमाजाचे कैवारी, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ आणि लेखक स्वातंत्र्यसैनिक, देशाला योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक अशा विविध अंगांनी त्यांनी आपले योगदान दिले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा जगात फार सन्मान झाला. जागतिक कीर्तीचे संविधान देशाला देणाऱ्या या महामानवाला त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करताना भारताचे संविधान यावर आज देशात जी उलटसुलट चर्चा चालली आहे त्याला समोर ठेवून काही विचार मांडावेसे वाटतात.

Babasaheb Ambedkar contribution
Margao Municipal Council: मडगावमध्ये परवान्याशिवाय बिनधास्त चालतात आस्थापने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘आपण सर्वांसाठी शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा’ असा संदेश आपल्याला दिला. जनतेचे लढे आणि समाजप्रबोधनासाठी वाणी व लेखणीच्या माध्यमातून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्कारणी लावले.फ्रेंच राज्यक्रांतीची आधारभूत तत्त्वपदी स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव यांची त्यांनी आयुष्यभर पाठराखण केली.

भारताच्या संविधानात त्यांचा फार मोठा वाटा असला तरी त्यांनी विनम्रपणाचा आदर्श नमुना दाखवत इतरांचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. भारतीय संविधानाचे एक प्रमुख शिल्पकार म्हणून संविधानाच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकताना बाबासाहेब म्हणतात, ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली.

हे कार्य पूर्ण होण्यास एकूण २ वर्षे ११ महिने व १७ दिवस लागले. या काळात घटनासमितीची एकूण ११ अधिवेशने झाली. पैकी ६ अधिवेशने ही ठराव आणि मूलभूत हक्क केंद्राची. घटना केंद्राचे अधिकार प्रातिक घटना अल्पसंख्य जमाती अनुसूचित जाती या संबंधीचे समित्यांचे अहवाल मंजूर करण्यात गेले. पुढचा तपशील अधोरेखित करताना बाबासाहेब म्हणतात, २९ ऑगस्ट १९४७ रोजी घटना समितीने मसुदा समितीची निवड केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ता. ३० ऑगस्ट रोजी मुसदा समितीची पहिली बैठक घेण्यात आली तेव्हा पासून या समितीचे काम एकूण १४१ दिवस झाले.

मूळ घटना मसुद्यात एकूण २४३ कलमे, आणि १३ परिशिष्टे होती. तद्‌नंतर समितीने त्यात फेरफार करून संग्रहित मसुदा तयार केला. त्यावेळी मसुद्यात ३१५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती. मसुद्यावरील चर्चेचा शेवट झाल्यावर कलमांची संख्या ३१५ वरुन ३८५ पर्यंत वाढविण्यात आली आणि आता शेवटच्या मसुद्यात एकूण ३९५ कलम आणि ८ परिशिष्टे आहेत. या प्रचंड खटाटोपात जवळ जवळ ७,६३५ उपसूचना सुचविण्यात आल्या त्यापैकी २४७३ उपसूचना प्रत्यक्ष सभागृहापुढे चर्चेसाठी मांडण्यात आल्या.

वरील गोष्टीचा तपशील देऊन बाबासाहेब म्हणतात. “घटना समिती फार मंदगतीने काम करीत असून सार्वजनिक पैसा उधळीत आहे, असे कानावर येत आहे.” त्यावर प्रतिक्रिया देताना बाबासाहेबांनी म्हटले आहे, ‘‘मासे पकडण्यासाठी टाकलेल्या गळाचे फासे इकडून तिकडे उगीचंच बदलतात तसे मसुदा समितीचे कुठेच केलेले नाही.

ज्या पाण्याचा पुरा अंदाज होता. त्याच पाण्यात हव्या असलेल्या माशांसाठी मसुदा समितीचे जाळे लावले होते. चांगल्या गोष्टीचा शोध घेणे ही अभिनंदनीय गोष्ट समजली पाहिजे आणि त्यासाठी मसुदा समितीस मोठा अभिमान वाटतो. आपल्या कार्याचा गौरव अखिल सभागृह एवढ्या मोकळेपणाने करते, याबद्दल मसुदा समितीस धन्यता वाटत असेल, अशी मला खात्री आहे.”

पुढे बाबासाहेबांनी जे नमूद केले आहे, ते माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. ते म्हणतात “घटना समितीच्या सदस्यांनी व मसुदा समितीच्या माझ्या सहकारी मित्रांनी व्यक्तिशः माझ्यावर जो अभिनंदनाचा एवढा वर्षाव केला आहे की त्यामुळे मी सद्‌गदित होऊन गेलो आहे. माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यास योग्य शब्दही नाहीत.

खरंतर घटना सभेत प्रवेश करते वेळी अस्पृश्‍य समाजाचे हितसंबंध सोडून दुसरा हेतू माझ्या मनात नव्हता. घटना सभेतील अत्यंत महत्वाची कामे करण्यासाठी माझी निवड करण्यात येईल अशी मला चुकूनही कल्पना नव्हती. मसुदा कमिटीत मला घेण्यात आले तेव्हा मला आश्‍चर्य वाटले होते. आणि जेव्हा मसुदा कमिटीचा चेअरमन म्हणून माझी निवड करण्यात आली, तेव्हा तर आश्चर्याचा कळसच झाला.

माझ्यापेक्षा मोठे, अधिक लायक असे लोक मसुदा कमिटीत होते. सर कृष्णस्वामी अय्यर यांना उल्लेख या संबंधाने मला करावासा वाटतो. तरीही घटना समितीने माझ्यावर विश्‍वास ठेवून त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला निवडले आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. घटना तयार करण्यासंबंधाने माझा जो गौरव केला जातो त्याचा मी एकटाच मानकरी नाही. भारत सरकारचे घटनात्मक सल्लागार सर बी. एन. राव यांनाही घटनेचे श्रेय दिले पाहिजे. भारत सरकारचे सल्लागार या नात्याने त्यांनी घटनेच स्थळ आराखडा मसुदा कमिटीपुढे ठेवला होता.

त्याचप्रमाणे घटनेच्या श्रेयाचा काही हिस्सा मसुदा कमिटीच्या सभासदांनाही दिला पाहिजे.” निरनिराळे मसुदे तयार करण्याकरिता त्यांनी दाखविलेले कसब व भिन्न भिन्न दृष्टिकोन समजावून घेण्याचा त्यांची सहनशीलता कौतुकस्पद होती. तथापी त्यांच्या कार्याचे अधिक श्रेय सरकारने प्रमुख सल्लागार श्री. एस.एन. मुखर्जी यांना दिले पाहिजे. अत्यंत गुंतगुतीच्या सूचना अत्यंत सोप्या पण कायदेशीर भाषेत असून घेण्यात त्यांचा हात कोणी धरील असे मला वाटत नाही.

त्यांच्या सहाय्याशिवाय घटना तयार करण्याच्या कामास आणखी अनेक वर्षे लागली असती. श्री. मुखर्जी यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचाही उल्लेख मला टाळता येणार नाही. कारण कधी कधी मध्यरात्री पर्यंत त्यांना काम करावे लागत होते. हे मला माहीत आहे.” हे थोडे विस्ताराने अशासाठी सांगितले की, २३ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या देशाने संविधान स्वीकारले.

गेल्या ७५ वर्षात राज्यघटनेत अनेक दुरुस्ती झाली, देशाने अनेक आव्हाने वादळे मोठ्या धाडसाने झेलली म्हणूनच तर जगातील सशक्त लोकशाहीचा देश म्हणून आपल्या देशाचा गौरवाने उल्लेख केला जातो. संविधानातील स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव ही त्रिसूत्री अखंडपणे टिकली म्हणून प्रत्येक देशवासीयाने आपापल्या परीने पालन केल्यामुळे संविधानाचे महत्व अबाधित राहिले व तेच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल, यात शंका नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com