लुईझिन यांचे उपाध्यक्षपद!

तृणमूलने गोव्यात आल्या-आल्याच फालेरोंना पावन करून घेतले आणि निष्ठापालटाचे इनाम म्हणून ताबडतोब पक्षाचे उपाध्यक्षपदही दिले.
Goa TMC : Luizinho Faleiro
Goa TMC : Luizinho FaleiroDainik Gomantak
Published on
Updated on

देशाच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालमधील राजकीय लाथाळ्यांची दखल गोव्याने कधी आस्थेने घेतल्याचे ऐकिवात नाही. तिथले राजकीय हेवेदावे क्षणात रक्तपाताच्या पातळीवर येतात. मार्क्सवादी कम्युनिस्टांची सत्ता असताना विरोधातल्या कॉंग्रेसजनांची आणि नंतर तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची टाळकी फुटायची. आता ममता बॅनर्जींच्या तृणमूलचे कार्यकर्ते त्याचे उट्टे काढताना कम्युनिस्टांबरोबर राज्यात जम बसवू पाहाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनाही लक्ष्य करत आहेत. गोव्यातले राजकीय वैर तितके आक्रमक नसल्याने सुदूर पूर्वेकडील राजकारणाची आपल्याकडील आम आदमीला गंधवार्ताही नसते. पण दोन दिवसांआधी ममता बॅनर्जींनी पक्षाच्या सर्वोच्च कार्यकारिणीला डच्चू दिल्याचे वृत्त मात्र गोव्यात चवीने चघळले गेले. याचे कारण, एका रात्रीत तृणमूल प्रवेश करून आमदाराचे खासदार बनलेले माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांच्यावर या सफाई मोहिमेत कोसळलेली कुऱ्हाड. तृणमूलने गोव्यात आल्या-आल्याच फालेरोंना पावन करून घेतले आणि निष्ठापालटाचे इनाम म्हणून ताबडतोब पक्षाचे उपाध्यक्षपदही दिले. (Discussion on luizinho Faleiro Trinamool vice presidency)

Goa TMC : Luizinho Faleiro
जाणून घ्या जगाला चिकनपॉक्सची पहिली लस देणाऱ्या डॉक्टरांबद्दल

गोव्याची (Goa) व्याप्ती बंगालमधल्या एखाद्या जिल्ह्याहूनही लहान असताना ममता बॅनर्जींनी दाखवलेल्या या औदार्याचे तेव्हाही आश्चर्य वाटले होते. तृणमूलचे गोव्याच्या (Goa TMC) बाबतीत खरेच फार मोठे मनसुबे असावेत, असेच या नियुक्तीमुळे वाटू लागले होते. ममता बॅनर्जींना बिगर भाजप राजकीय अवकाशाचे नेतृत्व करायची जबर इच्छा आहे. त्यांना दिल्ली खुणावू लागली आहे. त्यांनी लुईझिन यांना थेट राज्यसभेतही पाठवले. तृणमूलला ईशान्येकडील राज्यांत पाय पसरायचे असून तेथील ख्रिस्ती समुदायात लुईझिन यांनी काम केलेले असल्याने त्याचा लाभ पक्षाला होईल, अशी पुडी लुईझिनच्या निकटवर्ती गोटातून तेव्हा सोडून दिली होती. ममतांच्या आताच्या पवित्र्याने केवळ लुईझिनच नव्हे, तर गोवा त्यांच्या विचारविश्वात पूर्वीइतकाच महत्त्वपूर्ण राहिला आहे का, असा प्रश्न उठणे स्वाभाविक आहे. गोव्यातील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाही ममता बॅनर्जींनी येथे येणे टाळले होते, ही बाब येथे लक्षात घ्यावी लागेल.

एक खरे की, एकट्या फालेरो यांच्यासाठी ममता बॅनर्जींनी कार्यकारिणी बरखास्त केलेली नाही. सुक्याबरोबर ओलेही जळते, तसेही फालेरो यांच्या उपाध्यक्ष पदाबाबत झाले असावे. बंगालमध्ये सध्या ममता आणि त्यांचे भाचे तथा तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे आणि भाचा एवढ्यातच वरचढ ठरू नये म्हणून ममतांनी त्याचे आणि त्याच्या कंपूतील काहींचे पंख छाटण्यासाठीच कार्यकारिणी बरखास्तीचे पाऊल उचलले आहे. अर्थात हा घरगुती मामला आहे आणि एकचालकानुवर्ती तृणमूलमध्ये अशा प्रकारच्या छोट्या-मोठ्या धुसफुशी चालतच असतात. अभिषेक यांची ‘आयपॅक’च्या प्रशांत किशोर यांच्याशी वाढलेली घसट हीदेखील ममतांच्या नाराजीचे कारण असल्याचे सांगितले जाते. गोव्यात तृणमूलच्या वतीने ‘आयपॅक’च सूत्रे हाताळत होती आणि लुईझिन फालेरोंसह (Congress Leader Luizinho Faleiro) काहीजणांना पक्षात आणण्याचे कामही ‘आयपॅक’नेच केले होते. कोलकाता महानगरपालिकेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अभिषेक-आयपॅक युतीने आपल्याला अंधारात ठेवून उमेदवारी दिल्याच्या शंकेने ममता व्यथित असल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात.

Goa TMC : Luizinho Faleiro
मडगाव कार्निव्हल दरम्यान 25 वॉर्डांमध्ये 'खेळ' करणार आयोजित

गोव्यात लुईझिनच्या खासदारकीमागे अभिषेक-आयपॅक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर त्याजागी ममतांनी जी व्यवस्था उभी केलीय, तिच्यात त्यांचे विश्वासू असे सर्व नेते आहेत, जे मूळ कार्यकारिणीतही होते. पण या व्यवस्थेत जसे अभिषेकच्या समर्थकांना खड्यासारखे वगळले आहे, तसेच फालेरोंनाही. किमान त्यांच्या ज्येष्ठत्वाची कदर राखता आली असती; पण ममतांनी तेवढीही तसदी घेतलेली नाही. निवडणुकीत फालेरो यांच्याकडून अपेक्षित कार्य झाले नसल्याची नाराजी अशा प्रकारे दरबारी राजनीतीत कुशल असलेल्या ममतांनी प्रकट केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ममतांचे गोव्याविषयीचे स्वारस्य ओसरल्याची तर ही चिन्हे नाहीत ना? गोव्यातील भविष्यकालीन पक्षविस्ताराचे काय, असा प्रश्न आता उभा राहील. तसेही या पक्षाला मुळात कार्यकर्ते नव्हतेच. आयात उमेदवारांचे कार्यकर्तेच पक्षासाठी वावरत होते आणि ते आपल्या नेत्यांबरोबर स्थलांतरही करतील. तृणमूलचा याआधीचा गोवा प्रवेश फुसका बार ठरला होता. तुर्तास त्या पक्षाचे काही उमेदवार विजयाच्या स्पर्धेत निश्चितपणे आहेत. मात्र, यापैकी कुणाचीच राजकीय पूर्वपीठिका निष्ठेच्या वळणाने जाणारी नाही. कोलकात्यात पक्षांतर्गत सुरू झालेल्या संघर्षामुळे सुदूर गोव्यातल्या नाठाळांवर नियंत्रण ठेवणे पक्षालाही जमणारे नाही. गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे (Goa Assembly Election) निकाल लागताच जर घोडेबाजाराला ऊत आला आणि तृणमूलचा एखाद-दुसरा आमदार निवडला गेला तर पक्षद्रोहाचा प्रत्यय पक्षाला येण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com