Blog: वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये फक्त रस्त्यांचाच समावेश होत नाही, तर रेल्वे, बंदरे व विमानतळांचा पण समावेश होतो. म्हणून त्यांच्यावर सध्या सरकारी नीती व धोरण कसे आहे व काय विकास होत आहे.
रेल्वे-
पूर्वीच्या काळी रेल्वे ही रस्त्याएवढीच किंबहुना जास्तच महत्त्वपूर्ण होती व आहे. जसजसे रस्त्यांचे जाळे सुधारायला व वाढायला लागले तसतसे तिचे महत्त्व किंचित कमी झालेले आहे. तसेच विमानाचे तिकीट दर कमी होऊन परवडू लागल्यामुळे पुष्कळ प्रवासी देशांतर्गत आता विमानाने प्रवास करणे पसंत करतात.
पण स्वस्तात स्वस्त पद्धतीने दूर पल्ल्याची प्रवासी व मालाची वाहतूक करणे याला रेल्वेशिवाय पर्याय नाही. रेल्वे वाहतूक एवढी स्वस्त असते की रोरो पद्धतीने सगळे मालाने भरलेले ट्रकसुध्दा मालगाडीत घालून नेले जातात. कारण त्याच्यावर एकूणएक बचत होऊन जाते.
भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची आहे. ती इंग्रजांनी 1836 मध्ये स्थापित केली होती. दरवर्षी तिचे विस्तारीकरण होऊन आज एकूण रुळांची लांबी आहे जवळपास 68 हजार कि.मी. व स्टेशन आहेत 7 हजारच्या आसपास. रेल्वेद्वारे दरवर्षी 140 कोटी टन मालाची वाहतूक केली जाते.
आता तर अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड मिळून 350 कि.मी. वेगाची बुलेट ट्रेनही भारतामध्ये धावू लागेल व थेट विमानसेवेशी स्पर्धा करू लागेल. हल्ली महानगरी रस्त्यांवर वाहनाची भाऊगर्दी झाल्याने अशा रस्त्यांवर वाहन चालवणे व एक सर्वसाधारण वेग ठेवून मार्गक्रमण करणे हे अतिशय दुरापास्त होऊन बसलेले आहे. याला पर्याय आहे तो म्हणजे रॅपिड मास ट्रान्स्पोट्रेशन सिस्टम, जो आज मेट्रोच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे.
आज देशाच्या अनेक महानगरांत मेट्रो उपलब्ध आहे किंवा बांधणे चालू आहे. अशा अतिशय गजबजलेल्या व खचाखच भरलेल्या महानगरांतूनसुध्दा अतिशय वेगवान, सुरक्षित व आरामदायक पद्धतीच्या प्रवासाला सध्या तरी दुसरा पर्याय नाही.
रेल्वेद्वारा सतत नवे रूळ घालणे किंवा असलेले रूळ दुपदरी करणे हे काम सतत चालूच असते. सगळ्या मुख्य रेल्वे फाटकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी असली फाटके बंद करून उड्डाणपूल बांधण्याचे काम सेतुबंधन योजनेखाली चालू झालेले आहे.
बंदरे-
बंदरे ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. 55 टक्के मालाची आयात निर्यात जहाजाद्वारे करण्यात येते. लांबच्या आंतरराष्ट्रीय पल्ल्याच्या किफायतशीर वाहतुकीला सध्या जहाज सोडून पर्याय नाही.
भारतात 13 प्रमुख बंदरे व 205 छोटी बंदरे आहेत. त्यांचे नूतनीकरण, सुधारणा व विस्तारीकरण सतत चालू असते. बंदर व्यवस्थित चालायला रस्ता व रेल्वे जोडणी व्यवस्थित असणे गरजेचे आहे. जेणेकरून माल देशाच्या आतील भागात सुरळीतपणे आणला किंवा पाठवला जाऊ शकतो.
गोव्याचे मुरगाव बंदर एक अप्रतिम नैसर्गिक बंदर म्हणून ओळखण्यात येते, पण या बंदराला तसा साजेसा रस्ता पूर्वी नव्हता. त्यामुळे मालाची वाहतूक वास्को शहरातून केली जायची. हल्लीच पुष्कळ वर्षे प्रलंबित असलेला वरुणापुरी ते सडा हा महामार्ग बांधून वाहतुकीस चालू करण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरातील अवजड वाहतुकीचा त्राण एकदम कमी झालेला आहे. या प्रकल्पाचा एकदम शेवटचा टप्पा अजून पूर्ण व्हायचा बाकी आहे.
विमानतळ-
हल्लीच्या काळात आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीला विमान सोडून दुसरा पर्याय नाही, पण पूर्वी देशांतर्गत वाहतुकीला रेल्वे किंवा रस्ते असे पर्याय असल्याने व विमान दर अतिशय महागडे असल्याने एकेकाळी प्रवासी तो पसंत करीत नसत.
त्यावेळी विमान हे फक्त श्रीमंत व्यक्तींनी वापरायचे साधन होते. पण नंतर एक क्रांतीच घडून विमान वाहतूक अतिशय स्वस्त व कोणालाही सहज परवडण्यासारखी झाली. त्यामुळे हल्ली जास्तीत जास्त प्रवासी व देशी पर्यटक विमानाने प्रवास करताना दिसतात.
भारतात एकूण 24 आंतरराष्ट्रीय विमानतळ व 103 राष्ट्रीय विमानतळे आहेत. त्याशिवाय केंद्र सरकारतर्फे नवे विमानतळ बांधणे, जुने सुधारित व सुशोभित करण्याचे कार्य सतत चालू असते. त्यामानाने गोव्याच्या दाबोळी विमानतळात बऱ्यापैकी प्रवासी वाहतूक हाताळली जाते. गोवा हे एक जगप्रसिद्ध पर्यटन केंद्र असल्याने इथे विमानांची खूप वर्दळ असते.
दाबोळी विमानतळाला वर्षाकाठी 75 लाख प्रवासी क्षमता आहे. तो एरवी नाविक दलाच्या अखत्यारीत येतो व नागरी विमान वाहतूक करण्यास इथे मुभा दिलेली आहे. आता तर मोपाचा नवा सुसज्ज नागरी आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू होऊन दाबोळीवरचा ताण कमी होईल.
एक काळ होता, जेव्हा अमेरिका व युरोपमधले पाश्चात्त्य देश तंत्रज्ञानात एकदम पुढारलेले व प्रगत होते. त्यामानाने भारत गरीब व एकदम मागासलेला होता, पण आता तशी परिस्थिती नाही. भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला आहे. त्याचप्रमाणे आता तंत्रज्ञानाचे जागतिकीकरण झालेले आहे.
त्यामुळे जी नवी संशोधित केलेली वस्तू भारतात पोचायला दहा ते पंधरा वर्षे लागायची, ती आता जगात सर्वत्र एकच दिवशी पोचते, मग ती एक अद्ययावत विजेवर चालणारी गाडी असो किंवा एक भ्रमणध्वनी.
भारताच्या सगळ्या वाहतूक पायाभूत क्षेत्रात जागतिक दर्जाची जोरदार प्रगती चालू आहे व भारत प्रगत पाश्चात्त्य देशांची बरोबरी गाठायला भराभरा मोठी पावले टाकत आहे. आणखी काही वर्षांनी भारताच्या सगळ्या पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या होतील यात शंका नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.