मधू. य. ना. गावकर
आज मँगनिज व्यवसायाने गोव्याची अर्थव्यवस्था सुधारली; पण मांडवीचे पात्र बार्जच्या वाहतुकीने आणि तटावरील कारखाने, मांडवीतील कॅसिनो यांमुळे प्रदूषित झालेय.
पृथ्वीवरील जीवसृष्टीला पोषक अशा पर्यावरणाच्या रूपात आपण जे वसुंधरेचे रूप पाहतो, ही तिची खरी आभुषणे आहेत. सुर्याभोवती फिरणाऱ्या नवग्रहांमध्ये एकट्या पृथ्वीला ती ईश्वराने देणगी दिली आहे. (current condition of Goa Economy)
आज जगातील पर्यावरणीय शास्त्रज्ञ एकत्र जमून सांगत आहेत, की वेगवेगळ्या रसायनांनी प्रदूषित होणारी वसुंधरा सांभाळण्यासाठी प्रयत्न करा. पण जगातील नागरिक ऐकण्यास तयार नाहीत. सरकारे त्यांच्यावर बंधने आणू शकत नाहीत. भांडवलदार, श्रीमंतांना त्याचे सोयरसुतक नाही. विकासाच्या नावाखाली डोंगर, नदी, दऱ्या-खोऱ्यांमध्ये खनन चालले आहे. त्यात नद्यांमधील वाळू उपसा, मँगनिजसाठी डोंगर फोडणे, प्लास्टिक कचऱ्याचे ढीग, लागवडीच्या भातशेतीत मातीचे भराव, नैसर्गिक वाहणाऱ्या गोड्या पाण्याच्या ओहोळात सांडपाणी सोडणे, असे प्रकार आज सर्वत्र पाहावयास मिळतात.
त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. नद्यांमधील प्रदूषण वाढून त्याचा वाईट परिणाम मानवाच्या आरोग्यासह प्राणीमात्रांवर आणि जैवविविधतेवरही झालेला पाहावयास मिळतो. पूर्वकाळी भारतातील नद्यांना देवीचे, मातेचे स्थान देण्यात आले. गोदावरीच्या उगमावर नासिक, कृष्णेच्या संगमावर श्री शैल्य, गंगेच्या संगमावर हरिद्वार आणि प्रयाग, वाराणशी, नर्मदेच्या तटावर उज्जैन, अरबी समुद्राच्या तटावर सौराष्ट्र, नागेश्वर तसेच हिंदी महासागराच्या तटावरील रामेश्वर येथे नद्या सागराला मिळतात, त्या स्थळांना कुंभमेळ्यांचे स्थान देऊन पवित्र मानले.
त्याचप्रमाणे परळी-वैजनाथ, वैद्यनाथ देवधर झारखंड, उत्तराखंडमधील केदारनाथ, औरंगाबादचा घृष्णेश्वर, महाराष्ट्रातला (Maharashtra) भीमाशंकर, मध्य प्रदेशातील नर्मदेच्या तटावरील ओंकारेश्वर या ठिकाणी भोलेनाथाचे लिंग स्थापन करून त्यांना १२ ज्योर्तिलिंगांची उपाधी बहाल केल्याने तिथल्या नद्यांना देवत्व प्राप्त झाले आहे.
सौराष्ट्र सोमनाथ, काशी विश्वनाथ, कर्नाटकातील शृंगेरी सिध्दनाथ आणि बंगालच्या उपसागरावरील पुरी या स्थळांना धर्मस्थळांचे स्थान दिले आहे. नद्यांचा उगम अगर सागरांचे तट असो, मानवाचे क्रियाकर्म करण्यासाठी तिथल्या पाण्याला अमृतासमान मानले जाते. आपल्या देशाच्या पूर्वेकडील बंगाल राज्यातील गंगासागराला संक्रांतीचे प्रतीक मानले जाते. आज आपल्या गोव्यातील मांडवीच्या तटावरील खांडेपारचा केशवदेव, हरवळेचा रुद्रेश्वर, नार्वेचा सप्तकोटेश्वर, साखळीचे विठ्ठल मंदिर, तांबडी सुर्लाचे महादेव मंदिर, खांडोळ्याचे ब्रह्मदेव मंदिर, ठाणे-सत्तरीचे दत्तमंदिर, डिचोलीचे वाठादेवचे मंदिर यांना तीर्थक्षेत्र तर तिथल्या पाण्याला संजीवनी मानले. जुवारी नदीवरील कुशस्थळी म्हणजे कुठ्ठाळीचा मंगेश, केळशीची शांतादुर्गा, रायचा रायेश्वर, शंखवाळची शांतादुर्गा, शिरोड्याची कामाख्या, सांगेचा संगमेश्वर, साळावलीच्या धरणातील सोमेश्वर, जुवारीची उपनदी कुशावती हिच्या तटावरील केपेची शांतादुर्गा आणि श्री दत्तमंदिर, जांबावलीचा दामोदर, रिवणचा विमलेश्वर, कोळंबची श्री देवी आणि नेत्रावळीच्या भागात उगम पावणाऱ्या कुशावतीच्या मुखाकडील महामाया, साळ नदीच्या उगम परिसरातील वेर्णाची म्हाळसा या पुण्यस्थळीच्या पाण्याला देवतत्त्व मानून पर्यावरणाचा वेगळा विचार केला. त्याने मानवाचा विकास साधला, नदीकाठावर कृषी क्षेत्र वाढवले. पाण्याचा विनाश न करता त्याचा योग्य पध्दतीने वापर केला.
मात्र, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोव्यात (Goa) विकासाची विकृत कल्पना प्रत्यक्षात आणत आपण भस्मासुर निर्माण केला, हिरवा गोवा लालभडक बनवला. माणसांच्या थव्यांनी पणजी, मडगाव, वास्को, म्हापसा, फोंडा शहराची महानगरे झाली. पर्वरी, कळंगुट, थिवी, माशेल, सांकवाळ, उसगाव, कुर्टी, होंडा, अस्नोडा, दवर्ली, नावेली, तिळामळ या गावांचे बाजारीकरण झाले. काणकोण, केपे, कुडचडे, वाळपई, साखळी, डिचोली, पेडणेच्या आठवडी बाजारांनी शहरीकरणाचा पोषाख परिधान केलेला पाहावयास मिळतो.
गोव्यात मुक्तिपूर्वीची लोकसंख्या सात-आठ लाख होती. गोवा मुक्तिनंतर शिक्षणाचा प्रसार होऊन ‘हम दो हमारे दो’ हा मंत्र बहुसंख्य गोवेकरांनी जपला; पण स्थलांतरित माणसांची लोकसंख्या रोखण्यात आपण आणि सरकारे कमी पडली. त्यामुळे गोव्याचा चेहरा बदलण्यास वेळ लागला नाही. आज मँगनिज व्यवसायाने गोव्याची अर्थव्यवस्था सुधारली; पण मांडवीचे पात्र बार्जच्या वाहतुकीने आणि तटावरील कारखाने, मांडवीतील कॅसिनो यांमुळे प्रदूषित झालेय. बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचा उपसा गोव्यातील नद्यांच्या पात्रांतून अव्याहतपणे केला जात आहे. त्यामुळे नद्यांची पात्रे रुंदावून अतिखोल झाली आहेत. गोव्याची हिरवीगार भूमी आज सप्तरंगी झाली आहे. त्याला आपणच जबाबदार आहोत नाही का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.