सृष्टी थकली आहे

आदिमानव इतर प्राण्यांप्रमाणे आपली जीवनसाधने थेट निसर्गातून आहे त्या अवस्थेत घ्यायचा. त्यावर कमीत कमी प्रक्रिया करून वापरायचा. साठविण्याच्या प्रक्रियेसाठीचा वेळ लागत नव्हता.
Earth
EarthDainik Gomantak

कमलाकर साधले

कष्ट टाळतात ते नष्ट होतात’ यावर गेल्या लेखात चर्चा केली. खरे तर आपण ज्याला हल्ली ‘कष्ट’ म्हणतो तो आजच्या आपल्या शारीरिक श्रम टाळण्याच्या मनोवृत्तीतून त्याला चिकटविला गेलेला शब्द आहे.

परिश्रमांची अनिर्वायता सांगताना आपले पूर्वज सांगतात, ‘ न हि सुप्रस्य सिंहस्थ प्रतिशंति मुखे मृगः’ आपल्या निष्क्रयतेला, प्रारब्धाचे फालतू निमित्त सांगणाऱ्या ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ या विचारसरणीच्या लोकांना पूर्वजांचे थेट उत्तर आहे. ‘कितीही नशीबवान सिंह असला तरी झोपल्या जागी हरीण त्याच्या तोंडात येऊन पडला असे कधीही घडणार नाही

.’ पण प्रयत्नाने ‘पंगुंल्लंघयते गिरिम्’ पांगळा माणूससुध्दा प्रयत्नाने पर्वत पार करू शकतो. पट्टीचा धावणारा खिलाडू अपघातात सापडून दोन्ही पाय पिंढ्रीत तोडावे लागतात. कृत्रिम पाय बसवून तो धावपट्टीवर धांवू लागतो. त्यावेळी त्याचे फोटो आंतरराष्ट्रीय मुखपृष्ठावर झळकतात. जीवनातील सर्वात मोठी स्पर्धा त्याने जिंकलेली असते!

खडतर कष्टतर असा तुरुंगवास भोगून बाळ गंगाधर टिळक परततात आणि केसरीत ‘पुनश्‍च हरी ॐ ’ हे त्यांच्या अग्रलेखाचे शीर्षक झळकते तेव्हा त्याना नमवू पाहणारे अघोरी कष्टच पराभूत होऊन माना खाली घालतात. त्याची ‘लोकमान्य’ ता त्रिगुणीत उंचीवर झेपावलेली असते.

काही शतकांपूर्वी यंत्रयुग सुरू झाले तेव्हा त्याच्या पुरस्कर्त्यांचे असे प्रतिपादन होते की, यंत्रे काम करू लागतील तेव्हा माणसाचे काबाडकष्ट वाचतील, भरपूर मोकळा वेळ(leisure) मिळेल. आपले छंद, आवडीच्या गोष्टी करायला भरपूर उसंत मिळेल. पण झाले काय? यंत्रयुगात ते उलटेच घडले गेले आणि तो मोकळा वेळ सतत कमी-कमी होत गेला. आपण हल्ली-हल्ली पहातो की मोबाईलच्या युगात मोकळा वेळ अजून रोडावला आहे. एआयच्या युगात काय होते ते बघायचे!

आदिमानव इतर प्राण्यांप्रमाणे आपली जीवनसाधने थेट निसर्गातून आहे त्या अवस्थेत घ्यायचा. त्यावर कमीत कमी प्रक्रिया करून वापरायचा. साठविण्याच्या, प्रक्रियेसाठीचा वेळ लागत नव्हता.

शेती करू लागला तेव्हा पेरणे, मशागत, साठवणूक, प्रक्रिया यासाठी वेळ जाऊ लागला. आता यंत्रयुगात पूर्णपणे ग्राहक बनला. बाजारात जाऊन अन्नघटक आणायचे शिजविणे व इतर प्रक्रियांसाठी निरनिराळी उपकरणे, घर ऐषआरामी बनण्यासाठी अनेक सुविधा, त्या मिळविण्यासाठी सतत अर्थप्राप्ती, त्यासाठी काम, कामाच्या दुरच्या ठिकाणी ये जा करणे, या सुविधांची देखभाल, यात एवढा गुरफटून गेला की वेळेची ओढाताण होऊ लागली.

युवाल नोआ हरारी यांचे गाजलेले ‘सेपियन्स’ हे मानववंशाच्या इतिहासावरील पुस्तक. त्यात त्यांचे संशोधन सांगते की सर्वात जास्त मुक्त वेळ (leisure) पहिल्या म्हणजे जंगली अवस्थेतील माणसालाच मिळत होता.

हे त्यानी आजही अरण्यात जंगली अवस्थेत राहणाऱ्या टोळ्यांच्या अभ्यासातून सिध्द केले आहे. त्याचबरोबर आजच्या यंत्रसाधनानी समृध्द असलेल्या मानवसमाजाकडे वेळेची सर्वात जास्त टंचाई असल्याचा त्यांचा निष्कर्ष आहे.

Earth
Goa College of Agriculture : गोवा कृषी महाविद्यालयात गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण

या टंचाईशी मुकाबला करताना जी ओढाताण होते त्यामुळे डोक्यावरील ताणतणाव मात्र वाढलेले आहेत. माणूस कृषिप्रधान संस्कृतिकाळात जंगली अवस्थेपेक्षां जास्त काळ कष्ट करीत असला तरी तो ‘निर्माता’ या प्रधानभूमिकेत होता त्यात मिळणारा सृजनाचा आनंद आजच्या ‘ग्राहक’ या भूमिकेत मिळत नाही.

सृष्टीने मानवाला बनविले ते सृष्टिसान्निध्यांत राहण्यासाठी, त्याच्या मानसिकतेची जडणघडण सृष्टिपरिसरात रमण्याची होती. जसा तो सृष्टिपासून दूर जाऊ लागला तसा त्याला रमण्यासाठी वेगळे प्रकार वेगळा वेळ याची गरज भासू लागली. आजच्या बाजार संस्कृतीत करमणूकही विकत मिळू लागली.

त्यात विकण्यासाठी ठेवलेल्या आयटममधून निवडून त्यात स्वतःला जुळवून घ्यावे लागले. कृषिसंस्कृतीत माणूस स्वतः ते निर्माण करी. कृषियुगात गाव हे एक स्थिर विश्‍व होते. एक बांधील जग होते. आज सर्वत्र मुक्तता असली एक अनिश्‍चितता, एक अधांतरीपणा आलेला.

जंगली अवस्थेत माणूसइतर प्राण्यांप्रमाणेच रहात असल्याने सृष्टीला त्याचा कधी भार वाटला नाही. कृषियुगात माणसाने भूमी ने अरण्यावर आघात केलेच. पण ते बऱ्याच प्रमाणात तिला सोसण्याच्या मर्यादेत होते. आपला परिसर जपला नाही तर आपला जीवनाधारच नष्ट होईल ही भीती होतीच. म्हणून काही पथ्ये पाळली जात.

जेथे अतिरेक झाला तेथे माणसाला जागा सोडून जावे लागलेच. आज बाजारव्यवस्था यंत्रतंत्राच्या सहाय्याने सृष्टिला लुटून जेथे माणसाने बस्तान बसविले आहे तेथे आपल्या ग्राहकाला सोयी पुरवीत आहे. कृषियुगात सृष्टीच्या विनाशाला जी मर्यादाहोती ती मर्यादा आज राहिली नाही. यंत्रांच्या राक्षसी शक्तीमुळे लूट आणि विध्वंस याला मर्यादा राहिली नाही.

सृष्टि आता थकली आहे. कातडी सोलली आहे. जखमा चिघळलेल्या आहेत. अंगात ताप भरला आहे. पारा चढत आहे. तिला सर्वप्रथम विश्रांतीची गरज आहे. ती तिला देऊया. तिला लुटणाऱ्या बाजारव्यवस्थेला बाजूला ठेवून आपण आपल्या शक्य तेवढ्या गरजा स्वतः भागवूया. त्यातून सृष्टीच्या पुनर्बांधणीलाही मदत होईल ते कसे ते पुढच्या लेखात पाहू.

सर्वांत जास्त मुक्त वेळ (leisure) पहिल्या म्हणजे जंगली अवस्थेतील माणसालाच मिळत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com