गोव्याच्या कोलवाळ तुरुंगातील कारनामे

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृह कोणत्याही सत्कार्यासाठी प्रकाशात यावे, अशी कुणाची अपेक्षा नसेल. पण, राज्याला आपली मान शरमेने खाली घालावी लागेल, असे काही तेथे घडू नये; अशी माफक अपेक्षा बाळगणे गैर ठरणार नाही
Colvale Jail, Goa
Colvale Jail, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पण, दुर्दैवाने हे कारागृह नेहमीच चुकीच्या कारणांसाठी प्रकाशझोतात येताना दिसते. यावेळी बलात्काराचा आरोप असलेल्या काही युवकांना विवस्त्र करून त्यांना उठाबशा काढण्यास लावल्याने हे कारागृह की न्यायालय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आपल्या देशाने जी व्यवस्था स्‍वीकारलेली आहे, तिच्यात गुन्हा केल्याच्या संशय असलेल्यांविषयीच्या कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यांची चौकशी पोलिस किंवा अन्य शासकीय यंत्रणा करत असते आणि मग त्यांना न्यायालयापुढे नेऊन त्यांच्याविरोधात खटला चालवला जातो. ते दोषी आहेत की नाही, याचा निवाडा करून न्यायालय एकतर त्यांना मुक्त करते किंवा योग्य सजा फर्मावते. न्यायालयाची भूमिका स्वत:कडे घेण्याचा अधिकार कुणालाच नाही. कारागृहातील रक्षक वा अधिकाऱ्यांना तर नाहीच नाही. कोलवाळच्या कारागृहातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला याची पूर्ण जाणीव अर्थातच आहे, तरीही त्यांनी आपणच न्यायाधीश असल्याच्या थाटात संबंधित संशयितांना विवस्त्र केले. त्यांची मजल इथपर्यंत का यावी?

Colvale Jail, Goa
Goa : अनियोजित विकासामुळे ताळगावचे काँक्रिटीकरण

कोलवाळचा कारागृह म्हणजे एखादे स्वतंत्र संस्थान आहे, असा तेथील कर्मचाऱ्यांचा गैरसमज तर झालेला नाही ना? कायदा हातात घेण्याने आपणही गुन्हेगार ठरतो, याचे भान त्यांना कसे येत नाही. घडल्या प्रकाराचे कुणीतरी व्हिडिओ चित्रीकरण करून ते व्हायरलही केले आहे. हे चित्रीकरण कैद्याने केलेय की, कर्मचाऱ्याने हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण, कैद्याकडे मोबाईल असणे जितके घातक आहे, तितकीच रक्षक - कर्मचाऱ्यांमधील दुफळी आणि आपसांतील वैरही सुरक्षेच्या दृष्टीने विघातक आहे. ही वाळवी किती खोल गेलीय, याचा शोध आताच घेतला नाही तर या कारागृहाचे रूपांतर गुन्हेगारी केंद्रात व्हायला वेळ लागणार नाही. आपण हे प्रकरण गांभीर्याने घेत असल्याचे सरकारने तुरुंगरक्षकांच्या निलंबनातून दाखवून दिले आहे; तोच निर्धार शेवटपर्यंत असावा, ही अपेक्षा.

कारागृहांना आजकाल सुधारणा केंद्र असे संबोधले जाते. तिथे असलेल्या बंदिवानांनी गुन्हा केल्याचे सिद्ध झालेले असले, तरी ते काही जन्मत:च गुन्हेगार नसतात. त्यांच्यावर योग्य संस्कार झाले, तर ते पुढील जीवन सनदशीर मार्गाने जगू शकतात, असे कायदा मानतो आणि त्यांना सुधारण्याची संधी देतो. गोव्याच्या कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगात न्यायालयाने दोषी ठरवून सजा फर्मावलेले बंदिवान असतात आणि ज्यांच्याविरोधात गुन्हा केल्याच्या आरोपाखाली कायदेशीर कारवाई जारी आहे, असेही आरोपी ठेवले जातात. या सहजीवनातून अनेकदा नवे गुन्हेगार तयार होत असतात, असे समाजशास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. कारागृहात अनेक बंदिवान असेही असतात, ज्यांनी भावनेच्या भरात काही अक्षम्य कृत्य केलेले असले, तरी गुन्हेगारी त्यांच्या रक्तात नसते. आपली सजा भोगून झाल्यावर पूर्ववत समाजात मिसळत ते नेहमीचे जीवन जगण्याची शक्यताच अधिक असते.

Colvale Jail, Goa
Goa : कॅन्‍सर इस्‍पितळासाठी २७० कोटी मंजूर

पण, गुन्हेगारांच्या निरंतर सहवासात आल्यावर ते निर्ढावतात आणि पुनश्च गुन्हेगारीकडे वळतात. गुन्हेगारी विनासायास पैसा कमावण्याचे साधन ठरल्याची अनेक उदाहरणे कारागृहात असतात. समाजाला धाक - दपटशांत ठेवण्यातही एक वेगळी नशा असते आणि या नशेचा अंमल कारागृहातील सहजीवनातून चढू शकतो. गुन्हेगारीचा संसर्ग टाळण्यासाठी पाश्चात्य जगात कारागृहांची रचना बदलण्यापासून शिक्षेला सौम्य करण्यापर्यंत अनेक पर्याय चोखाळण्यात आले आहेत. तुलनेने आपला देश आणि अर्थातच गोवा या कल्पनेपासून शेकडो मैल दूरच आहे. त्यामुळे गुन्हेगार आणि संशयितांना कोंबण्याचे त्यातल्या त्यात सुरक्षित स्थळ, अशीच कारागृहांची व्याख्या प्रशासनाला अभिप्रेत असते आणि त्याच धारणेतून कारागृहांचे व्यवस्थापन हाकले जाते. कोलवाळचे कारागृहही या अलिखित नियमांना अपवाद असण्याचे कारण नाही. पण, जर त्या कारागृहाच्या व्यवस्थेची जबाबदारीच ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून गुन्हेगारीच्या पातळीवरील वर्तन होत असेल, तर मात्र त्याची त्‍वरित दखल घेऊन कारवाई होणे अगत्याचे आहे.

कोलवाळच्या या कारागृहात बंदिवान आणि सुरक्षा रक्षकांमधले ‘अंतर’ बरेच कमी असल्याची अनेक उदाहरणे आहेत. कारागृहाची सुरक्षा भेदून कैद्यांना जेव्हा सिगारेटपासून मोबाईलपर्यंत हवी ती वस्तू उपलब्ध होत असते, तेव्हा कुंपणच शेत खात असल्याचे सिद्ध होते. कैद्यांच्या कथनावर विश्वास ठेवण्याची प्रगल्भता आपल्याकडे नाही. अन्यथा, या कारागृहातून शिक्षा भोगून आलेले अनेकजण तिथल्या रक्षकांच्या कैदीस्नेहाच्या सुरस कथा सांगायला पुढे येतील. ही सलगी अचानकपणे सूचलेली नसून तिच्यामागे वर्षानुवर्षांची परंपरा आहे, हेही खरेच. गृहखात्याने कधीच या आणि अन्य कारागृहांतले व्यवहार गांभीर्याने घेतलेले नाहीत. त्यामुळे अनेक बेकायदा कृत्ये तिथे राजरोस चालू असतात. चार भिंतींच्या आडून चालणाऱ्या या कृत्यांचा गवगवा होणार नाही, याची दक्षता काही नामचीन कैद्यांचे भय दाखवून घेतली जाते. मध्यंतरीच्या काळात याच कारागृहात असलेला अन्वर शेख हा ‘गावगुंड’ कसा चैनीत जगतोय, याचे व्हिडीओ चित्रण समाजमाध्यमांवर फिरत होते. तेव्हा तरी गृहखात्याला जाग यायला हवी होती. पण, स्वेच्छेने काही करण्याची नोकरशाहीची उर्मीच संपलेली दिसते. त्यातूनच मग अधिकाऱ्यांची बेदरकार वृत्ती वाढते आणि आततायी कृत्ये घडतात. हे कुठपर्यंत चालू द्यायचे, याचा निर्णय गृहखात्याला घ्यावाच लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com