Goa Coconut : गड्या नारळ मधाचे

Goa Coconut : पूर्वी धार्मिक उत्सवात नरबळी देत. कालांतराने ते बंद झाले. शेंदूर लावलेला नारळ आता जत्रोत्सवात रथावर फोडला जातो. इथे शेंदूर हे रक्ताचे आणि नारळ हे मानवी मुंडक्याचे प्रतिक आहे.
coconut tree in goa
coconut tree in goa Dainik Gomantak

दत्ता दामोदर नायक

माझ्या गोव्याच्या भूमीत, गड्या नारळ मधाचे'' असे नारळसूक्त बाकीबाब बोरकरांनी गायले.माड हा गोव्याचा राज्यवृक्ष आहे. नारळाला गोव्याच्या खाद्यसंस्कृतीतच नव्हे तर सांस्कृतिक जीवनातही स्थान आहे. विवाहित स्त्रीची नारळाने ओटी भरली जाते. इथे नारळ हे अपत्याचे रूपक मानले आहे.

पूर्वी धार्मिक उत्सवात नरबळी देत. कालांतराने ते बंद झाले. शेंदूर लावलेला नारळ आता जत्रोत्सवात रथावर फोडला जातो. इथे शेंदूर हे रक्ताचे आणि नारळ हे मानवी मुंडक्याचे प्रतिक आहे.

कोकणी भाषेत नारळ व माड यांवर असंख्य शब्द आहेत. कवाथो, बोंडो, शिंयाळे, आडसर, मुरींग, कातली, सोय, खोबरें, खोबरेल, माडेल, कट्टी, सोण्ण, काथो, चुडीत, मल्ल, शेवकां, पिराडो, गुडगुडो, कारवो, तेलतो, रेंद, रेंदेर, सूर, वांसो, व्हीर, पाडो, पाडेली, आळें, विलें, सावळ, तल्लुक, देंठ, पिडो, चांफे असे हे शब्दवैपुल्य आहे.

नारळाच्या आकारानुसार त्याचे नामकरण बदलत जाते. मोठ्या आकाराच्या नारळांना, जे नारळ गोणपाटांत १०० मावतात, त्यांना 'आटक' म्हणतात. गोणपाटांत १२० नारळ मावत असतील तर त्या मध्यम आकाराच्या नारळाला 'किटक' असे नाव आहे. तर गोणपाटांत जर १८० सोललेले नारळ मावत असतील तर त्या छोट्या नारळाचे 'शेंपे' असे नामकरण केले गेले आहे.

गोव्यात २५००० हेक्टर जमिनीत ६० लाख माड आहेत. प्रतिवर्षी गोव्यातील नारळाचे पीक १३ कोटी नगांचे आहे म्हणजेच प्रति माडामागे केवळ २३ नग एवढे वार्षिक पीक येते. नारळाची उत्पादकता प्रतिवर्षी किमान ७५ नगांची असली पाहिजे.

गोव्यात नारळाचा व शहाळ्यांचा प्रतिनग किरकोळ भाव 30 रुपये आहे. पण नारळाचा घाऊक दर हजारामागे ८००० रुपये म्हणजे नगामागे ८ रुपये एवढा कमी आहे. याचाच अर्थ 30 रुपयांचा किरकोळ भाव आणि ८ रुपयांचा घाऊक भाव यामधली मलई नारळाचे घाऊक व किरकोळ व्यापारी फस्त करतात.

गोवा सरकारने नारळाला प्रति नगामागे १५ रुपयांचा आधारभाव जाहीर केला आहे. नारळ बागायतदाराने ८ रुपये घाऊक दराने नारळ विकल्यास आधारभूत भाव (१५ रुपये) आणि घाऊक भाव ( ८ रुपये) यामधली ७ रुपयांची तफावत अनुदानाच्या रुपाने नारळ बागायतदारांना सरकारकडून मिळते.

नारळाचे घाऊक व्यापारी नारळाचा घाऊक दर नियंत्रित करताना ''एवीतेवी तुम्हाला सरकारकडून १५ रुपयांचा आधारभाव मिळणारच आहे'' अशी सबब सांगतात. सरकारकडून येणारे अनुदान अनेक महिन्यांनी नारळ बागायतदारांच्या हाती पडते. ज्या बागायतदारांचा वार्षिक 'पाडा' अत्यल्प आहे, ते नारळ बागायतदार अनुदान मागण्याच्या भानगडीत पडत नाहीत.

गोव्यात कर्नाटक, केरळ व तामिळनाडूतून प्रचंड प्रमाणावर नारळ आयात होतो. ह्या आयातीमुळे 'पुरवठा अधिक तर किंमत कमी' ह्या व्यापारी तत्त्वाने गोव्यातील नारळ बागायतदारांना नारळाचा कमी भाव मिळतो.

मजुरांची प्रतिदिवस ७०० रुपये मजुरी, पाडेकारांचे अवाजवी दर (माडामागे ३५ रुपयांचा दर), खते व जंतुनाशके यांचा खर्च लक्षात घेतला तर नारळाचे एकूण अर्थकारण तोट्यात येते.

'दुष्काळात तेरावा महिना' ह्या म्हणीप्रमाणे नारळाच्या पिकांपैकी किमान एक चतुर्थांश पीक उंदीर, खारी, माकडे फस्त करतात. त्यामुळे नारळ बागायतदारांचे फार मोठे नुकसान होते. या नुकसानीमुळे छोट्या नारळ बागायतदारांनी माडाला आळी काढणे, माडाला सारें व सांवळ घालणे बंद केले आहे. नवे कवाथे लावण्याच्या भानगडीत तर कोणीच पडत नाही. यामुळे येत्या २० - २५ वर्षात माडाच्या लागवडीखालील जमीन कमी होत जाईल. माड हा कृषी उत्पन्नाचा स्त्रोत न राहता केवळ शोभेचे झाड म्हणून गोव्यात लावला जाईल.

नारळाच्या ह्या दुःस्थितीकडे गोवा सरकारचे बिलकूल लक्ष नाही. महाराष्ट्रात उसाचा, कापसाचा, तंबाखूचा, कांद्याचा भाव पडला तर विधानसभेत विरोधी पक्ष गहजब करतात. गोव्यात नारळाचा भाव पडला तर त्याचे कोणालाही सोयरसुतक असत नाही. गोव्यातील एका स्थानिक राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह नारळ आहे. पण हा पक्षदेखील नारळाविषयी असावा तेवढा संवेदनशील नाही.

गोव्यातील नारळाचे उत्पादन कसे वाढवावे, माडाची उत्पादकता कशी सुधारावी, नारळ बागायतदारांना कोणते सहाय्य करावे यावर गोवा सरकारची भूमिका नगण्य आहे.

गोव्यात नारळ - संशोधन केंद्र उभारायला गोवा सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. गोव्यातील नारळ बागायतदारांची सहकारी संस्था व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नारळ बागायतदारांनी सहकारी तत्त्वावर खोबरेल, व्हर्जिन ऑईल, किसलेले खोबरे, काथ्यापासून बनणारे दोर करण्याचा लघुउद्योग सुरू करायला हवा. नारळ बागायतदारांनी नारळ, शहाळी, खोबरेल यांची विक्री करणारी किरकोळ विक्री केंद्रे उघडायला हवीत. तसे झाले तर किरकोळ दर व घाऊक दर यामधली मोठी तफावत नारळ बागायतदारांना मिळू शकेल.

नारळाच्या बागायतीत आंतरपिके घेण्यावर विचार व्हायला हवा. नारळ बागायतीत ecotourism सुरू करता येईल.

जनावरांनी नारळ बागायतीचे नुकसान करू नये यासाठी जंगलात फळझाडे लावण्यावर सरकारने भर दिला पाहिजे, जेणेकरून माकडांसारखे प्राणी जंगलात खाद्य न मिळाल्यामुळे नारळ बागायतीत घुसणार नाहीत.

मॉरिशसमध्ये उसाचे म्युझियम आहे. इथे पर्यटकांना उसाचा इतिहास, उसापासून बनणाऱ्या साखर, गूळ, इथेनॉल सारख्या पदार्थाच्या उत्पादनांची प्रक्रिया पाहता येते. गोव्यात असा नारळ म्युझियम व्हावा. काजूच्या फेणीप्रमाणे माडाच्या 'माडेल' फेणीला प्रतिष्ठा मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत.

सारांश, नारळाचे एकूण अर्थकारण हे सार्वजनिक चर्चेच्या व्यासपीठावर (central stage) यायला हवे.

coconut tree in goa
Goa Christmas 2023: नाताळ आणि नववर्षासाठी गोवा सज्ज; तरूणाईचा उत्साह शिगेला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com