गोवा, मराठे‘ आणि गोंयचो सायब’

सेंट फ्रान्सिस झेवियर हे ख्रिश्चन समुदायासाठी अत्यंत आदरणीय संत आहेत, परंतु सर्व गोव्याचे लोक त्यांना “गोंयचो सायब” म्हणून संबोधतात.
Goa
Goa Dainik Gomantak

सुशीला सावंत मेंडीस

पोर्तुगीज मात्र या उपखंडातील इतर सर्व युरोपीय सत्ता बाहेर पडल्यानंतर बाहेर पडणार होते, कारण त्यांना सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा आशीर्वाद होता, जो भारतातील त्यांच्या श्रद्धेचा आणि नशिबाचा संरक्षक होता, असे मानले जात होते.

उद्या सेंट फ्रान्सिस झेवियर्सचे प्रसिद्ध फेस्त आहे. यंदा ३ डिसेंबर हा रविवार असल्याने तसेच ख्रिसमसच्या उत्सवाच्या तयारीचा काळ असल्याने फेस्त रविवारी साजरे होत नाही. आगमनकाला दरम्यान, रविवार हे रोमन कॅथलिक चर्चद्वारे केवळ प्रभू येशूच्या सेवेसाठी समर्पित दिवस आहेत.

सर्व समाज हा उत्सव साजरा करत असल्याने सार्वजनिक सुट्टी असते. सेंट फ्रान्सिस झेवियर हे ख्रिश्चन समुदायासाठी अत्यंत आदरणीय संत आहेत, परंतु सर्व गोव्याचे लोक त्यांना “गोंयचो सायब” म्हणून संबोधतात.

यावर्षी मी नोव्हेना मासच्या पहिल्या दिवशी भक्तिभावाने आणि संतांच्या अनुयायांचे समर्पण, बांधिलकी पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी उपस्थित राहिले. तुडुंब गर्दी होती. नऊ दिवसांच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी खास महाराष्ट्रासह परदेशातील गोव्याचे भाविक आले होते. माझे अत्यंत जवळचे मित्र मैत्रिणी मडगावहून रोज सकाळी ६.०० वाजता जुन्या गोव्याला जातात आणि उद्या फेस्ताच्या दिवशी संपणाऱ्या नोवेनाचे सर्व नऊ दिवस उपस्थित राहतात.

जगभरातील गोव्याच्या लोकांसाठी हा दिवस गोव्यातील त्यांच्या खास ओळखीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. जात-धर्माचा विचार न करता भारतीयांचे जे नाते महात्मा गांधींशी आहे, तेच नाते “गोंयच्या सायबाशी” आहे.

महात्मा असो वा सेंट फ्रान्सिस झेवियर, हे महत्त्वाचे नाही, कोणावर विश्वास ठेवायचा आणि अत्यंत निष्ठेने आदर करायचा हे ठरवणे ही प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा आहे. माझ्या देशाची राज्यघटना आपल्या सर्व नागरिकांना आपल्या धर्माचे आचरण, प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार देते. असंतुष्ट राजकारणी जेव्हा व्होट बँकेच्या राजकारणासाठी इतिहासाचा वापर आणि गैरवापर करतात, तेव्हा त्यांच्या हेतूंवर संशयाची सुई स्पष्टपणे फिरु लागते.

मौखिक इतिहासातील अशी अनेक उदाहरणे आहेत जी लोकांच्या मनात संतांबद्दल असलेली अगाध श्रद्धा आणि आराधना दर्शवितात. ३० ऑगस्ट १९५४ च्या अमेरिकन लाईफ मासिकात "संतांची मदत मागितली जाते" या सचित्र लेखाचा संदर्भ आहे.यावेळी हा कार्यक्रम १५ ऑगस्ट १९५४ चा सत्याग्रहींचा प्रयत्न होता.

लेखकाने त्यांचे वर्णन असे केले आहे की, बहुतेक किशोरवयीन मुले आणि काही बेरोजगार यांची भारणा असलेला "एक विनोदी छोटा बँड". या सत्याग्रहींपासून सेंट फ्रान्सिस झेवियर्सचे संरक्षण मिळावे म्हणून गोव्यातील नागरिक बॉम जीसस चर्चकडे जात असल्याचे एका चित्रात दिसत आहे! काळ बदलतो आणि इतिहासही बदलतो.

पोर्तुगीज मात्र या उपखंडातील इतर सर्व युरोपीय सत्ता बाहेर पडल्यानंतर बाहेर पडणार होते, कारण त्यांना सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा आशीर्वाद होता, जो भारतातील त्यांच्या श्रद्धेचा आणि नशिबाचा संरक्षक होता, असे मानले जात होते.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांना अनेकजण पूजनीय मानतात कारण गोव्याच्या प्रदीर्घ इतिहासात त्यांच्या हस्तक्षेपामुळेच गोव्याला अनेकवेळा वाचवले गेले, असे गोव्यातील लोकांचे मत आहे. संतांच्या आख्यायिकेशी संबंधित असलेले मराठा राजा म्हणजे छ्त्रपती संभाजी महाराज. छ्त्रपती संभाजीं महाराजांना मुघल समस्येला सामोरे जाण्यापूर्वी कोकणावर नियंत्रण ठेवून आपला तळ सुरक्षित करायचा होता आणि तो गोवा काबीज करूनच ते साध्य करू शकले असते.

दुसरीकडे पोर्तुगीज खरे तर दख्खनमधील मोगलांच्या प्रगतीला फारसे अनुकूल नव्हते, परंतु ते मराठ्यांना मोठे शत्रू मानत असल्याने त्यांनी मोगलांना त्यांच्या प्रदेशातून सर्व सोयी-सुविधा व मुक्त मार्ग दिला.पां.स. पिसुर्लेकर लिखित पोर्तुगीज-मराठे संबंध या पुस्तकात असे म्हटले आहे की, प्रत्युत्तरादाखल मराठ्यांनी गोव्यातील अनेक गावे लुटून जाळली, लहान मध्यम आकाराच्या बोटी ताब्यात घेतल्या आणि १६८२ मध्ये दोन पोर्तुगीज पाद्न्याना तुरुंगातही डांबले.

जुलै व ऑगस्ट १६८३ मध्ये चौल किल्ला काबीज करण्याचा संभाजीं महाराजांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मराठ्यांचे लक्ष विचलित करण्याच्या हेतूने पोर्तुगीज व्हाईसरॉय ऑक्टोबर १६८३ मध्ये मोठ्या फौजफाटा व तोफखान्यासह फोंड्याच्या दिशेने निघाला आणि संभाजी महाराजांच्या अधिपत्याखालील महत्त्वाचे बंदर शहर दुर्भाट येथे उतरला.

फोंड्याचा देसाई दुलाबा नाईक संभाजी महाराजांच्या विरोधात गेला आणि पोर्तुगीजांमध्ये सामील झाला. मराठ्यांनी आपल्या मर्यादित साधनसामुग्रीने व सैन्याने किल्ल्याचे रक्षण केले. किल्ल्याची भिंत तोडण्यात पोर्तुगीजांच्या तोफखान्याला यश आले, तरीही मराठ्यांनी शरणागती पत्करली नाही.

संभाजीं महाराजांना फोंड्याला वेढा घातल्याची बातमी मिळताच त्यांनी तात्काळ राजापूरहून सुरुवात केली आणि ९ नोव्हेंबर १६८३ रोजी फोंडा येथे पोहोचले आणि शत्रू आपला शेवटचा हल्ला करीत असताना ६० निवडक सैनिकांसह किल्ल्यात वीरप्रवेश केला. व्हाईसरॉय कोंडे अल्वोर आता हतबल झाला होता आणि अचानक वेढ्यातून मागे हटला. संभाजींनी जुना किल्ला पाडून त्याच्या सान्निध्यात मर्दनगड नावाचा नवा किल्ला बांधला.

पोर्तुगीजांना हुसकावून लावण्याचा संभाजी महाराजांनी शेवटचा प्रयत्न २५ नोव्हेंबरच्या रात्री केला, जेव्हा त्यांनी खाडीचे पाणी ओसरत असताना धवजी खिंडीतून तिसवाडीत प्रवेश करण्याच्या उद्देशाने जुवें बेटावर (सांत इस्त्याव) कब्जा केला. रात्री १०.०० वाजता गोव्यात धोक्याची घंटा वाजू लागली आणि मराठ्यांच्या संभाव्य हल्ल्याची माहिती लोकांना देण्यात आली.

शस्त्रांनी सुसज्ज पोर्तुगीज पाद्री, ओसंडून वाहत असलेल्या मांडवीजवळ जमले. व्हॉईसरॉय रात्रभर वाट पाहत राहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बेटाच्या दिशेने कूच करून मराठ्यांशी भीषण लढाई लढली. मात्र मराठा घोडदळाने पोर्तुगीजांवर ताबा मिळवला आणि सैन्य गोंधळून गेले.

धोरणात्मक पाऊल म्हणून पोर्तुगीजांनी नदीकाठच्या शेतांचे बंधारे उद्ध्वस्त केले ज्यामुळे नदीची रुंदी वाढली. खंडो बल्लाळ यांनी जीव धोक्यात घालून संभाजीला घोड्यासह बुडण्यापासून वाचवले. पाणी ओसरल्यावर हल्ला करायचा होता; पण ते वाढतच होते आणि तरीही हल्ला सुरू करण्यात आला.

नोंदींमध्ये फिरंगी म्हणून उल्लेख केलेल्या पोर्तुगीजांकडे भक्कम उपकरणे होती. संभाजी महाराजांचे सैन्य २६ नोव्हेंबर १६८३ च्या दुपारपर्यंत जुवेंमध्ये होते पण पोर्तुगीजांच्या तयारीचा आढावा घेऊन त्यांनी माघार घेतली आणि स्वत:ला किल्ल्यात बंदिस्त केले. हे बेट मृतांचे बेट (इल्हा डॉस मोर्टोस) म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर संभाजी महराजांनी डिसेंबर १६८३ मध्ये बार्देश आणि सासाष्टीवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी गावे जाळून लुटायला सुरुवात केली आणि स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून पकडायला सुरुवात केली.त्यांनी किल्ले काबीज केले आणि त्यांच्याकडून तोफखाना काढून घेतला. तब्बल २६ दिवस हा प्रकार चालला. व्हाईसरॉयने १३ डिसेंबर १६८३ च्या आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की, यापुढे गोव्यात पोर्तुगीज किंवा ख्रिश्चनांचा कुठलाही ठसा सापडणार नाही, अशी मराठ्यांनी जाहीर घोषणा केली होती.

या कठीण परिस्थितीतच व्हाईसरॉयने शाही दंड हातात देऊन जुन्या गोव्यात जतन केलेल्या सेंट झेवियर्सच्या पार्थिवाकडे मदत व दया मागितली. या दैवी हस्तक्षेपाने जानेवारी १६८४ मध्ये शाह आलमच्या आगमनाची बातमी आली आणि त्यांनी पोर्तुगीजांशी अचानक शांतता तह प्रस्थापित करून रायगडावर धाव घेतल्याने संभाजी महारजांच्या गोव्याच्या विनाशापासून पोर्तुगीजांची सुटका झाली, असे मानले जाते. या तहाचा कोणत्याही पक्षाने विश्वासूपणे पालन केले नाही आणि १६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येपर्यंत अधूनमधून लढाई सुरूच होती.

मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून सुरक्षिततेचा उपाय म्हणून व्हाईसरॉयने आपली राजधानी मुरगाव किल्ल्यावर हलवण्याचा निर्णय घेतला. जानेवारी १६८४ मध्ये शाह आलम डिचोलीत पोहोचला नसता तर संभाजी महाराजांनी त्या वर्षी भारतातून पोर्तुगीज सत्ता संपवली असती.

त्या काळी पोर्तुगीजांनी या संताकडे त्याच्या दैवी हस्तक्षेपासाठी प्रार्थना केली आणि आपल्या उपकारांना त्याने उत्तर दिले असे मानले. आज वसाहतोत्तर काळात गोव्याचे लोक आणि इतर विश्वासू, आपापल्या श्रद्धेची पर्वा न करता, संतांवर विश्वास ठेवतात!

संत फ्रान्सिस झेवियर यांना गोव्यातील लोक “गोंयचो सायब” म्हणून प्रेमाने संबोधतात आणि शतकानुशतके विविध जाती धर्मा मध्ये पूजनीय आहेत. त्यांनी “गोंयचो सायब” ही पदवी मिळवली - ती चर्च, किंवा सरकारने नव्हे तर गोव्यातील लोकांच्या श्रद्धेने प्रदान केली होती. गोव्याचे लोक आणि “गोंयचो सायब” आपल्या गोव्याच्या वारशाचा एक भाग म्हणून परिपूर्ण सामंजस्याने एकमेकांशी जोडलेले आहेत!

Goa
Goa Politics: लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी रणनीती; भाजपने कसली कंबर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com