Brazil Legend Pele: ब्राझीलमधल्या एका छोट्याशा गावात, एका गरीब कुटुंबात जन्मलेले एडसन अरांतेस दो नासिमेंतो, लहापणी मित्रमंडळीमध्ये आणि कुटुंबामध्ये ‘डिको’ म्हणून प्रसिद्ध पावलेले आणि जागतिक नकाशावर ‘पेले’ म्हणून सुप्रसिद्ध झालेले पेले म्हणजे फुटबॉल जगताला लाभलेली एक महान देणगी होती.
गोऱ्या लोकांनी त्यांना पहिल्यांदा ‘ब्लॅक’ म्हणून हिणवले व नंतर त्यांचा जगाला गवसणी घालणारा खेळ पाहून त्यांना ‘ब्लॅक पर्ल’ संबोधले. पण, पेलेंचा मोठेपणा असा की, मला ब्लॅक म्हणा, ब्लॅक पर्ल म्हणा किंवा जादूई पावलाचा नायक म्हणा मी आहे फुटबॉल या खेळावर व तमाम मानवजातीवर प्रेम करणारा ब्राझिलिअन.
ते जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू ठरले, तरी त्यांच्या स्वभावात व वागण्यात अखेरपर्यंत फरक पडला नाही. फुटबॉल खेळाची पेलेंची प्रेरणाशक्ती त्यांचे आई वडीलच होते. वडील डोंडिन्हो हे एक चांगले फुटबॉल खेळाडू होते, पण परिस्थिती त्यांना साथ देऊ शकली नाही.
पण पेलेंनी परिस्थितीवर मात करीत आपल्या आईवडलांचे स्वप्न साकार केले. फक्त स्वप्न साकारच केले नाही, तर विश्वविजेता फुटबॉलपटू बनून आपल्याबरोबर आपल्या पूज्य आईवडलांचे नावही जगासमोर आणले.
दिवसाचे तब्बल सोळा सोळा तास फुटबॉलशी चाळे करण्याचा व मग त्या फुटबॉलला प्रेमाने कुरवाळण्याचा नाद त्यांना त्यांचे वडील डोंडिन्हो यांनी लावला. ते लहानपणी डिकोला एक विकत आणलेला आंबा खेळण्यासाठी द्यायचे.
तो आंबा डिकोने खाली न पाडता आपले पाय डोके आणि खांदे यांचा वापर करीत उडता ठेवायचा, खाली पडणार नाही याची दक्षता घ्यायची. तो आंबा बराच वेळ झाल्यानंतर मग खावासा वाटायचा. सराव यशस्वी झाला की मग, वडील डिकोला आंबा खायला द्यायचे. सराव यशस्वीरीत्या पार पडला या आनंदात मग पेले ‘आंबा पिकतो रस गळतो’ याचा आनंद लुटायचे.
त्यांच्या वडिलांची नोकरी बेताचीच, त्यामुळे घरी दोन वेळ नव्हे एकवेळदेखील खायची वणवण असायची. अशावेळी आपला मुलगा तंदुरुस्त राहावा म्हणून त्याचे आईवडील आपण उपाशीपोटी राहून डिकोला दोन घास द्यायचे. पेलेंच्याही लक्षात ही गोष्ट यायची.
घरात चार पाच तोंडे खाणारी मग ते मी बाहेरच थोडे खाऊन आलोय असे सांगून वेळ मारून न्यायचे व पोटभर पाणी पिऊन झोपी जायचे वयाच्या सातव्या आठव्या वर्षांपासून डिको फुटबॉल खेळायला सुरुवात केली. तेही अनवाणीच खेळायचे पण जेव्हा चौदाव्या वर्षी त्याचा खेळ ऐन रंगात आला, तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला.
सुरुवातीला साओ पावलोतील छोट्या क्लबमध्ये खेळणाऱ्या डिकोला नामवंत क्लबांचे दरवाजे बंद होते. पण, वयाच्या 15व्या वर्षी सेंटोस क्लबमध्ये 1956च्या सुमारास चंचुप्रवेश केल्यानंतर पेले यांचे नवा फुटबॉलच्या नकाशावर झळकू लागले. आणि वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा डिको, फुटबॉल खेळाचा अविभाज्य घटक बनला.
1958ची जागतिक फुटबॉल स्पर्धा ही त्यांच्या जीवनात आकाशी झेप घेणारी ठरली आणि पेले हा फुटबॉल खेळाडूंच्या आणि रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला. मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. जवळजवळ तब्बल 22वर्षे पेले आणि फुटबॉल यांचे अतूट अवीट आश्वासक नाते बनले व फुटबॉल जगतात नवनवे विक्रम करून ते फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट बनले.
जागतिक विक्रम करतानाही त्यांना कधी येलो कार्ड किंवा रेड कार्ड मिळाले नाही. अमली पदार्थांच्या सेवनामध्ये किंवा खेळातील दांडगाईमध्ये त्यांनी कधी स्वतःला गुंतवून घेतले नाही. उलट त्यांच्यापासून ते कोसो मैल दूर राहून खेळाडूंपुढे आदर्श निर्माण केला.
पेले खेळायला मैदानात उतरले की रसिक त्यांचा खेळ पाहण्यासाठी आतुरतेने सरसावून बसत. त्यांच्या खेळातील वेग, आवेग आणि चपळता पाहून फुटबॉलप्रेमी अचंबित होत. आपण एकाग्रतेने त्यांचा खेळ पाहत आहोत, तोवर डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच ते अशा पद्धतीने गोल करीत की, डोळ्यांचे पारणे फिटून जाई.
फुटबॉलचे शौकीन जागच्या जागी बसून हातवारे करून किंवा जल्लोष करून त्यांना उत्स्फूर्तपणे सलामी देत. ‘बाइसिकल किक’ ही तर त्यांच्या खेळाची खासियत होती. त्यांच्या पायाला एकदा चेंडू लागला किंवा त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीचा वापर करून तो आपल्याकडे वळवला की, आता प्रतिस्पर्ध्यांची काही खैर नाही, असे फुटबॉल शौकीनच आपापसात पुटपुटायचे.
त्यांचे पुटपुटणे संपते न संपते तोपर्यंत पेलेंचा चेंडू गोलपोस्ट भेदून गेलेला असे. अशी आगळीवेगळी नजाकत करत हजारो, लाखो फुटबॉलशौकिनांना खेळाचा आनंद लुटायला देत, नवनवे विक्रम करून ते विक्रमादित्य बनले होते.
त्या विक्रमांची थोडीशी झलक सांगायची म्हणजे त्यांनी ज्या सँतोस क्लबकडून पहिल्यांदा खेळायला सुरुवात केली त्या क्लबमार्फत ते एकूण 660 सामने खेळले व एकूण 643 गोल त्यांनी नोंदवले. तसेच एकाच वर्षात 127 गोल आणि जागतिक फुटबॉल स्पर्धेमध्ये सर्वाधिक हॅटट्रिकची (92) नोंद, दि. 19 नोव्हेंबर 1969 या दिवशी कारकिर्दीतील एक हजार गोलची नोंद त्यांच्या आयुष्यातील सामन्यांचे व गोलांचे बोलके आकडे आहेत.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राझिल संघासाठी ते एकूण 4 विश्वकरंडक सामने खेळले आणि एक दोन नव्हे तर तीनदा ब्राझिलला विश्वकरंडक सामने जिंकून दिले. आज जगात ब्राझिलचा फुटबॉल खेळात नावलौकिक आहे, त्याला अर्थातच पेले हे दोन अक्षरी नाव कारणीभूत आहे.
आणि म्हणून 1961साली ब्राझिलच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी पेले ही ‘राष्ट्रीय संपत्ती’ आहे म्हणून जाहीर करून आपल्या देशामार्फत पेलेंना मानाचा मुजरा दिला होता. अशा या पेलेंनी फुटबॉलचा खेळ जगाच्या कानाकोपऱ्यात नेला आणि ते सन्मानाने निवृत्त झाले.
पेले फुटबॉल जगतातून निवृत्त झाले खरे, पण जितक्या ताकदीने त्यांनी फुटबॉलमधून जग उभे केले, तीच ताकद त्यांनी सामाजिक संस्थांना मदतीचा हात देण्यात खर्ची घातली. त्यांना क्रीडामंत्रीपद बहाल करून, त्यांना सत्तेत सामील करून घेऊन ब्राझील क्रीडाक्षेत्रात वर्चस्व गाजवील, अशी कामगिरी त्यांच्याकडून करून घेतली.
सत्तेच्या, संपत्तीच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचूनदेखील पेले आपली गरिबी विसरले नव्हते. आपल्याला आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला अर्धपोटी राहून जे दुःखद व लाजिरवाणे जिणे जगावे लागले, तसे त्रास कुणा दरिद्री माणसाच्या नशिबी येऊ नयेत, म्हणून त्यांनी निवृत्तीनंतर समाजसेवेत अक्षरश स्वतःला झोकून दिले. गरजूंच्या विविध प्रकारच्या औषधोपचारांसाठी त्यांनी देशोदेशी स्वयंसेवी संस्थांचे जाळे उभारण्यासाठी हातभार लावला.
स्वतःच्या धनदौलतीचा त्यासाठी उपयोग करण्याबरोबरच स्वतः अनेक प्रदर्शनीय सामन्यात उतरून या कामासाठी पैसा गोळा करण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले. पेले यांनी साठ - सत्तरीच्या दोन्ही दशकांमध्ये जसे फुटबॉलच्या खेळामधून जग जवळ केले, त्याच प्रमाणे ऐंशी-नव्वदीच्या दोन दशकांमध्ये त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून जग जिंकण्याचा प्रयत्न केला.
पेले हे फुटबॉलच्या माध्यमातून जग जिंकणारे होते, तसेच मनाचे औदार्य मनाचा मोठेपणा आणि समाजाप्रति सच्चे प्रेम असलेले ते फार मोठ्या मनाचे मानव होते. दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देणाऱ्या पेले यांचे वयाचे 82व्या वर्षी दुःखद निधन झाले. पेले या थोर मानवतावाद्याला आणि फुटबॉलच्या अनभिषिक्त सम्राटाला गोमंतकीय खेळाडू आणि शौकीन यांच्यावतीने मानाचा मुजरा!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.