Leopard:
गेले दोन महिने पणजी उपनगरात सतत बिबट्या दिसू लागला आहे. यासंदर्भात त्वरित दखल घ्यायला हवी होती. एका बाजूला बांबोळी पठारावर सारी वनसंपत्ती आपण नष्ट केली आणि दुसऱ्या बाजूला काँक्रीटचे रान उभे करण्याचा सपाटा चालविला आहे. बिबट्याचे त्यामुळे सहज दिसू लागणे स्वाभाविक नव्हे काय?
गोवा विद्यापीठाच्या बांबोळी परिसरात बिबट्या फिरत असल्याची एक बातमी ‘गोमन्तक’ने दीड महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर बिबट्याचा मागमूस नव्हता. मात्र, गोवा विद्यापीठाने सावधगिरीचा इशारा म्हणून विद्यार्थ्यांना जागृत करणारी एक सूचना प्रसृत केली होती. त्यामुळे जरूर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
काही अवधीनंतर लोक ती घटना विसरून गेले होते. परंतु आता मागील दोन दिवस एक बिबट्या दोनापावलामध्ये ‘ओशन पार्क’ या मोठ्या गृहनिर्माण वसाहतीजवळ दिसल्याची वार्ता झळकली आहे. त्यामुळे जरूर आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुर्दैवाने आपल्या वनखात्याने या घटनेची तातडीने दखल घेतली नाही.
गोवा विद्यापीठाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर पर्यावरणवाद्यांनीही तातडीने चिंता व्यक्त केली होती. रानावनात खोल जंगलात दिसणारा बिबट्या अचानक दोना पावलासारख्या रहदारीच्या आणि पर्यटकांनी गजबजलेल्या ठिकाणी दिसणे निश्चित थरकाप उडविणारे आहे.
पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. मनोज सुमती बोरकर यांनीही तातडीने या विषयावर भाष्य करणारा लेख प्रसिद्ध केला होता. आता पुन्हा बिबट्या दिसू लागल्यावर त्या लेखाची आठवण होणे स्वाभाविक आहे. त्यांनी काही उपायही सुचविले होते. त्यांची दखल घ्यावी लागेल.
गोव्यात सध्या कार्निव्हलची धामधूम सुरू आहे. कार्निव्हल म्हटले की, भाऊगर्दी, रस्ते गजबजलेले आणि वाहतुकीची कोंडी हे ठरलेलेच. त्यामुळे, पोलीस आणि बंदोबस्तातील संस्था, तेथे लक्ष केंद्रित करतील यात दुमत नाही.
परंतु दुसऱ्या बाजूला दोनापावलामध्ये बिबट्या येऊन ठेपला आहे आणि तो, ‘कोणावर हल्ला करेल, त्यानंतर बघू’, या भ्रमात आपण राहता कामा नये. बिबट्या हे अत्यंत चतुर आणि तेवढेच धोकादायक श्वापद आहे. स्थानिकांच्या मते एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला हा बिबटा बुधवारी दिसला. याच परिसरात अर्धा खाल्लेला कुत्राही आढळून आला. हा कुत्रा बिबट्याचा शिकार झालेला असावा.
बिबट्या सध्या देशाच्या अनेक भागांत लोक वस्तीच्या निकट राहत असल्याचे आढळून आले आहे. जंगलांमध्ये माणसाने आक्रमण केल्यानंतर अशा श्वापदांना आपले भक्ष्य शोधण्यासाठी नागरी वस्तीकडे यावेच लागते.
गोवेकरांनाही जंगली श्वापदे दिसणे सुरू झाले आहे. पूर्वी रस्त्यांवर एकटादुकटा कोल्हा दृष्टीस पडायचा. सध्या आपण कोल्ह्याचे सारे अधिवास नष्ट करून टाकले आहेत. त्यामुळे वाघ आणि बिबटे नागरी वस्तीत आले नाहीत तरच नवल.
बांबोळी तसेच वांयगिणी खोरे व दोनापावला हे भाग जंगली श्वापदांसाठी मोक्याचे आहेत. गोवा विद्यापीठाजवळ मोठ्या प्रमाणात मोर आहेत. मोराचे आवाज विद्यापीठाच्या आवारात सतत ऐकू येतात.
शहरी वस्तीत जंगली श्वापदे येण्याचे कारण म्हणजे आपण जंगलावर केलेली कुरघोडी हे होय. दुसऱ्या बाजूला बांबोळी परिसरात असलेली झाडीही आपण कापून टाकत आहोत. विद्यापाठीने सध्या आपल्या परिसरात इमारती बांधण्याचा मोठा अट्टहास चालविला आहे. या पठारावर असलेली झाडेझुडपे कापून व खडपे नेस्तनाबूत करून तेथे काँक्रीटचे जंगल उभे केले जात आहे.
गेल्या वर्षभरात विद्यापीठाने तीन मोठ्या इमारती तेथे उभ्या केल्या. त्यानंतर दोनापावलाच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी राहिली. एके काळी हा पठार अनेक वन्य जिवांचा अधिवास होता. अजगर, घोरपड, साप आणि इतर सरपटणारे प्राणी तेथे मोठ्या प्रमाणावर होते. विद्यापीठाने या परिसराचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक होते.
परंतु दुर्दैवाने तशी दृष्टीच आपल्या विद्यापीठाकडे नाही. पावसाळा संपल्यावर तेथे मोठ्या प्रमाणावर गवत उगवते. या गवताला सुकल्यानंतर आगी लावून ते नष्ट करण्याचा प्रकार केला जातो. परिणामी इतर झाडी जळून खाक होतात.
बांबोळी पठारावर बिबट्या दिसणे हे मात्र अचंब्याचे आहे. बिबट्याचा अभ्यास करणारे मानतात, हे श्वापद कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सामावून घेते. हे जनावर अत्यंत नाजूक, त्याचप्रमाणे वातावरणाशी मिळवून, जुळवून घेत राहते.
झाडावरही ते चढून जाते. शहरांमध्ये घराच्या आसपास भटकणारी कुत्री हे त्याचे आवडते भक्ष्य. मागून येऊन अचानक हल्ला करून ते जनावराचा गळा पकडते. त्याला पकडून घनदाट अरण्यात सोडले, तरी ते आपल्या मूळ जागी परतते.
काही वर्षांपूर्वी नाशिक येथे सापडलेला एक बिबटा बोरिवलीच्या अभयारण्यात सोडून देण्यात आला होता. तो आठ दिवसांत आपल्या मूळ स्थानी परत आला. याचा अर्थ शहरी आणि दाट लोकवस्तीच्या भागातून लपतछपत, काही वेळा गटारांमध्येही आश्रय घेत तो आपल्या मूळ जागी आला होता.
पणजीच्या लोकवस्तीत बिबट्याचे आगमन निश्चितच थरकाप उडविणारी गोष्ट आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या वन अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल कशी घेतली नाही? वनअधिकाऱ्यांनी एव्हाना बांबोळी पठारावर शोधमोहीम सुरू करायला हवी होती. तेथे एखादा मोर किंवा कुत्रा मारून टाकण्यात आला आहे का, याचा तपास सुरू होणे आवश्यक आहे. त्याशिवाय छुपे कॅमेरेही या भागात लावता येणे शक्य आहे.
लक्षात घेतले पाहिजे की बिबट्याचे एकूण वर्तन पाहिले व सहज सापडणारे भक्ष्य लक्षात घेतले तर असे आढळेल की हा एकच बिबट्या असावा व तो येथेच कोठेतरी लपून बसला असावा. त्याला लपायला छोटीशी झाडी, एखादे मोठे झाड किंवा एखादी खाडीसुद्धा पुरेशी आहे. त्याचा रंग पाहिला तर तो कोठेही छोट्या जागेत लपून राहू शकतो. महाराष्ट्रात तर बिबटे शेताजवळच्या झाडाझुडपांतही आश्रय घेतात.
बिबट्याला मारून टाकणे हा काही माणसाच्या भीतीवरचा उपाय नाही. पश्चिम घाटात वसलेल्या गोव्यावर निसर्गाने खूप मोठी कृपादृष्टी ठेवली आहे. बिबट्या हे जनावर तर अत्यंत सुंदर. त्याचे अधिवास जपणे हे आपले कर्तव्यच आहे.
जसजशी गोव्याची लोकसंख्या वाढत आहे, तसतसे आपण प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांवर आक्रमण करू लागलो आहोत. या भागात एक विद्यापीठ उभे राहणे समजू शकते, परंतु ज्या पद्धतीने येथे काँक्रीटचे जंगल उभे करणे सुरू आहे, ते चिंताजनक आहे. उत्तर गोवा नियोजन प्राधिकरणाने इमारतींना मान्यता देताना निसर्ग आणि पर्यावरणाचा कोणताही विचार केलेला नाही.
धक्कादायक बाब म्हणजे या भागात जे प्रचंड गृहनिर्माण प्रकल्प उभे आहेत, ते झाडी व हिरवळ उद्ध्वस्त करून उभे करण्यात आले, परंतु त्यांना झाडे लावायची सक्ती कशी बरे केली नाही? येथे ‘ओशन पार्क’ आहे. 500हून अधिक सदनिकांचा हा प्रकल्प. त्याने हिरवळ निर्माण केलेली दिसत नाही.
आधीच पठार, त्यात गोव्यातील ऊन, त्यामुळे हे असले प्रकल्प उन्हाळा आणखी त्रासदायक बनविण्याचे काम करतील. ताळगाव हे एकेकाळी सुंदर रान होते आणि नारळाची बने, शेते यामुळे हा एकूणच परिसर हिरवागार बनला होता.
वन अधिकाऱ्यांनी बिबट्यासंदर्भात तातडीने काही उपाययोजना आखावी. दुसऱ्या बाजूला या परिसरात शिल्लक असलेले थोडेबहुत रान आणि हिरवळ जिवंत ठेवण्यसाठी आम्ही नागरिकांनी थोडीतरी जागरूकता दाखवावी. कारण जंगले संपली तर जनावरेही नष्ट होतील. आपले पाण्याचे स्रोत धोक्यात येतील. शेवटी मनुष्यप्राणी ओक्याबोक्या काँक्रीटच्या जंगलात जगू शकणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.