‘अ‍ॅचिव्हर’ मुकेश थळी

गणिताबरोबरच ‘भाषा’ या विषयावर मुकेशचे प्रचंड प्रेम आहे.
‘अ‍ॅचिव्हर’ मुकेश थळी
‘अ‍ॅचिव्हर’ मुकेश थळीDainik Gomantak
Published on
Updated on

मुकेश थळी हा खरं तर एक गणिती. गणिताचा स्कॉलर, गणिताचे भान सतत बाळगून असलेला. त्याच्या जागृत गणिती भानामुळेच तो ज्याच्या क्षेत्रात वावरला त्यातल्या प्रत्येक कार्याला त्याने ‘काटेकोर’ आणि ‘अचूक’ बनवण्याचा प्रयत्न केला. आपल्या शालेय परीक्षेत गणितात तो पहिला आला पण पुढे त्याने आपले कार्यक्षेत्र भाषा विषयकच निवडले. मात्र त्यातही त्याने गणिताचे एक वेगळे रूप पाहिले. गोवा विद्यापीठात त्याने कोकणी विश्वकोशाचा संदर्भाने केलेले काम असो आकाशवाणीवरील वृत्तनिवेदकाचे काम किंवा पुस्तकांच्या अनुवादाचे काम असो त्याच्या साऱ्या कामात तो एक संकलक (एडिटर) म्हणून आपल्या गणिती कौशल्यानेच वावरला. आपल्याकडून घडत असलेल्या अनेक कृतींना त्याने ‘नेमके’ स्वरूप दिले.

‘अ‍ॅचिव्हर’ मुकेश थळी
गोव्यातील मूर्तिशास्त्रातील नाग

गणिताबरोबरच ‘भाषा’ या विषयावर मुकेशचे प्रचंड प्रेम आहे. या प्रेमानेच त्याला वेगळ्या वाटेवर ओढून नेले. त्याच्या तरुण काळात त्याला व्यासंगी रवींद्र केळेकर यांचा सहवास लाभला. केळेकर यांच्या घरचे महाकाय पुस्तकालय, त्यांच्या घरी येणारे प्रज्ञावंत लेखक, स्वातंत्र्यसैनिक या चैतन्यमय वातावरणाचा चैतन्य-प्रसाद मुकेशच्याही हातावर पडला.गणित ही मुकेश ची व्यक्तिगत मिळकत होती तर संगीत ही त्याला त्याच्या घरातूनच असणारी कौटुंबिक देणगी होती. गायक किंवा वादक नसला तरी मुकेशला असणारे लयीचे भान हे त्या संगीतामुळेच आले असेल कदाचित. त्या जाणिवेचा स्पर्शही त्याच्या निर्मितीत जाणवत असतो.

मुकेश यांनी सुमारे पन्नास कोकणी कथांचा इंग्रजी अनुवाद केला आणि या कथांना व्यापक पातळीवर पोहोचवले. मुकेश यांच्या या प्रयत्नांमुळेच अनेक गोमंतकीय लेखकांची आणि त्यांच्या साहित्याची ओळख दूरवर झाली. मुकेश म्हणतात, हे आपण भाषेवरील आपल्या निस्सीम प्रेमामुळे केले. अनुवाद हे देखील फार मोठे आव्हान असते. विशेषतः जेव्हा त्याला स्थानिक बाज असतो. मूळ लेखनातले बारकावे, अलंकार, प्रतिमा अनुवादकाला थकवतात. मूळ लेखकाला अभिप्रेत असलेली मांडणी आणि आशय अनुवादात आणणे हे कौशल्याचे काम असते. मुळातच मुकेश यांचे भाषेवर प्रभुत्व असल्याने मुकेश यांचा अनुवादही स्वतंत्र प्रतिभेच्या तोडीचा ठरतो. त्यांचे स्वतःचे लेखनही विविध भाषांमधून चालूच असते. कोकणी, मराठी, इंग्रजी या भाषेत ते सातत्याने स्तंभलेखन करत असतात. ‘वळेसर’, ‘हंसध्वनी’, ‘अक्षरब्रह्म’, ‘जीवन गंध’, ‘रंग-तरंग’ हे त्यांचे निबंध संग्रह प्रसिद्ध आहेत. ‘दोरेमीफा’, ‘सारेनिसा’ ही त्यांची पुस्तके कला अकादमीच्या लेखन स्पर्धेत विजेती ठरली आहेत. कबिराचे दोहे आणि रुमी या संत कवीचे काव्य त्यानी कोकणीत आणले आहे.

‘अ‍ॅचिव्हर’ मुकेश थळी
मानसिक आरोग्य: लघुपट स्पर्धा

मुकेश स्थळी हे मूळ चोडण गावचे सुपुत्र. त्यांनी कला आणि साहित्याच्या क्षेत्रात जे योगदान आजवर दिलेले आहे त्याचा गौरव करण्यासाठी चोडण्याच्या ‘सम्राट क्‍लब’ने त्यांना ‘अ‍ॅचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करायचे ठरवले आहे. 26 सप्टेंबर रोजी चोडण्याच्या पंचायत सभागृहात होणाऱ्या खास समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. भाषा या या अतिशय मौल्यवान जीवनसत्वावर मनसोक्त प्रेम करून मुकेश थळी यांनी आपल्या आयुष्याला जी सुरसता जडवली आहे त्याचाच हा पुरस्कार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com