Pratapsingh Rane: प्रतापसिंग राणे यांच्यामुळे गोव्याच्या राजकारणाला संपूर्ण कलाटणी

Pratapsingh Rane: प्रतापसिंग राणे यांचा 85 वा वाढदिवस समारंभ जंगी झाला.
Pratapsingh Rane
Pratapsingh RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Pratapsingh Rane: 20 हजारांपेक्षा मोठी गर्दी जमवण्यास त्यांचे चिरंजीव विश्‍वजीत राणे यशस्वी ठरले. वास्तविक वाढदिवसापेक्षा विजयादेवी यांनी आपल्या नवऱ्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन हे औचित्य होते. त्यादृष्टीने पुस्तक प्रकाशनाला एवढी गर्दी ही पहिल्यांदा जमली असेल.

भारतात तरी तो उच्चांक ठरावा. तडजोडीचे उमेदवार म्हणून जरी मुख्यमंत्रिपदी निवड झाली असली तरी प्रतापसिंग राणे यांनी त्यानंतर गोव्याच्या राजकारणाला संपूर्ण कलाटणी दिली. त्यांनी मगोपचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त केले. त्यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री, सभापती बनण्याचा मान मिळविला.

पुत्राने आणि पक्षश्रेष्ठींनी अनेकवेळा दबाव आणूनही त्यांची पक्षनिष्ठा विचलित झाली नाही. आपल्या चिरंजीवांच्या हट्टापायी ८५ व्या वर्षी प्रचंड मोठा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य त्यांना लाभले. परंतु अजूनही आपल्या कारकिर्दीबद्दल उजळ माथ्याने उभा असलेला हा विरळा नेता आहे.

सुरुवातीला ज्या पद्धतीने लोकांना, नेत्यांना आमंत्रित केले गेले, तेव्हा वाटले होते, हा समारंभ अराजकीय होत असेल. परंतु कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक विश्‍वजीत राणे यांच्याच मनात चलबिचल असावी, कारण चर्चा होती ती या कार्यक्रमात राणे यांचा ८५ वा वाढदिवस व पुस्तकाचे प्रकाशन साजरे करताना राणेंची राजकीय कारकीर्द, त्यांचे जुने सहकारी, त्यांचे प्रकल्प यांना येथे उजाळा दिला जाईल, परंतु ही सर्व काँग्रेसची लखलखीत कारकीर्द आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या भरीव कार्याची अशी उजळणी भाजपा पक्षश्रेष्ठींना रुचली नसती. कारण काही म्हटले तरी राणेंनी आपल्या अनेक वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत स्थिर व भक्कम सरकार दिले. आमदार म्हणून ५० वर्षांची सातत्यपूर्ण कारकीर्द, काँग्रेस पक्षातही असा नेता विरळाच. जेथे भाजपा खोऱ्याने काँग्रेस नेत्यांना प्रवेश देते, तेथे राणे यांनी भल्याभल्यांना दाद दिली नाही.

उलट देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनाही त्यांनी हुलकावणी दिली. सुरुवातीला इंदिरा गांधींचा आशीर्वाद व त्यानंतर राजीव गांधींबरोबर निष्ठापूर्वक काम. त्यांचे गांधी कुटुंबाबरोबर अत्यंत सलोख्याचे संबंध राहिले. इतके की अजूनही ते राहुल व प्रियांका यांच्याबद्दल आत्मीयतेने बोलतात. मी गेल्यावर्षी वाढदिवसानिमित्त मुलाखत घेतली होती. त्यावेळी राहुल गांधींचा प्रामाणिकपणा, तत्त्वनिष्ठा यांचा गौरव करताना सध्याच्या तरुण नेत्यांनी त्यांचा धडा घेण्यासारखा आहे, असे ते म्हणाले होते.

या ज्येष्ठ व कर्तबगार- व ज्यांच्यावरच्या पुस्तकाचे नाव आहे, ‘गोव्याचे भाग्यविधाते’- या समारंभास लोक राजकीय निष्ठा बाजूला ठेवून येणे हे स्वाभाविक होते, परंतु त्यातील एक विरोधाभास म्हणजे भाजपा नेत्यांनीच व्यासपीठ अडविले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती समजून घेता येते. ते भान ठेवून अत्यंत समयोचित बोलले. परंतु प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व माजी मंत्री सुरेश प्रभू यांची भाषणे वातावरणाशी सुसंगत नव्हती.

येथे विश्‍वजीत राणे यांची राजकीय अडचण समजू शकते. सध्या भाजप नेते भाषणे, मते, टोमणे याबद्दल कमालीची असहिष्णू बनले आहेत. अशा समारंभात काँग्रेस नेत्यांना न बोलविणे समजू शकते. परंतु उजव्या विचारसरणीच्या एखाद्या विचारवंताला बोलावून त्याचे भाषण ठेवले असते तर सुसंगत ठरले असते. परंतु असे विचारवंत किंवा वक्ते या व्यासपीठावर काही बोलले तरी त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्याचाच भाग असेल कदाचित. परंतु पत्रकार सागरिका घोष- ज्यांनी हे पुस्तक तयार होण्यास मदत केली, त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही.

त्यांचे पती राजदीप सरदेसाई हे मोदी सरकारच्या टीकाकारांमधले एक गणले जात असल्याने त्यांना बोलायला लावणे हाच विरोधी मुद्दा बनला असता, असे आयोजकांना वाटले असावे. आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे या पुस्तकासाठी ॲड. यतीश नायक यांनी आग्रह धरला, असे विजयादेवी म्हणाल्या. परंतु ते कधी प्रतापसिंग राणे यांचे समर्थक नव्हते. त्यांनी आपला राजकीय गुरू मानले डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांना.

विलींनी राणेंविरोधात जेवढ्या राजकीय कुरापती केल्या, तेवढ्या आणखी कोणी केल्या नाहीत. राणेंचे सरकार त्यांनीच पाडले. विलींचे शिष्य मानल्या गेलेल्या लुईझिन फालेरो यांच्याकडूनही ॲड. यतीशनी दीक्षा घेतली. सध्या ते भाजपमध्ये आहेत. पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे ते योग्य बाजूला उभे आहेत असे आयोजकांना वाटले. तरीही ॲड. नायक यांनी आग्रह धरून पुस्तक तयार होण्यास मदत केली असेल तर त्यांनी कमाल केली, असे म्हणावे लागेल. कारण गोव्याच्या समकालीन इतिहासाबद्दल अजून खूप लिहिले गेले पाहिजे. विशेषतः राणे यांच्या हयातीत हे पुस्तक तयार झाले, ही मोठीच उपलब्धी होय.

प्रतापसिंग राणे १९८० मध्ये मुख्यमंत्री बनले व सलग दहा वर्षे ते या पदावर होते. १९७२ ते २०२२ पर्यंत ५० वर्षे त्यांनी सत्तरीचे आमदार म्हणून एवढा सलग काळ या पदावर राहण्याचा विक्रम केला. १९७७ पासून ते काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून विधानसभांवर निवडले गेले. १९७७ मध्ये काँग्रेस विरोधी बाकावर होता.

शशिकलाताई काकोडकर या राणे यांचा द्वेष करीत. त्यामुळे या निवडणुकीत ताई आपल्याला उमेदवारी देणार नाहीत, याचा अंदाज येताच राणेंनी पक्ष बदलला. एवढेच नव्हे तर सत्तरी व आसपासच्या भागामध्ये विशेषतः डिचोली तालुक्यात मगोपाला खिंडार पाडले. राणेंमुळे मराठा समाज मगोपपासून विभक्त झाला. शेवटी तर डिचोलीत अपक्ष उमेदवार हरिष झांट्ये यांच्यामार्फत ताईंचा पराभव घडवून आणण्यात राणेंनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ताईंचे विशेषकरून मगोपचे राजकारण संपविण्याचे ते अत्यंत आक्रमक पाऊल होते. काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणून १७ वर्षांची मगोपची राजवट संपविण्याचे श्रेय त्यानंतरच्या लोहिया मैदानावरील जाहीर सभेत विली-बाबू नायकांनी स्वतःकडे घेतले असले तरी या सभेत व्यासपीठावर शांतपणे बसलेल्या राणेंनी ते उद्‍गार खिलाडूवृत्तीने घेतले असणार.

कारण पुढची दहा वर्षे या दोन्ही नेत्यांची रग जिरवून आपल्याच हाती सत्ता एकवटणार आहे, हे या संयमी नेत्याने ताडले होते. पुढे झालेही तसेच. तडजोडीचा उमेदवार म्हणून जरी दोन्ही नेत्यांनी राणेंचे नाव सुचविले तरी राणे मुत्सद्द्याप्रमाणे आपली ताकद वाढवित गेले. पहिल्या कारकिर्दीतील सुरुवातीची काही वर्षे विली-बाबू यांच्या उचापतींना राणेंनी तोंड दिले. परंतु १९८४ मध्ये राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने निर्विवाद सत्ता प्राप्त केल्यानंतर त्यांनी या दोन्ही नेत्यांना भीक घालणे सोडून दिले.

Pratapsingh Rane
Poonam Pandey Controversy: वादग्रस्‍त पूनम पांडेला न्‍यायालयाचे समन्‍स

गांधी कुटुंबाचा विश्‍वास प्राप्त केल्यानंतर राणेंना संपूर्ण अभय मिळाले. पक्षात प्रखर शिस्त निर्माण करणे त्यांना शक्य झाले. त्यात भर म्हणजे बाबू नाईक निवडणूक हरले, काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. डॉ. विल्फ्रेड डिसोझांचाही मतदारसंघ कधी सुरक्षित नव्हता. त्यामुळे १९८४ ते १९८९ या त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांना पक्षांतर्गत अडचणी मुळी नव्हत्याच. नंतर १९८९ मध्ये परत डॉ. विलींनी त्यांच्या कामात अडचणी निर्माण केल्या व गोव्याच्या राजकारणात अस्थिरतेची बिजे रोवून ठेवली.

त्यानंतर पुढे जे अस्थिरतेचे ग्रहण लागले, त्यामुळे तर राणेंची कारकीर्द तर अधिकच उजळ बनली. १९९२ ते २००० या काळात जी सरकारे स्थापन होऊन विक्रमी दहा मुख्यमंत्री बनले, तोच हा काळ. ज्यामुळे पक्षांतरविरोधी कायदा बनवावा लागला. या काळात काँग्रेस पक्षाचे अस्तित्वही संकटात सापडले होते. लोक कंटाळले होते, स्वतः काँग्रेस कार्यकर्तेही ही राजवट संपवायला हवी, या निष्कर्षावर आले.

१९९४ मध्ये मगोप-भाजप युतीद्वारे भाजपचे चार नवे चेहरे जिंकून आले. मनोहर पर्रीकरांची कारकीर्द सुरू झाली. राजकारणाने कूस बदलली. परंतु पाच वर्षे विरोधी पक्षनेतेपद व आठ वर्षे राणेंनी सभापतीपद सक्षमपणे चालवले. सभापतिपदी त्यांनी चालवलेला चोख कारभार व कडक शिस्त लक्षात राहण्यासारखी आहे. याच विषयावर परवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माझ्याशी बोलताना काढलेले उद्‍गार मार्मिक होते. ते म्हणाले, ‘गोव्याच्या राजकीय इतिहासात अनेकजण सभापती झाले व त्या पदावर असताना सभागृहाचे नियम पाळावेत, कामकाज का चालवू द्यावे, याबद्दल वेगवेगळे नियम अधोरेखित केले.

परंतु हेच सदस्य जेव्हा सभापतिपदावरून उतरले तेव्हा त्यांनी बेशिस्तीत भाग घेतला. राणे यांनी मात्र विरोधी नेता असतानाही नेहमी प्रगल्भ व अभ्यासू सदस्याप्रमाणे आचरण केले. ते वेळोवेळी सरकारला सुनवायला कमी करीत नसत. परंतु त्यांनी आतताई वर्तन केले नाही. सत्तेवर असताना किंवा विरोधकांमध्ये बसले असताना ते शांत स्थितप्रज्ञाप्रमाणे राहत. आजच्या सत्तेला सोकावलेल्या व त्यामुळे भ्रष्टाचारात माखून घेतलेल्या नेत्यांना राणे यांचे हे दर्शन वेगळे वाटेल.

परंतु ५० वर्षांपूर्वी अमेरिकेत शिक्षण घेऊन परतल्यावर काहीसे मागेपुढे होत त्यांनी राजकारणात शिरणे पसंत केले होते. त्यावेळी सत्तेत राहून त्यांना काम करायचे होते. या पदावर कायम राहण्यासाठी मी आलेलो नाही, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे काँग्रेस पक्षातही मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी सदस्य आटापिटा करीत, कोणाबरोबर शैय्यासोबत करण्याची त्यांची तयारी असे. तसे वर्तन राणेंनी कधी केलेले नाही. सत्ता असताना ते कधी उतले-मातले नाहीत व आपल्या जवळच्या सहकाऱ्यांनी बंड करून सरकार पाडले, तेव्हाही त्यांचा तोल गेला नाही.

गेल्या निवडणुकीत त्यांना भाजपमध्ये आणण्याचे सारे बेत शिजले होते. भाजप पक्षश्रेष्ठींचा विश्‍वजीत राणेंवर दबाव होता. कारण गोव्याच्या राजकारणात सचोटी आणि प्रामाणिकपणा यांचा एकच ‘अवतार' राजकारणात शिल्लक आहे, तो राणेंच्या रूपात, हे भाजपा नेत्यांनीही ताडले होते. त्याआधीही राणेंना भाजप नेते निकट असत.

गोव्यात भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका होत, त्यावेळी विजयाराजे सिंधिया, वाजपेयी, अडवाणी ही मंडळी राणे यांना भेटल्याशिवाय परत जात नसत. त्यावेळी पक्षभेद आजच्यासारखे तीव्र नव्हते व राणे यांनीही आपले सौजन्य व आतिथ्यशिलता पक्षभेदामुळे बिघडू दिली नाही. त्यामुळे मनोहर पर्रीकरांनी सार्दिन सरकारचा पाठिंबा काढून घेतला व १९९९ मध्ये आपले आघाडी सरकार घडविले. तेव्हा राणेंना सभापतीपद बहाल करण्याचे पाऊल त्यांनी उचलले होते.

त्या पदावरून राणे यांनी सर्वांना समान न्याय दिला व कधी-कधी आक्रस्ताळे बनणाऱ्या जितेंद्र देशप्रभूंनाही चार बोल सुनावायला कमी केले नाही. सभापतीपदाची कशी बूज राखावी, त्यांनी पक्षीय कामात आजच्यासारखी ढवळाढवळ करू नये (रमेश तवडकर भाजपच्या बैठकांनाही हजेरी लावतात) याचे धडे दिले. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठीही त्यांच्यावर नाराज होती. परंतु त्यानंतरही राणेंना या पक्षाने महत्त्वाची पदे दिली. पक्षाबरोबरच्या नैतिक आचरणात आपल्याला कुठे कधी खजिल व्हावे लागेल असे वर्तन त्यांनी कधी केले नाही.

त्यामुळेच त्यांचे सौजन्य म्हणजेच राजकीय तत्त्वनिष्ठा मुरडण्याचे पाऊल आहे, असे समजून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याबरोबर चहापानाचे नाटक केले. तेथून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा किंवा पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला आहे, अशा आशयाचे विधान त्यांनी केले. राणे यांची कारकीर्द आणि त्यांची संयमी प्रवृत्ती देवेंद्र फडणवीसांना समजण्याचे कारणच नव्हते. तोपर्यंत भारतीय राजकारणात नद्यांमधून बरेचसे पाणी वाहून गेले होते.

Pratapsingh Rane
Fish Market: मत्स्य व्यवसाय समुद्रापुरता मर्यादित नाही

गोव्याचेच उदाहरण द्यायचे झाल्यास पर्रीकरांनी साधी साद घालताच अनेक काँग्रेस नेत्यांनी वेळोवेळी पक्ष बदलले. पर्रीकरांच्या काळात ‘घुस्मटणारे’ दिगंबर कामत सध्या भाजपामध्ये परत ‘घुस्मटायला’ हजर.गोव्यात पक्षबदलू, स्वार्थी, नतद्रष्टांची फौज म्हणजेच काँग्रेस, असे समीकरणच बनले. महाराष्ट्रातही काही वेगळे घडत नव्हते. पक्षनिष्ठेपेक्षा सत्तेला निकट राहून मिळविलेली प्रचंड संपत्ती यापुढेही कायम राखावी, या सनातन ध्यासाने पछाडलेले अनेक नेते भाजपाच्या आडोशाला आले होतेच. त्यामुळे राणे कोण कुठले, याचा अभ्यास करायला भाजप नेते गेले नाहीत.

फडणवीस राणेंच्या घरातून निघण्याचा अवकाश, परंतु राणेंनी त्यानंतर काढलेले उद्‍गार फडणवीसांची सारी रग उतरविण्यास कारण ठरले. राणे म्हणाले, मी कधीही भाजपमध्ये जाण्याचा विचार व्यक्त केलेला नाही. ज्या पद्धतीने राणे यांची मिनतवारी सारे भाजप नेते करीत होते, त्यानंतर तर काँग्रेसजनांनी राणे आता निघून गेलेच असा निष्कर्ष काढला होता. परंतु राणे ठाम राहिले, कारण सत्तेची त्यांनी अभिलाषा बाळगली नाही. इतकी वर्षे सत्तेत राहूनही ते स्थितप्रज्ञ राहिले.

गेल्या दोन वर्षांत गोव्यात अनेक उलथापालथी घडल्या आहेत. राणेंना कायमस्वरूपी मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याबाबतही राणे आग्रही नव्हते. मी हा लाभ मिळविण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही, असे सांगून त्यांनी हात झटकले. कुटुंबाच्या आग्रहासाठी त्यांनी २०२२ मध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा आग्रह सोडून दिला. वाढदिवसाच्या समारंभात ते मोजके बोलले, सत्ता आपले कधी ध्येय नव्हते, परंतु विविध पदांवरून आपल्याला जनसेवा करता आली, याबाबत कृतज्ञ आहोत, असे ते म्हणाले. राजकारणात त्यांनी केलेल्या चुका आणि त्रुटीही अनेक शोधता येतील.

परंतु राजकारणाच्या ते पूर्ण आहारी गेले नाहीत. त्यामुळे कोरडे शुष्कही बनले नाहीत. ते कुटुंबवत्सल राहिले. शेतकरी म्हणून जगण्याची आस सोडली नाही, त्यामुळे अजूनही ते शेतात रमतात. राजकारणाकडे पाठ फिरवूनही त्यांना शांत झोप लागते. म्हणून गोव्याचे लचके तोडून, गोव्याच्या जमिनी बाहेरच्यांना विकताना, या मातीशी इमान राखण्याचे व्रत न पाळण्याच्या ज्या प्रवृत्तीला येथे राजकारणी म्हणतात, त्या नराधमांमध्ये राहूनही राणे वेगळे वाटतात!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com