फळांचा राजा आंबा, तसे मोबाईलचा राजा ॲपल! ‘ॲपल’ने (apple iphone) मोबाईलची नवीन आवृत्ती बाजारात आणली, की अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांच्याच नव्हे, तर ‘ॲपल’चीच आधीची आवृत्ती वापरत असलेल्यांच्या मनातदेखील मोह, द्वेष, मत्सर, ईर्षा, असे कैक विकार तात्काळ तयार होतात. अर्थशास्त्रज्ञांमध्ये कंपन्यांची किंमत निश्चित करण्याची प्रक्रिया कशी असावी, यावर नव्याने चर्चा सुरु होते. ‘ॲपल’ने पहिल्यापासूनच ‘प्राईस स्किमिंग’ या तंत्राचा वापर केला. स्किमिंग म्हणजे दुधावरची साय काढणे. सायीचा पहिला थर घट्ट असतो, नंतर ती पातळ होत जाते. तसेच, ‘प्राईस स्किमिंग’ करणारी कंपनी नवीन उत्पादन उच्च किमतीला आणते. एवढी जास्त किंमत देणारे ग्राहक कमी झाले किंवा स्पर्धा वाढली, की किमती कमी केल्या जातात.
‘प्राईस स्किमिंग’चे अनेक फायदे कंपनीला मिळू शकतात. किंमत जास्त असल्यामुळे कंपनीने संशोधन आणि उत्पादन विकसित करण्यावर केलेला खर्च भरून निघायला लवकर सुरवात होते. उत्तम गुणवत्तेचा इशारा ग्राहकाला मिळतो. मोजके असलेले पहिले ग्राहक एका प्रकारे उत्पादन चाचणीची भूमिकाच पार पाडतात- यामुळे उत्पादनात सुधारणा करण्यास वाव राहतो. त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांच्या बाजारात प्रवेश झाल्यावर कंपनी किंमत कमी करू शकते. या व्यतिरिक्त, ‘आयफोन’ची नवीन आवृत्ती विकत घेणाऱ्या ग्राहकांमध्ये ‘माया साराभाई’चा तोरा दिसू लागतो. ग्राहक नि कंपनी दोघेही हवेत असतात.
‘ॲपल’पेक्षा उलट तंत्र ‘अँड्रॉइड’ने वापरले. याला ‘पेनिट्रेशन प्रायसिंग’ असे म्हणतात. अँड्रॉइड फोन बाजारात आणतांना सवलती दिल्या जातात. यामध्ये जाड असलेली थोडीशी साय नाही, तर पातळ असलेलं; पण पातेलं भरून दूध पिण्याची कंपनीची इच्छा असते! जेव्हा कंपनीचे लक्ष बाजारातील हिश्श्यावर केंद्रित असते, तेव्हा ‘पेनिट्रेशन प्रायसिंग’चा खास उपयोग केला जातो. प्रायसिंगच्या डावपेचांमध्ये संख्या महत्त्वाच्या असतात! 1997मध्ये झालेल्या एका संशोधनात असे मांडले गेले, की जाहिरातींमध्ये 60% किमती या आकड्यांनीच संपणाऱ्या असतात! तक्ता पहा.
रु. 99 फक्त, रु. 199 फक्त, अशा किमती आपण पाहातो. या गंमतीला ‘सायकॉलॉजिकल प्रायसिंग’ असे म्हणतात. थॉमस आणि मोरवीत्झ यांनी 2005 मध्ये केलेल्या संशोधनात दिसून आले, की आपण किमती नेहेमी डावीकडून उजवीकडे वाचतो. म्हणूनच रु 1.9 आणि रु.3 यात फरक किती, असे विचारल्यावर बहुतेक लोकांनी दोन रुपयाचा फरक आहे असे उत्तर दिले! यामुळेच तर कंपन्या रु.99 फक्त अशी किंमत ठेवतात.
निश्चित करतात. पुढे समजा ती वस्तू बनविण्याचा खर्च वाढला तर घटणाऱ्या नफ्याची भरपाई करण्यासाठी किंमत तीच ठेवून वजनात घट केली जाते. ‘9’ आकड्याने संपणाऱ्या किमती पहिल्या, की ग्राहकाला किंमत कमीतकमी असल्याचा भास होतो. तो मागणी वाढवतो. खरं तर, रु. 99 किंवा रु. 199 अशा किमती असल्या, की ग्राहकाला सुट्टे पैसे मिळवण्याची कटकट. पण हल्ली डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे भरत असलेल्या ग्राहकाची कुठचीही गैरसोय होत नाही. अर्थातच, ग्राहकाची मानसिकता पाहून किमती लावणे हे रोजच्या गोष्टींसाठी ठीक आहे. ‘ॲपल’ असल्या डाव्या उजव्या संख्यांच्या तर्कात सापडलेले नाही. ‘512 जीबी आयफोन- 13’ची किंमत रु. 1,09,900 ‘फक्त’ आहे!
-डॉ. मानसी फडके
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.