Vijay Shekhar Sharma Steps Down: विजय शेखर शर्मा यांनी दिला पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; बोर्ड सदस्यत्वही सोडले

Vijay Shekhar Sharma: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
Vijay Shekhar Sharma Steps Down
Vijay Shekhar Sharma Steps DownDainik Gomantak

Vijay Shekhar Sharma Steps Down: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

पेटीएम पेमेंट बँकेत मोठे बदल

वास्तविक, पेटीएम पेमेंट बँकेवर रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर बोर्डात अनेक बदल करण्यात आले आहेत. पेटीएमने सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अर्धवेळ नॉन-एक्झीक्युटिव्ह अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी PPBL चे बोर्ड सदस्य पदही सोडले आहे. दरम्यान, शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या बोर्डाचीही पुनर्रचना करण्यात आली, ज्यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर हे बोर्डाचे सदस्य असतील. याशिवाय, सेवानिवृत्त आयएएस देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि निवृत्त आयएएस रजनी सेखरी सिब्बल हे बोर्डाचे सदस्य असतील. आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विजय शेखर शर्मा हे या बँकेचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत.

पेटीएम पेमेंट बँक चालवण्यासाठी आरबीआयचा सल्ला

गेल्या आठवड्यातच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत नवीन दिशा-निर्देश जारी केले आहेत. वास्तविक, जर पेटीएम यूपीआय सर्व्हिस किंवा पेटीएम पेमेंटशी लिंक असेल तर 15 मार्च नंतर ते कार्य करणार नाही. जर ही सेवा सुरु ठेवायची असेल तर ग्राहक आणि मर्चंटर्संना त्यांचे पेटीएम यूपीआय दुसऱ्या बँकेशी लिंक करावे लागेल. Paytm ची मूळ कंपनी One97 Communication Limited यासाठी 4-5 बँकांशी संपर्कात आहे.

दुसरीकडे, सोमवारी ट्रेडिंग दरम्यान पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स पाच टक्क्यांनी वाढले. NSE आणि BSE वर शेअर प्रत्येकी पाच टक्क्यांनी वाढला. पेटीएमचे शेअर्स NSE वर रु. 428.10 आणि BSE वर रु. 427.95 वर पोहोचले आहेत, ही त्याची अप्पर सर्किट लिमिट देखील आहे. याआधी शुक्रवारीही वन97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com