Vande Bharat Trains In Budget 2023: प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढच्या अर्थसंकल्पात म्हणजेच 2023-24 च्या अर्थसंकल्पात सरकार 300-400 वंदे भारत ट्रेनची घोषणा करु शकते. नवीन वंदे भारत गाड्यांची घोषणा ही पुढील 475 सेमी हाय-स्पीड ट्रेन सुरु करण्याच्या आधीच घोषित केलेल्या योजनेव्यतिरिक्त असेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दरवर्षी अशा 300-400 गाड्यांना मंजुरी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासोबतच प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारताला 2025-26 पर्यंत टिल्टिंग तंत्रज्ञानासह ट्रेनचा (Train) पहिला सेट मिळेल, याचा अर्थ प्रवाशांना आता अधिक सुविधा मिळणार आहेत. हे तंत्रज्ञान आधीच मंजूर 475 पैकी जवळपास 100 वंदे भारत ट्रेनमध्ये वापरले जाईल, ज्यामुळे गाड्यांना वेगात वळवण्यास मदत होईल. त्यामुळे रेल्वे प्रवासही सुकर होणार आहे.
प्रवाशांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता वंदे भारतमध्येही स्लीपर कोच असणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, स्लीपर कोच असलेली पहिली वंदे भारत ट्रेन कॅलेंडर वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत सुरु केली जाईल. सध्या या सर्व गाड्या ब्रॉडगेज नेटवर्कसाठी आहेत.
तसेच, रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही अशा ट्रेन्स तयार करु ज्या स्टँडर्ड गेज नेटवर्कवर धावू शकतील. आवश्यक चाचण्या घेण्यासाठी राजस्थानमध्ये 220 किमी प्रतितास वेगाने परीक्षण ट्रॅक विकसित केला जात आहे.
अलीकडेच वैष्णव म्हणाले होते की, देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 पर्यंत सुरु होईल. सध्या देशात पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. त्याची सुरुवात 2019 मध्ये नवी दिल्ली आणि वाराणसी दरम्यान सुरु झालेल्या वंदे भारतने झाली. या गाड्यांचा कमाल वेग ताशी 180 किमी आहे, मात्र सध्या त्या 130 किमी प्रतितास या वेगाने धावल्या जात आहेत. त्याचबरोबर, पहिली बुलेट ट्रेन गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणार आहे, ज्याचा वेग ताशी 320 किमी असेल.
मागील अर्थसंकल्पात 400 गाड्यांना मंजुरी देण्यात आली होती, त्यापूर्वी 75 गाड्यांना मंजुरी देण्यात आली होती. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले होते की, 'आम्ही येत्या तीन वर्षात हे लक्ष्य गाठू. या ट्रेनमध्ये अनेक देशांनी स्वारस्य दाखवले आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना यात आणखी सुधारणा हवी आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.