

Nayara Energy Petrol Diesel Price Hike: देशात आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेसाठी एक अत्यंत चिंतेची बातमी समोर आली. खासगी क्षेत्रातील दिग्गज तेल कंपनी 'नायरा एनर्जी'ने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली. मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे होर्मुझची खाडी जवळजवळ बंद झाली असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या ऊर्जा केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाचा जागतिक पुरवठा विस्कळीत झाला.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि परिचालन खर्चात झालेली वाढ यामुळे खासगी तेल कंपन्यांवर दबाव वाढत होता, परिणामी नायरा एनर्जीने हे पाऊल उचलल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी सध्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही, ही काहीसा दिलासा देणारी बाब आहे.
इंधनाच्या या नव्या दरवाढीनंतर देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीत तफावत दिसून येत आहे. हैदराबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 107.46 रुपयांवर पोहोचला, तर कोलकात्यात 105.41 रुपये आणि मुंबईत 103.54 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल मिळत आहे. बंगळुरुमध्ये 102.92 रुपये आणि नवी दिल्लीत 94.77 रुपये प्रति लिटर असे दर आहेत. डिझेलच्या बाबतीतही अशीच वाढ पाहायला मिळत असून हैदराबादमध्ये 95.70 रुपये, भुवनेश्वरमध्ये 92.77 रुपये आणि चेन्नईत 92.39 रुपये दराने डिझेल विक्री होत आहे. दिल्लीत डिझेलचे दर 87.67 रुपये प्रति लिटर आहेत. या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असून वाहतूक खर्च वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरवाढीच्या बातमीसोबतच सोशल मीडियावर इंधनाच्या तुटवड्याबाबत अनेक अफवा वेगाने पसरत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून अनेक राज्यांमध्ये पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आसाममधील गुवाहाटीसह विविध शहरांमध्ये वाहनधारक आपली टाकी फुल करण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करताना दिसत आहेत. केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर एलपीजी सिलेंडर रिफिलिंग स्टेशन आणि डेपोवरही लोकांची मोठी गर्दी उसळली आहे. सरकारने देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे वारंवार स्पष्ट केले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे, तरीही लोकांची गर्दी ओसरत नाहीये.
राजकीय स्तरावरही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका होऊ लागली आहे. एआयएमआईएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. "सरकार हे संकट हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले," असा आरोप त्यांनी केला. देशात पुरेसा स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह तयार करण्यात सरकारला यश आले नाही, ज्यामुळे आज इंधन आणि खतांचा तुटवडा भासत असून त्याची किंमत सामान्य जनता मोजत असल्याचे ते म्हणाले. तसेच, आगामी विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. एकूणच, जागतिक युद्ध आणि स्थानिक दरवाढ यामुळे सामान्य माणूस आर्थिक कोंडीत सापडला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.