Interest Rates: भारतानंतर अमेरिकेतही महागाईसंबंधीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये महागाई हा चिंतेचा विषय आहे. महागाईचा परिणाम दोन्ही देशांमध्ये हळूहळू दिसू लागला आहे. यूएस फेडसोबतच रिझर्व्ह बँकेकडूनही व्याजदरात वाढ अपेक्षित आहे. व्याजदरात वाढ झाल्यास, त्याचा थेट परिणाम ईएमआय भरणाऱ्या बँक ग्राहकांवर होऊ शकतो. यामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन पूर्वीपेक्षा महाग होऊ शकते. जर तुम्ही आधीच लोनवर घर घेतले असेल तर तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागू शकतो.
महागाई 7 टक्क्यांवर पोहोचली
अमेरिकेत (America) चलनवाढीचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. त्याचा परिणाम आता अमेरिकन शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावरही दिसू लागला आहे. देशात 12 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या ऑगस्ट महिन्यातील किरकोळ महागाईचा (Inflation) आकडा 7 टक्क्यांवर पोहोचला होता. जुलैमध्ये तो 6.7 टक्के होता. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून किरकोळ महागाई दरात घट झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा आकडा 5.3 टक्के होता. तर दुसरीकडे, मंगळवारी अमेरिकेत सीपीआय डेटा जाहीर करण्यात आला. त्यानुसार, मासिक CPI (ग्राहक किंमत निर्देशांक) ऑगस्टमध्ये 8.3 टक्के दराने वाढला. येथे जूनमध्ये 40 वर्षांतील सर्वोच्च महागाई 9.1 टक्के नोंदवली गेली होती.
व्याजदरवाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे
अमेरिकेच्या ताज्या CPI डेटावरुन, असे मानले जात आहे की, UC फेड रिझर्व्ह व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवेल. पुढील आठवड्यात 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत फेडकडून व्याजदरातील बदलाची घोषणा केली जाईल. यूएस फेडने या वर्षात चार वेळा व्याजदरात बदल जाहीर केले आहेत. कोणत्याही देशात चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी त्या देशाची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवत असते. भारतातही मे महिन्यापासून व्याजदरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे.
पॉलिसी दर सलग तीन वेळा वाढले
दुसरीकडे, महागाई वाढल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या महिन्यात सादर होणार्या चलनविषयक धोरण पुनरावलोकनात (MPC) पुन्हा रेपो रेट वाढवू शकते. किरकोळ महागाई दोन टक्क्यांच्या फरकाने चार टक्क्यांवर ठेवण्याची जबाबदारी सरकारने आरबीआयवर सोपवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक 28-30 सप्टेंबर रोजी होणार आहे. पॉलिसी रेटमध्ये सलग तीन वेळा 1.40 टक्के वाढ करण्यात आली आहे.
दुसरीकडे, ICRA मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, किरकोळ महागाई दर महिन्याला वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ. "सप्टेंबर 2022 च्या आर्थिक धोरण आढाव्यात MPC 0.5 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे," असेही ते म्हणाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.