GDP Data: सरकारने चौथ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जाहीर केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, चौथ्या तिमाहीत देशाचा जीडीपी 6.1% आहे. यापूर्वी, देशाचा जीडीपी 4.4 टक्के होता. जानेवारी-मार्च तिमाहीसाठी हा GDP वाढीचा दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अंदाजापेक्षा चांगला आहे. जीडीपी वाढीचा दर 5.1 टक्के राहण्याची अपेक्षा आरबीआयला होती.
सरकारी आकडेवारीनुसार, संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर (जीडीपी वाढीचा दर) 7.2 टक्के राहिला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने बुधवारी जीडीपीची आकडेवारी जाहीर केली.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर 9.1 टक्के होता. यासोबतच, सरकारने वित्तीय तुटीची आकडेवारीही जाहीर केली आहे. सरकारची (Government) वित्तीय तूट कमी झाली आहे. हे देखील अपेक्षेपेक्षा चांगले झाले आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 मधील आर्थिक वाढीचे आकडे त्रैमासिक आधारावर पाहिल्यास, एप्रिल-जून या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने 13.1 टक्के वाढ नोंदवली. जुलै-सप्टेंबरमध्ये विकास दर 6.2 टक्के आणि ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 4.5 टक्के होता.
यापूर्वी, सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षातील वित्तीय तुटीची आकडेवारीही जाहीर केली होती. एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान सरकारची वित्तीय तूट जीडीपीच्या 6.4 टक्क्यांवर आली आहे. जीडीपीच्या 6.7 टक्के इतकी राहील असा अंदाज सरकारने व्यक्त केला होता.
तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही चालू आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात वित्तीय तूट जीडीपीच्या 6.4 टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य ठेवले होते.
आता त्यात सुधारणा करुन जीडीपीच्या 5.9 टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, 2025-26 पर्यंत ते GDP च्या 4.5 टक्क्यांच्या बरोबरीने आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
जानेवारी-मार्च या तिमाहीत देशातील बेरोजगारीचे आकडे जास्त होते. NSSO ने दर्शविले की, शहरी भागात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च 2023 दरम्यान 6.8 टक्के होता, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 8.2 टक्के होता. तज्ज्ञांवर विश्वास ठेवल्यास, येत्या काळात त्यात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, स्थानिक आणि जागतिक पातळीवर सुधारणा होताना दिसत आहेत. मार्चमध्ये महागाई दर 5.60 टक्के होता, तर एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई 4.70 टक्क्यांवर आली. याचा अर्थ RBI ची टॉलरन्स लेवल सलग दोन महिने 6 टक्क्यांच्या खाली दिसली आहे. महागाईमुळे RBI ने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत व्याजदरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. एप्रिल महिन्यात व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही आणि जूनच्या चक्रातही अशीच शक्यता दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.