Goa Diwali: देशभरात आज (29 ऑक्टोबर) धनत्रयोदशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. धनत्रयोदशीस सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या शुभ दिनी देशात लोकांनी मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीची खरेदी केली. देशभरात किती कोटींची उलाढाल झाली? या संदर्भात माहिती देताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने सांगितले की, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात सुमारे 60,000 कोटींची उलाढाल झाली.
दरम्यान, चांदणी चौक लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार आणि सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आज देशभरात सुमारे 20,000 कोटींचे सोने आणि 2,500 कोटींची चांदीची विक्री झाली आहे. तर दुसरीकडे, सीएआयटीच्या ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे (एआयजेजीएफ) राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी एका निवेदनात सांगितले की, सोने आणि चांदीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
अरोरा यांनी सांगितले की, “यावर्षी देशभरात सुमारे 25 टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत सुमारे 20,000 कोटी रुपये होती, तर सुमारे 250 टन चांदीचीही विक्री झाली, ज्याची किंमत सुमारे 2,500 कोटी रुपये होती. याशिवाय, जुन्या चांदीच्या नाण्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे, ज्याची किंमत प्रति नाणे 1,200 ते 1,300 रुपये होती.”
धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिल्लीतील चांदनी चौक, दरिबा कलान, सदर बाजार, कमला नगर, अशोक विहार, मॉडेल टाऊन, पीतमपुरा, पश्चिम विहार, रोहिणी, राजौरी गार्डन, द्वारका, जनकपुरी यासह काही लोकप्रिय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीची विक्री झाली. याशिवाय, साउथ एक्स्टेंशनमध्ये ग्रेटर कैलाश, ग्रीन पार्क, लाजपत नगर, कालकाजी, प्रीत विहार, शाहदरा आणि लक्ष्मी नगर इथेही मोठ्या प्रमाणावर लोकांनी सोन्या-चांदीची खरेदी केली.
देशात धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय, भांडी, झाडू यांसारख्या वस्तूंची खरेदी करणेही शुभ मानले जाते. या दिवशी भगवान कुबेर, देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.