

8th Pay Commission Recruitment 2026: सध्या देशभरात 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आणि त्यातून होणाऱ्या पगारवाढीची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, या आयोगाच्या शिफारसी केवळ स्वीकारण्याऐवजी त्या शिफारसी तयार करणाऱ्या टीमचा भाग होण्याची संधी आता सुशिक्षित तरुणांना आणि अनुभवी तज्ज्ञांना मिळणार आहे. 8व्या वेतन आयोगाने आपल्या रिसर्च आणि ॲनालिसिस टीमसाठी विविध पदांची भरती जाहीर केली असून यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 1.80 लाख रुपयांपर्यंत आकर्षक वेतन ऑफर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही भरती कंत्राटी तत्त्वावर असून यामध्ये पूर्णवेळ आणि अर्धवेळ असे दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
वेतन आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, रिसर्च टीमसाठी 'कन्सल्टंट' पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदावर निवड झालेल्या व्यक्तींना दैनंदिन कार्यालयीन कामाऐवजी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन याशी संबंधित धोरणात्मक शिफारसी तयार करण्यासाठी सखोल संशोधन आणि विश्लेषण करावे लागणार आहे. आयोगाला मार्गदर्शन करणे आणि दिलेल्या मुदतीत अचूक अहवाल सादर करणे ही या भूमिकेतील मुख्य जबाबदारी असेल. या भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या अर्जांची छाननी केल्यानंतर थेट मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाईल. निवडीचे सर्व अधिकार आयोगाकडे राखीव असून निवड समितीचा निर्णय अंतिम असणार आहे.
या भरतीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारची पदे आहेत. पहिले पद 'सीनियर कन्सल्टंट'चे असून त्यासाठी 5 जागा आहेत. या पदासाठी 10 वर्षांहून अधिक अनुभव आणि 45 वर्षांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली. पूर्णवेळ काम करणाऱ्या सीनियर कन्सल्टंटला दरमहा 1.80 लाख रुपये पगार मिळेल, तर महिन्यातून 12 दिवस काम करणाऱ्यांना 90 हजार आणि 6 दिवस काम करणाऱ्यांना 45 हजार रुपये मानधन दिले जाईल. दुसरे पद 'कन्सल्टंट'चे असून त्यासाठी 5 जागा आहेत. या पदासाठी 6 वर्षांचा अनुभव आणि 40 वर्षे वयोमर्यादा आहे. पूर्णवेळ कन्सल्टंटला 1.20 लाख रुपये, तर अर्धवेळ कामासाठी 60 हजार आणि 30 हजार रुपये पगार मिळेल.
तिसरे पद 'यंग प्रोफेशनल'साठी असून यात सर्वाधिक 10 जागा उपलब्ध आहेत. यासाठी 4 वर्षांचा अनुभव आणि 32 वर्षे वयोमर्यादा असून पूर्णवेळ कामासाठी 90 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. अर्धवेळ पर्यायांतर्गत 45 हजार आणि 22,500 रुपये वेतन दिले जाईल. सरकारी धोरणांच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याची इच्छा असलेल्या आणि अर्थशास्त्रात किंवा सांख्यिकीमध्ये रुची असलेल्या लोकांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. ज्यांना केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवायचा आहे, त्यांच्यासाठी हा अनुभव करिअरच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरणार आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत आणि निकषांनुसार आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.