पणजी: वयाच्या साठीनंतरच व्यक्ती खरे आयुष्य जगते. त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी, परिपक्वता असते, हे लक्षात घेऊन ज्येष्ठांनी आनंदात आयुष्य जगणे गरजेचे आहे, असे मत डॉ. ब्रह्मा शेणवी कुंकळकर यांनी व्यक्त केले.
‘गोमन्तक टीव्ही’वर संपादक संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. अजय वैद्य यांनीही सहभाग घेतला होता. डॉ. शेणवी कुंकळकर म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना प्रेमाची आवशकता असते. ज्येष्ठ नागरिकांनी साठीनंतर भरपूर बोलले पाहिजे, आनंदात जीवन व्यक्त केले पाहिजे. त्यामुळे त्यांचा मेंदू अधिक सुदृढ राहतो.
आजकाल कुटुंबातील कर्त्या व्यक्ती कामानिमित्त किंवा अर्थार्जनासाठी कुटुंबापासून दूर जातात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक एकटे पडतात.
आज अनेक ठिकाणी केवळ ज्येष्ठ नागरिक वास्तव्य करून राहतात. त्यांच्या सुरक्षेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पूर्वी गस्त घातली जायची; परंतु आता तशी गस्त होताना दिसत नाही. अनेक पोलिस अधिकारी अतिशय कार्यतत्पर असतात; परंतु आज पोलिस यंत्रणेवरील विश्वास उडालाय, ही वस्तुस्थिती आहे. ‘सुक्याबरोबर ओले जळते’ अशी स्थिती असून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा विचार निश्चितपणे समोर येत आहे, असे डॉ. कुंकळकर म्हणाले.
आपल्याकडे पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. तीन पिढ्या एकत्र राहायच्या; परंतु आता ती संपुष्टात आली आहे. वय वाढल्यावर आपण परावलंबी, परस्वाधीन झाल्याची भावना मनात घर करू लागते. सामाजिक महत्त्व कमी होत चालल्याचे जाणवू लागते. ही भावना पचवून पुढे जायला हवे, तरच साठीनंतरचे जीवन सुखकर होईल. आम्ही कधीतरी वृद्ध होणार ही भावनाच मनात येत नाही. परंतु आपणाला वृद्धत्व येणार, याची मानसिक तयारी ठेवणे गरजेचे आहे, असे मत डॉ. अजय वैद्य यांनी व्यक्त केले.
खरे तर वयाच्या ७५ वर्षांपर्यंतचे नागरिक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असतात. परंतु वयाच्या साठीतच त्यांना ‘ज्येष्ठ नागरिक’ ठरविले जाते. खरे तर त्यांच्या अनुभवाचा वापर या काळात करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आता सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या व्याख्येत बदल करणे गरजेचे आहे. वयाच्या पंच्याहत्तरीनंतर ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तसेच इतर बाबींचा गांभिर्याने विचार करत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, असे डॉ. अजय वैद्य म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.