पणजी: ‘रुग्णसेवा हे डॉक्टरांचे परमकर्तव्य आहे. ते कार्य ते करत असतात. आरोग्य सेवेचा खर्च वाढला आहे, हे जाणणे गरजेचे आहे. कधीही वैद्यक क्षेत्राशी निगडित एखादी घटना घडल्यास त्याची शहानिशा न करता डॉक्टरांना दोषी ठरवू नये, असे मत डॉ. दीप भांडारे यांनी व्यक्त केले.
‘ते’ राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त ‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘सडेतोड नायक’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते. यावेळी डॉ. गोविंद कामत हेही उपस्थित होते. संपादक-संचालक राजू नायक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. भांडारे म्हणाले, वैद्यकीय पेशात अनुभवाला अधिक प्राधान्य आहे. डॉक्टर रुग्णसेवेतून अनेक गोष्टी सातत्याने शिकत असतात. ज्यावेळी एखादा रुग्ण छातीत कळ येते म्हणून डॉक्टरपाशी जातो त्यावेळी जर तो वयोवृद्ध असेल, त्याला मधुमेह असेल तर त्यांच्या विविध चाचण्या कराव्या लागतात. त्यासाठी खर्च येतो; परंतु रुग्णाला वाटते आपल्याला मोठ्या प्रमाणात फी आकारण्यात आली. परंतु चाचणी न केल्यास व काही अकस्मात घडल्यास त्याचा दोष डॉक्टरांना दिला जातो. त्यामुळे रुग्णांनी या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
वैद्यकीय शिक्षण महागले : डॉ. भांडारे
१९७०-१९७५ दरम्यान एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी १५० ते १७५ रुपये प्रवेश फी असायची, एमएस २०० रुपये असायची. आज सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १० हजार ते ५० हजार अभ्यासक्रमाची फी आहे. खासगी महाविद्यालयांमध्ये २ लाख ते २५ लाख पर्यंत प्रवेश फी आहे.
त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण परवडणारे नाही; परंतु आजही ज्या विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रात येण्याची इच्छा आहे त्यांना अनेक संस्था मदत करतात. गोव्यात जरी डॉक्टरांची संख्या समाधानकारक असली तरी देशभरात आज १५०० नागरिकांमध्ये १ डॉक्टर आहे.
अनेक राज्यांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. त्यासाठी अधिक डॉक्टर तयार होणे गरजेचे आहेत. त्यामुळे येथे अजून एक महाविद्यालय मग ते खासगी का असेना, उभारणे गरजेचे असल्याचे मत डॉ. भांडारे यांनी व्यक्त केले.
राज्याबाहेर जाऊनही काम करावे
वैद्यकीय क्षेत्रात जरी मूलभूत शिक्षण समान राहत असले तरीदेखील सदोदित नवनवीन गोष्टी, तंत्रज्ञान बदलत राहते. पूर्वी ६० विद्यार्थी महाविद्यालयात असायचे, आता २०० आहेत. त्यामुळे शा ठिकाणी कामाचा भारदेखील वाढला आहे. सर्वच विद्यार्थी सर्व क्षेत्रात निष्णात असतील, असे होणार नाही. प्रत्येकामध्ये विविध प्रकारचे कलागुण लपलेले असतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडते त्या क्षेत्रात अधिक अनुभव घ्यायला हवा. आपली प्रगती करण्यासाठी राज्याबाहेरदेखील जाऊन काम करायला हवे, प्रशिक्षण घ्यायला हवे, असे मत डॉ. गोविंद कामत यांनी व्यक्त केले.
फॅमिली डॉक्टरांची गरज भासतेय : डॉ. कामत
आज स्थिती अशी आहे की स्थानिक पातळीवर जे फॅमिली डॉक्टर असायचे ते आता राहिलेले नाहीत. खरे म्हणजे फॅमिली डॉक्टर असेल तर त्यांना रुग्णांनी चांगली माहिती असते. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांवर अतिरिक्त बोजा होत नाही.
सरकारने स्थानिक पातळीवरील रुग्णसेवा सुधारली, जिल्हास्तरीय रुग्णांवर जर योग्य सुविधा मिळू लागली तर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जे मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात, त्यात कमतरता येईल व त्यांना चांगली सुविधा देता येऊ शकेल.
देशातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांच्या सुविधेत प्रगती व्हायला हवी आणि त्यांच्यात अतिशय चांगली मैत्रीपूर्ण स्पर्धा असणे गरजेचे असल्याचे मत डॉ. गोविंद कामत यांनी व्यक्त केले.
दुसरी बाजूही समजून घेतली पाहिजे
ज्यावेळी एखाद्या रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू होतो, त्यावेळी माध्यमांवर ‘डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू’ अशा प्रकारची बातमी काहीप्रसंगी प्रसिद्ध केली जाते. असा निष्कर्ष माध्यमांनी स्वत:च काढणे योग्य नाही, असे द्वयींनी सांगितले.
ते तपासण्यासाठी खास समिती असते. त्यांच्याकडून तपास होतो; परंतु अशा प्रकारची बातमी ज्या डॉक्टरच्या अनुषंगाने दिली जाते, किमान त्यांचे मत जाणून घेऊन बातमीत ते देणे कधीही योग्य असते, असे मत डॉ. भांडारे यांनी व्यक्त केले.
तर डॉ. कामत म्हणाले, कोणताही डॉक्टर हा आपल्या रुग्णाला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आरोप करताना त्याची शहानिशा करणे तितकेच महत्त्वाचे असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.