जेव्हापासून बांबोळीच्या ‘डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम’वर IFFI च्या उद्घानाचा सोहळा होत आला आहे तेव्हापासून कला अकादमीच्या थिएटरमध्ये असणाऱ्या उद्घानीय सिनेमाचे प्रदर्शन सुरू व्हायला तास-तास उशीर होणे हा जणू वार्षिक पायंडाच पडला होता. तिथे बसलेल्या दर्शकांची सहनशक्ती संपवून, त्यांना शिट्ट्या मारायला प्रवृत्त केल्यानंतरच उद्घानाचा सिनेमा एकदाचा सुरू व्हायचा. लोकांच्या हे इतकं अंगवळणी पडलं होतं की परवादेखील ज्यांच्याकडे निमंत्रणपत्रिका होत्या ते दर्शक आरामाने थिएटरमध्ये प्रवेश करत होते. सिनेमा वेळेवर सुरू होणार नाही याबद्दल जणू खात्री असल्यासारखेच. ज्यांच्याकडे निमंत्रण पत्रिका नव्हत्या ते बिचारे बाहेर पावसात रांगा लावून उभे होते. पण एकंदरीत हा ‘फक्त चोवीस मिनिटांचा उशीर’ लोकांनी नक्कीच गोड मानून घेतला असेलच.
‘इफ्फी हा आशियातला सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे’ हे सर्वकाळ अभिमानाने सांगणाऱ्या आयोजकांना, अशा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमात आपण लोकांना वेठीला धरतो आहोत याचे भान ही नसते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयम’वर होणारा सोहळा आटपून पाहुणे चित्रपटगृहात पोहोचेपर्यंत किती वेळ लागेल याचा अंदाज इतक्या वर्षांनंतर देखील आयोजकांना आलेला नाही.
उद्घाटनाचा सिनेमा आयोजकांनी सातच्या ऐवजी आठ वाजता सुरू करावा असे औपचारिकपणे ठरवले आणि तसे निमंत्रणपत्रिके छापले तर लोकांना दरवर्षी होणारा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. परवाच्या इफ्फीच्या उद्घाटनाच्या सिनेमाला त्या सिनेमाचे निर्माते आणि सहनिर्माते सोडून इतर कोणीही महनीय व्यक्ती हजर नव्हत्या. उरलेले सारे महनीय बांबोळीच्या स्टेडियमवर चालू असलेल्या रंगीत सोहळ्यात आणि सलमान खानच्या दबंगगिरीत अडकून पडले असणेच शक्य आहे.
असे पहिल्यांदाच घडत होते. उद्घानाचा हा सिनेमा केवळ रसिक प्रेक्षकांच्य उपस्थितीत पार पडला. उद्घानाच्या खेळाला आयोजकांनी असे दुय्यम ठरवल्यानंतर एक गोष्ट मात्र अतिशय चांगली झाली ती ही की खुर्चीत तासभर चुळबुळ करत असलेल्या लोकांकडे बेपर्वा नजरेने पहात माननीयांच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या आयोजकांना लोकांच्या तिटकाऱ्याचे धनी व्हावे लागले नाही. यंदा ‘फक्त 24 मिनिटे उशीर’ म्हणजे हळूहळू आपण आंतरराष्ट्रीय दर्जाकडे पोहोचतो आहोत याचीच साक्ष आहे नाही का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.